मुंबईतल्या बगदादी ज्यूंचा इतिहास खोदून पाहणारे पुस्तक वर्षभर दुर्लक्षित राहिले.. या पुस्तकाने इतिहासकथन केले आहेच, पण काही न पटणारी विधानेही आहेत. त्या सर्वाचा हा वेध..
मुंबई कशी वाढली, हे सांगणारी पुस्तके अनेक आहेत, ‘अठरापगड’ मुंबईतील कोळी, पारशी समाजांबद्दलचीही पुस्तके उपलब्ध आहेत.. परंतु ज्यू- किंवा यहुदी- समाजाचा वाटा मुंबई वाढविण्यात कसा होता, हे सचित्र आणि संशोधनपूर्वक सांगणारे पहिलेच पुस्तक गेल्या नोव्हेंबरात प्रकाशित झाले. शॉल सपिर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल त्या वेळी जो काही तात्पुरता प्रसिद्धीपर मजकूर इंग्रजीत आला, तेवढाच. पुढे मुंबईतील अन्य प्रकाशनांनी त्याची दखल कमीच घेतली. कॉफीटेबल पुस्तकासारखे भासणारे हे पुस्तक खरे तर मजकुरानेही समृद्ध आहे.. अनेक विषयांतरांना जाणीवपूर्वक स्थान देऊन लेखकाने केवळ एकाच विषयावरले पुस्तक लिहिण्याऐवजी स्थानीय इतिहास-लेखनाची रीत उचलली आहे, तरीही या पुस्तकाचे स्वागत म्हणावे तसे झाले नाही. वास्तविक, मुंबईबाबतच्या अन्य पुस्तकांमध्ये न आलेला (यहुदी) पैलू या पुस्तकात विस्ताराने आला आहे. लेखक मूळचे मुंबईकर. सध्या इस्रायलमध्ये असतात. त्यांनी स्वतच्या कुटुंबीयांच्या, घराण्याच्या खाणाखुणाही या पुस्तकातून शोधल्या आहेत. पण म्हणून लेखन स्वैर ठरत नाही. उलट, कुटुंबीयांबद्दल लिहितानाही लेखकाने या पुस्तकासाठी स्वीकारलेली रीत सोडलेली नाही. मूळ दस्तऐवज आणि दुय्यम संदर्भ यांची सांगड घालण्याची रीत पुस्तकाने पाळली आहे.
ज्यू किंवा यहुदी यांना ‘बेने इस्रायल’ असे सर्रास म्हटले जात असले, तरी मुंबईत (आणि कोलकात्यात) साधारण  यहुदी हे ‘बगदादी ज्यू’ किंवा ‘बाबिलोनियन ज्यू’ म्हणून ओळखले जात. कोकणपट्टीत पूर्वापार रुजलेल्या आणि ‘शनवार तेली’ म्हणून ओळखले जाणाऱ्या मराठी आडनावांच्या यहुदींचा (बेने इस्रायलींचा) उल्लेख अगदी कमी आहे..  कारण हे शनवार तेली बगदादी नव्हेत. त्यामुळे हे पुस्तक, एका तुलनेने अल्पसंख्य समूहाचा इतिहास मांडते आहे. इतिहासकथनात नायक असावेतच असे नव्हे, पण येथे ते आपसूक येतात.. बगदादी ज्यूंपैकी एक दानशूर डेव्हिड ससून, हे या समाजाचे नायकच!  या डेव्हिड ससून यांचे वंशज कसे होते, याचा धांडोळा घेतानाच, पुण्याचे ससून रुग्णालय, मुंबईतील डेव्हिड ससून लायब्ररी, कुलाब्याची ससून गोदी आदींसाठी त्यांनी मदत कशी केली याचा इतिहास हे पुस्तक सांगते आणि ससून घराण्याने उभारलेल्या कापडगिरण्यांतून औद्योगिकीकरणाचा पाया कसा भक्कम झाला, याचीही आठवण देते. या घराण्याचे मुंबईतील आदिपुरुष डेव्हिड ससून यांची पणत लेडी फ्लोरा ससून (१८५९- १९३६) यांचे उमदे छायाचित्र पुस्तकात (विषयानुरूप दोनदा) आहे.. यापैकी नंतरच्या उल्लेखातून कळणारी माहिती अनेकांना धक्कादायक वाटेल.. मुंबईच्या प्रमुख चौकातील ‘फ्लोरा फाउंटन’ (१९६९ साली बांधून पूर्ण) हे लहानग्या फ्लोरासाठी बांधविण्यात आले होते, असे लेखक सांगतो!  प्रिन्स ऑफ वेल्स म्यूझियमच्या वास्तूची (हल्लीचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) कोनशिला ज्यांच्या भेटीत रचली गेली, ते प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईत आले असता त्यांचा पुतळाही ब्रिटिशांनी डेव्हिड ससून यांच्या देणगीतून कसा उभारला, याची कथाही या पुस्तकाच्या अखेरीस येते. युवराजांसह हे दानशूर गृहस्थ दिल्लीपर्यंत गेले, म्हणून दिल्लीचाही उल्लेख (या प्रवासाच्या नकाशासकट) येतो. ही सारी वर्णने भरपूरच आहेत, पण पुस्तकाचा भर त्यावर नाही.
बगदादी ज्यूंच्या वस्त्या मुंबईत कुठे होत्या आणि आहेत, ते कसे राहात होते, त्या काळच्या समाजजीवनाचे वास्तु-रूपातील पुरावे आणि कागदपत्रे आज कुठे आहेत, त्यातून काय समजते, याचा अभ्यास हे पुस्तक प्रामुख्याने करते. रहिवास, प्रार्थनास्थळे (सिनेगॉग) आणि शैक्षणिक संस्था-उभारणी अशा प्रकरणांमधून हे समाजजीवन दिसते. यासाठी नव्या- जुन्या कोणत्याही कागदपत्रांना लेखक निषिद्ध मानत नाही. त्यामुळे अनेकदा गमतीदार माहिती मिळत राहते. उदाहरणार्थ, भायखळय़ाच्या अग्निशमन मुख्यालयाजवळून- म्हणजे खडा पारशाकडून नागपाडय़ाकडे जाणाऱ्या रस्त्यास ‘क्लेअर रोड’ म्हणून आजही ओळखले जात असले, तरी त्याचे आजचे नाव ‘मिर्झा गालिब मार्ग’ असे असल्याचे लेखक सांगतो. नागपाडा ते आजचे माझगाव (ताडवाडी) येथपर्यंत बगदादी ज्यूंची वसाहत पसरली होती. शाळा, रुग्णालये यांनी हा भाग समृद्ध आहे. यापैकी ‘मसीना रुग्णालय’ हे तर एकेकाळी बगदादी ज्यूंचे प्रार्थनास्थळही होते.
पुस्तकातील काही बाबी अगदी सांगोवांगीच्या नसल्या, तरी त्यांचा दस्तावेजी आधार कमकुवत वाटतो. फ्लोरा फाउंटन हे फ्लोरा ससूनसाठी नव्हे तर सर बार्टल फ्रिअर या मुंबईच्या गव्हर्नराबाबत कृतज्ञता म्हणून उभारण्यात आले होते, असे अगदी ‘मुंबईचें वर्णन’ पासून सारी पुस्तके सांगत असताना फ्लोरा ससूनचा उल्लेख अप्रस्तुत आहे. बगदादी ज्यूंचे वर्णन मेहनतपूर्वक करणाऱ्या या पुस्तकात, सोमाजी हस्साजी ऊर्फ सॅम्युएल इझिकेल दिवेकर यांनी मांडवी भागातील ‘इस्रायल मोहल्ल्या’त १७८९ साली उभारलेल्या सिनेगॉगचा ‘पहिले सिनेगॉग’ म्हणून उल्लेख आहे. हे पहिले सिनेगॉग तर इस्रायलींचे. परंतु त्याचाही इतिहास अगदी रसाळपणे बऱ्याच तपशिलांनिशी लेखकाने दिला आहे. अभ्यासविषयाची व्याप्ती हवी तेव्हा, हवी तिथे कमी-जास्त करण्याचा दोष पत्करूनही हे काम लेखक करतो, पुस्तक रंजक ठरते. परंतु रंजकतेच्या पराकोटीचे टोक गाठले जाते ते – ‘या सिनेगॉगला स्थानिक (बिगरयहुदी) लोक मशीद म्हणत.. पुढे रेल्वे उभारली गेली व स्थानक झाले, तेव्हा मशीद बंदर असे नाव यावरूनच (सिनेगॉगवरून) मिळालेले आहे.’ अशी वाक्ये या पुस्तकात, केवळ एका इंग्रजी दैनिकात १९९५ साली छापले गेलेल्या एका वाचकपत्राच्या हवाल्याने आली आहेत. हे अभ्यासकांना पटेल का?
न का पटेना! पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही, हे तर खरे! त्या वेळची इंग्रजी, त्या वेळची छायाचित्रे यांत रममाण होण्याची मायंदाळ मुभा देतादेताच हे पुस्तक अनेक ठिकाणांची, अनेक वास्तूंची २००९ ते २०१२ सालची छायाचित्रेही टिपून ठेवते. मुंबई सोडून इस्रायलला गेलेल्यांसाठी हे पुस्तक महत्त्वाची भेट ठरू शकेल, ते या नव्या-जुन्याच्या संगमामुळे. ‘बॉम्बे’ असे नाव पुस्तकाला देताना, १९९५ पासून या शहराचे नाव ‘मुंबई’ असेच सर्व भाषांत लिहिले जात असल्याची विनम्र जाणीव लेखकाला असल्याचे पुस्तकात सूचित झालेले आहे. मात्र, हा बगदादी समाज महाराष्ट्रातील ज्या शहरात राहिला, बहरला त्याचे त्या वेळचे नाव ‘बॉम्बे’च होते, हे मुंबईकरांनीही तितक्याच विनम्रपणे स्वीकारायला हवे. इतिहासाचा वर्तमानाशी सांधा नेहमी थेटच जुळतो असे नाही. त्यात खाचखळगे असतात, वाट मध्येच हरवलेली असते.. तसा आजच्या बगदादी ज्यूंचा मुंबईतील इतिहासही, अनेक कुटुंबांच्या इस्रायल-गमनामुळे खंडित झालेला आहे. तरीही मुंबईच्या उभारणीत बगदादींचा वाटा नाकारता येणारच नाही.
बॉम्बे – एक्स्प्लोअरिंग द ज्युइश अर्बन हेरिटेज : शॉल सपिर
प्रकाशक : बेने इस्रायल हेरिटेज म्यूझियम अँड जीनिऑलॉजिकल रिसर्च सेंटर (भारत)
पाने : २९०, किंमत : अंदाजे ३००० रुपये
sam03
*रेखाचित्र : गेटवे ऑफ इंडियाच्या जागी, शाही दाम्पत्याच्या स्वागतार्थ उभारलेल्या कमानीचे.
 sam05
*खाली डावीकडे, डेव्हिड ससून बालसुधार गृह आणि मसीना हॉस्पिटलचे आजचे दृश्य;  
व उजवीकडे, फ्लोरा ससूनचे छायाचित्र.
*पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिसणाऱ्या सर्व वास्तू  बगदादी ज्यूंनी उभारलेल्या वा त्यांचा हातभार लागलेल्या!