मानवी शरीराबाहेर रक्त तयार करण्याविषयी संशोधन सुरू असले तरी अजूनही त्यात म्हणावे तसे यश आलेले नाही. परिणामी शस्त्रक्रियांसाठी आजही मानवी शरीरातूनच रक्त घ्यावे लागते. अर्थात रक्तदान ही एकूणच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक बाब आहे. ऐच्छिक रक्तदात्यांची संख्या देशभरात अद्याप पुरेशी वाढलेली नाही; परंतु याला महाराष्ट्र राज्य निश्चितपणे अपवाद आहे. दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रात ऐच्छिक रक्तदात्यांचे प्रमाण हे साधारणपणे तीस टक्क्यांपर्यंत होते. आरोग्य विभागाच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेने सातत्याने केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे राज्यातील एकूण रक्तदानापैकी ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण हे ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मुंबईत महानगर रक्तपेढीची निर्मिती, १०४ क्रमांकावर दूरध्वनी केल्यास हव्या त्या रुग्णालयात रक्त उपलब्ध करून देणारी ‘ब्लड ऑन कॉल’ योजना तसेच सेवाभावी संस्थांना विश्वासात घेऊन राबविलेल्या योजनांमुळे महाराष्ट्र आज संपूर्ण देशात ऐच्छिक रक्तदानात प्रथम क्रमांकावर गेला आहे.  यामागे योजनाबद्ध प्रयत्न असून राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने निश्चित केलेल्या सुरक्षित आणि मागेल त्याला रक्त उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची महाराष्ट्राने काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. पुरेसे व सुरक्षित रक्त हे उद्दिष्ट असून यातील सुरक्षितता याला विशेष महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत इबोला, डेंग्यू, मलेरियासह अनेक आजारांनी आपला दरारा निर्माण केला आहे. परिणामी रुग्णाला सुरक्षित रक्त याचा विचार करून जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर निकाल देऊ शकणाऱ्या चाचण्या होणे आवश्यक आहे. एचआयव्हीच्या चाचणीसाठी पूर्वी बराच कालावधी लागे. यादरम्यान एखाद्याला बदली रक्त दिले गेले, तर त्याला एचआयव्ही होण्याचा धोका राहतोच. नवीन तंत्रज्ञानामुळे रक्ताची चाचणी करून दोन तासांत एचआयव्ही आहे वा नाही हे कळू शकते. अर्थात याची किंमत ही कोणाला तरी चुकवावीच लागणार. शासन, महापालिका अथवा रेडक्रॉससह कोणत्याही संस्थेने रक्त गोळा केल्यानंतर त्यांना काही विशिष्ट चाचण्या कराव्या लागतात. त्यात दूषित अथवा असुरक्षित रक्त आढळल्यास ते नष्ट करावे लागते. यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्यांचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला असून त्याचा काही भार हा रुग्णांना स्वीकारावा लागल्यास त्यात फारसे काही चूक नाही. तथापि पंचतारांकित रुग्णालयातील रक्तपेढय़ा व खासगी रक्तपेढय़ांमध्ये रक्ताची जी अवाच्या सव्वा किंमत आकारली जाते ती रुग्णांची लूटमार करणारी म्हणावी लागेल. यापैकी अनेक रुग्णालये ही शासकीय अथवा पालिका रुग्णालयांतून आणलेले रक्त स्वीकारत नाहीत, ही तर गंभीर बाब म्हणावी लागेल. शासनाने केलेल्या दरवाढीत संपूर्ण रक्त व लाल पेशींच्या किमतीत अडीचपट वाढ झाली असली तरी प्लाझ्मा, प्लेटलेटस् आणि क्रायोप्रेसिपिटेटच्या दरात कपात करण्यात आली आहे. मुदलात रुग्णांना संपूर्ण रक्त देण्याचे प्रमाण हे अत्यल्प असून बहुतेक वेळा रक्ताचे घटक द्यावे लागतात. त्याचा विचार केल्यास सुरक्षित रक्त देण्यासाठी काही किंमत मोजावी लागली तर ती चुकीची ठरू नये. महाराष्ट्रात राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या प्रयत्नांमुळे वर्षांकाठी २१ हजार रक्तदान शिबिरे होतात, तर सुमारे १४ लाख ३० हजार रक्ताच्या पिशव्या गोळ्या केल्या जातात. खासगी रुग्णालयात मात्र बदली रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडे आग्रह धरला जातो. बदली रक्त देऊनही रक्ताच्या चाचण्यांसाठी आकारले जाणारे शुल्क प्रचंड असते आणि शासकीय व पालिका रुग्णालयातील रक्त न स्वीकारण्याची भूमिका ही गंभीर गोष्ट असून त्यावर कारवाई करण्यात ‘राज्य रक्त संक्रमण परिषद’ व आरोग्य विभाग सपशेल अपयशी ठरला आहे.