१९७० मध्ये पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकांत मुजीबूर रहमानच्या आवामी लीगचा विजय झाला. त्यांच्या हातात सत्ता जाऊ नये आणि पूर्व पाकिस्तान (बांगलादेश) फुटून निघू नये म्हणून याह्याखाननी फार मोठय़ा प्रमाणावर दडपशाही चालू केली. तीन लाखांवर लोकांची कत्तल केली आणि एक कोटी निर्वासित जनता भारतात आली. त्या वेळेस अमेरिका आणि भारत या दोन लोकशाही देशांनी काय पवित्रा घेतला आणि काय पावले उचलली याचा इतिहास ‘द ब्लड टेलिग्राम – इंडियाज सिक्रेट वॉर इन ईस्ट पाकिस्तान’ या गॅरी बास यांच्या पुस्तकात दिला आहे. बांगलादेशात कत्तल होत असताना अमेरिकेने कत्तल करणाऱ्यांची बाजू घेतली ही गोष्ट लेखकाने पुन्हापुन्हा दाखवून दिली आहे. त्यातही अध्यक्ष निक्सन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किसिंजर आणि अमेरिकेचा पाकिस्तानातील राजदूत असे मूठभर लोक सोडले तर त्यांच्या विदेश विभागात बहुसंख्य अधिकारीवर्ग पाकिस्तानच्या विरोधात होता. आर्चर ब्लड या ढाक्क्यातील वाणीज्य दूताने सतत तारा करून पाकिस्तानी सन्याच्या अत्याचाराची वर्णने अमेरिकेला पाठवण्याचा सपाटाच लावला होता. ती निक्सन आणि किसिंजर यांच्यासाठी डोकेदुखीच होऊन बसली. शेवटी त्यांनी त्याची बदली करून नंतर त्याला नोकरीवरून काढून टाकले.
लेखकाने खूप कष्ट घेऊन निक्सन आणि किसिंजर यांच्या संभाषणाच्या ध्वनिफिती ऐकून त्यातल्या शिव्यांसाहित ती संभाषणे दिली आहेत. बहुतेक अपशब्द भारतीयांना आणि इंदिरा गांधींसाठी राखून ठेवलेले आहेत. पुराव्याची संदर्भसूची १३० पानांची आहे.
अमेरिकेचे दिल्लीतील राजदूत केनेथ कीटिंग भारताच्या बाजूचे होते. जे जे अमेरिकेचे राजदूत भारतात येतात ते भारतीयच होतात ही निक्सन यांची तक्रार मात्र वाचकाला सुखावून जाते. सिनेटर एडवर्ड केनेडींनी बांगलादेश सीमेचा दौरा केला. ते भारतात अतिशय लोकप्रिय झाले. त्यावर एक वेगळे प्रकरण आहे. त्यांनी एका निर्वासित छावणीतील स्वयंसेवकाला विचारले- तुम्हाला सर्वात जास्त कशाची गरज आहे? त्यावर स्वयंसेवकाने उत्तर दिले- स्मशानांची. इंदिरा गांधी, त्यांचे मंत्री आणि सहकाऱ्यांनी एक गोष्ट भारतीय जनतेपासून काळजीपूर्वक लपवून ठेवली. ती म्हणजे ९० टक्के निर्वासित हिंदू होते. परदेशात ते सांगून भारत सरकारने पाकिस्तानला बदनाम करण्यात यश मिळवले.  
हे सर्व होत असताना निक्सन आणि किसिंजर याह्य़ाच्या गुप्त मदतीने रावळिपडीमाग्रे बीजिंगला जाऊन चीनशी संबंध प्रस्थापित करावेत या विवंचनेत होते आणि त्यासाठी याह्य़ाखान आणखी सहा महिने तरी सत्तेवर राहणे गरजेचे होते. लाखो बंगाल्यांचे प्राण त्या सहा महिन्यांत गेले, तरी त्याची पर्वा निक्सनना नव्हती. अमेरिकन काँग्रेसने पाकिस्तानला विकायच्या युद्ध सामग्रीवर बंदी घातली होती. म्हणून ती सामग्री निक्सन-किसिंजर युतीने इराण आणि जॉर्डनमधून काँग्रेसला न कळू देता परस्पर पोचवायची व्यवस्था केली. बेकायदेशीर कृत्ये करण्यात दोघेही वाकबगार होते. जेव्हा न्यूयॉर्क टाइम्सने दोन जहाजे अमेरिकन सन्य व सामग्री भरून पाकिस्तानकडे रवाना होत आहेत असा गौप्यस्फोट केला, तेव्हा दोघांची फार कुचंबणा झाली.
भारतात किसिंजरनी अमेरिका भारताला मदत करील असे आश्वासन दिले, पण दुसरीकडे चीनच्या भेटीत त्यांना भारताच्या सीमेवर सन्य पाठवायची सूचना केली. इंदिरा गांधींच्या वॉिशग्टन भेटीत निक्सननी त्यांना पाऊण तास थांबवून ठेवले आणि नंतर रागाने बोलले. भारत पूर्णपणे एकाकी होता. फक्त सोविएत युनियनने युनोत तीन वेळा भारताच्या बाजूने व्हेटो वापरला. त्याच वेळेस सतारवादक रविशंकर जॉर्ज हरिसनबरोबर माडीसन स्क्वेअर गार्डनमध्ये बांगलादेशीयांवरील अन्यायाला वाचा फोडायला एक संगीत जलसा केला. तो खूप गाजला. निक्सन यांचा मात्र त्यामुळे आणखीनच जळफळाट झाला.           
  एक कोटी निर्वासित येऊनही भारताने आपल्या सीमा बांगलादेशीयांना बंद केल्या नाहीत याबद्दल लेखकाने भारताची प्रशंसा केली आहे. युनोचे निर्वासितांचे हाय कमिशनर सद्रुद्दीन आगाखानही पक्के भारतद्वेषी निघाले.
भारताचे सरसेनापती पारशी होते तर पूर्व सीमेवरचे जेकब आणि जगजितसिंग अरोरा अनुक्रमे यहुदी (म्हणजे ज्यू) आणि शीख होते ही गोष्टही लेखकाच्या लेखणीतून सुटलेली नाही. निक्सननी सातवे आरमार बंगालच्या उपसागरात पाठवले, पण ते बंगालच्या किनाऱ्याला पोचायच्या आदल्या दिवशी पूर्व पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल आणि राज्यपाल नियाझी यांनी बिनशर्त शरणागती पत्करली.
पुस्तकाचे उपशीर्षक जरी ‘भारताचे पूर्व पाकिस्तानातील छुपे युद्ध’ असे असले तरी मुक्तिवाहिनी प्रकरण केवळ २० पानांत आहे. वॉटरगेट प्रकरणात बेइज्जती झालेल्या निक्सननी आपली परराष्ट्रनीती कशी फायदेशीर झाली यावर अमेरिकन लोकांचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या भल्या मोठय़ा तीन खंडी आत्मचरित्रात बांगलादेशावर मात्र फक्त पाच जुजबी पाने लिहिलेली आहेत.
बांगलादेशातील नरसंहाराला निक्सन आणि किसिंजरही जबाबदार होते हे सत्य आता जगासमोर आलेच पाहिजे असे लेखकाचे मत आहे. भारतीय उपखंडातील वाचकांना या पुस्तकातून खूपच नवी माहिती मिळेल यात शंका नाही.
द ब्लड टेलिग्राम – इंडियाज सिक्रेट वॉर इन ईस्ट पाकिस्तान : गॅरी बास,
रॅण्डम हाऊस, नवी दिल्ली, पाने : ५००, किंमत : ५९९ रुपये.
ताजा कलम –
याच पुस्तकाची आंतरराष्ट्रीय आवृत्ती प्रकाशित झाली असून तिचे नाव मात्र ‘द ब्लड टेलिग्राम- निक्सन, किसिंजर अँड अ फॉरगॉटन जिनोसाइड’ असे आहे.