नभोवाणीचा संच किंवा दूरचित्रवाणीचा संच समोरून नीटस, आकारबद्ध दिसावा, पण पाठीमागून उघडताच तो संच चालवणारे अनेक लहान-मोठे यांत्रिक भाग, अगदी बारीक-बारीक वायर दिसाव्यात त्याचप्रमाणे समोरून नीटस, रेखीव दिसणाऱ्या माणसाच्या पाठीमागे असलेला मेरूदंड.. त्यातून निघणाऱ्या अनेक ज्ञानतंतूप्रवाही धमन्या दिसत आहेत, असं चित्र हृदयेंद्रच्या डोळ्यासमोर तरळलं. तोच डॉक्टर नरेंद्र बोलू लागले.
डॉ. नरेंद्र – स्पायनल कॉडमधील ज्ञानतंतू अवयवांकडून मेंदूला संवेदना पोहोचवतात. त्या संवेदनेच्या आधारे मेंदू तात्काळ निर्णय घेतो आणि तो त्या ज्ञानतंतूंमार्फत आवश्यक त्या अवयवापर्यंत पोहोचवला जातो. त्या आदेशानुसार तात्काळ तेथील स्नायू कृती करतात. हात, पाय, डोळे.. सर्व अवयव काम करतात. आता रस्त्यानं तुम्ही चालत आहात, समोर खड्डा दिसतो, मग पाय आपोआप त्यापासून बाजूनं वाट काढतात! आता खड्डा काही पायांना ‘दिसत’ नाही.. पायांना फक्त चालणं माहीत.. खड्डा डोळे पाहातात आणि माणूस चालता चालता खड्डय़ात पडला तर लोक पायांना दोष देत नाहीत! ‘अरे नीट बघून चालता येत नाही का? वेंधळ्यासारखं काय चालतोस?’ असंच विचारतात! तेव्हा ‘समोर खड्डा आहे,’ हे डोळे मेंदूला कळवतात आणि मेंदू मग जसा आदेश देतो त्याप्रमाणे पायातले स्नायू काम करतात.. ते पायांचं चालणं थांबवतात किंवा पायांना बाजूला वळवतात.
हृदयेंद्र – तुकाराममहाराजांनीही एका अभंगात म्हटलंय की, डोळे पाहातात, पण काय पाहिलं, हे ते सांगू शकत नाहीत, कारण ते मुके असतात. काय पाहिलं, ते तोंड सांगतं, पण ते बिचारं आंधळं असतं! कान ऐकतात, पण ते उत्तर देऊ शकत नाहीत, ते मुकेच असतात. काय ऐकलं ते तोंड सांगतं खरं, पण ते बहिरं असतं! मग हा समन्वय साधणारा कोण आहे, त्याचा शोध घ्या!
डॉ. नरेंद्र – व्वा! अगदी समर्पक आहे हे.. आणि हे किती सहज आणि किती वेगानं घडत असतं! साधं उदाहरण घ्या. तुम्ही रेल्वे गाडीच्या दारात उभे आहात. गाडी वेगात आहे आणि कुठूनसा अगदी लहानसा धूलिकण तुमच्या डोळ्यांजवळ थडकतो. तत्क्षणी तुमच्या डोळ्यांच्या पापण्या झपकन् बंद होतात! कोणी हा धूलिकण पाहिला, कोणी त्याचा धोका सांगितला, कोणी त्यावर उपाय म्हणून डोळा बंद करायला फर्मावलं आणि हे सारं किती ‘फ्रॅक्शन ऑफ सेंकद’मध्ये.. सॉरी चुकलं.. किती निमिषार्धात झालं!
ज्ञानेंद्र – फार सुरेख.. खरंच आपण आपल्या रोजच्या जगण्याकडेही जर सूक्ष्मपणे पाहिलं ना तरी सृष्टीत आणि या देहात अनंत चमत्कार भरलेले दिसतील! आपण असं कधी पाहातच नाही..
डॉ. नरेंद्र – अहो खरंच हे शरीर म्हणजे मोठं विलक्षण  स्वयंपूर्ण असं श्रेष्ठ यंत्र आहे.. उपकरण आहे. याच ज्ञानतंतूंच्या जोडीनं शरीरात दोन सिस्टिम्स.. आपलं, यंत्रणा कार्यरत आहेत. ‘सिम्पथेटिक अॅक्टिव्हिटी’ आणि ‘पॅरासिम्पथेटिक अॅक्टिव्हिटी’. यांना मराठीत काय म्हणावं, मला सुचत नाही.. फार तर भावप्रवाही, भावोत्सर्जक यंत्रणा आणि भावनियामक यंत्रणा म्हणा हवं तर! ही ‘सिम्पथेटिक अॅक्टिव्हिटी’ काय करते? तर भीती, काळजी, धडधड, क्रोध अशा भावना उत्पन्न करते आणि ‘पॅरासिम्पथेटिक अॅक्टिव्हिटी’ काय करते? तर त्या भावोत्तेजकतेमुळे देहावर विपरीत परिणाम होऊन दुर्धर प्रसंग ओढवू नये, यासाठी त्या भावाचं नियमन करते, निचरा करते, त्यावर नियंत्रण ठेवते! वरकरणी ‘सिम्पथेटिक अॅक्टिव्हिटी’वर उतारा म्हणून ही जी ‘पॅरासिम्पथेटिक अॅक्टिव्हिटी’ होते, तिचा ‘सिम्पथेटिक अॅक्टिव्हिटी’शी असलेला आंतरमेळ सर्वसामान्य माणसांच्या लक्षात येतोच, असं नाही.. पण नीट आठवून पाहा.. खूप भीती वाटली तर, खूप दु:ख झालं तर रडण्यावाटे आणि अगदी लघवीच्या कृतीवाटे त्या भावाला शरीरच आटोक्यात आणतं! खूप दु:ख झालं, तर रडून हलकं वाटतं म्हणतात ना? छातीत धडधड निर्माण झाली तर ती नियंत्रित केली जाते.. तेव्हा सर्व इमोशन्सचं.. भावनांचं नियमन, नियंत्रण ही ‘पॅरासिम्पथेटिक अॅक्टिव्हिटी’ सतत करत असते..
कर्मेद्र – या चर्चेवरही नियंत्रण येत आहे! कारण गाडी काही मिनिटांतच मथुरा स्थानकात पोहोचत आहे!
चैतन्य प्रेम