सोपेपणा त्याच्या भाषेत होता. निराळय़ाच संकल्पना मांडणारा थेटपणा विचारात होता..  पुढे मात्र, विचारातच सोपेपणा झिरपू लागला..  इतका की, हा एकेकाळचा आवडता लेखक नकोसा व्हावा..
वाचनाच्या एका टप्प्यावर भेटलेला, अतिशय भावलेला लेखक आपण पुढच्या टप्प्यावर गेल्यावर तितकाच आवडतोय असा प्रश्न आपल्याला पडतो का?
पडायला हवा..असं वाटतं.
थॉमस फ्रीडमन यानं पहिल्यांदा या प्रश्नाची जाणीव करून दिली.
१९९१ नंतर आपल्याकडे जागतिकीकरणाचे वारे मोठय़ा जोमाने घुसले. इतके की अनेक विचारघरांची कौलं आणि छपरं उडाली. हे जागतिकीकरण म्हणजे नेमकं काय? अमेरिकेतल्या वस्तू आपल्याकडे मिळणं म्हणजे जागतिकीकरण का? पण मग तसं असेल तर पूर्वीही जपानची घडय़ाळं यायची, तिकडचे कॅसिओचे कॅल्क्युलेटर्स यायचे, टेलिफंकन कंपनीचा रेडियो यायचा, बोस्की नावाचं कापड यायचं, अगदी सिगरेटचे लायटर देखील यायचे. अमुक वस्तू इंपोर्टेड आहे असं मोठय़ा मिजाशीनं त्यावेळी सांगितलं जायचं. फरक इतकाच की तेव्हा ज्या वस्तू यायच्या त्या बऱ्याचदा चोरून आणलेल्या असायच्या. आणि मग अशा वस्तू आणणाऱ्या टोळय़ांच्या दंतकथा तयार व्हायच्या. युसुफ पटेल, हाजी मस्तान वगैरे मंडळी मान्यवर होती त्या काळात. दाऊद इब्राहिमचा उदय व्हायच्या आधीची ही गोष्ट. मग तेव्हा ज्या काही या वस्तू बाजारात मिळायच्या ते जागतिकीकरण नव्हतं का? की या सर्व चिजा उघडपणे मिळणं म्हणजेच जागतिकीकरण? का आपल्या कंपन्यांनी बनवलेल्या वस्तू अमेरिकेच्या बाजारपेठेत दिसणं म्हणजे जागतिकीकरण? एकेकाळी तेव्हाच्या आपल्या असलेल्या ढाक्याची मलमल जगभरात जात होती. मग तेव्हा जागतिकीकरण नव्हतं का? होतं तर तेव्हाच्या जागतिकीकरणात आणि आताच्यात फरक काय? आणि नसेल तर का नाही..?
असे अनेक प्रश्न त्या वेळी पडत होते. त्याला कारणही तसंच होतं. जनरल अ‍ॅग्रीमेंट ऑन टॅक्स अँड टेरिफ म्हणजे गॅट या नावानं ओळखला जाणारा आणि धुमाकूळ घालत असलेला करार हे त्या पैकी एक.  त्याच्या बाजूने आणि विरोधात दोन्हीकडून दणदणीत युक्तिवाद केले जात होते. या दोन्ही बाजूंनी बोलणारे इतके तगडे होते की जो ज्यावेळी समोर असेल त्याची बाजू त्यावेळी बरोबर वाटायची. आपल्या शरद जोशी वगैरेंनी त्यावर पुस्तिका काढल्या होत्या. या गॅट करारातून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझशेन, म्हणजे डब्लूटीओ झाली. हे सगळंच तेव्हा इतकं गोंधळून टाकणारं होतं की विचारायची सोय नाही. आपल्याला काहीतरी भूमिका असायला हवी असं तर वाटत होतं. पण काय ते कळत नव्हतं. इंटरनेटचा प्रसारही पुरेसा नव्हता. त्यामुळे परदेशातलंही ताजं काही वाचायला मिळणं अवघडच होतं.
या गोंधळलेल्या काळात अमेरिकेतनं जितू पाध्ये यानं कळवलं, थॉमस फ्रीडमन वाच.. बऱ्याच गोष्टी समजतील. तो स्वत: अतिउत्तम वाचक. घरभर पुस्तकंच पुस्तकं. नुसतं कळवूनच तो थांबला नाही, त्यानं पुस्तकच पाठवून दिलं. ते होतं द लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री.
जागतिकीकरणाचा अर्थ लावणारं एका सजग बातमीदाराचं ते पुस्तक. चांगली बातमीदार मंडळी आटोपशीर लिहितात. सोपं लिहितात. आणि बातमीदाराच्या नजरेतनं ते जगाकडे बघत असतात. तेव्हा विद्वानांच्या डोळय़ाला न दिसणारं बरंच काही त्यांना दिसत असतं. त्यात थॉमस फ्रीडमन हा तर न्यूयॉर्क टाइम्ससारख्या दमदार अशा वर्तमानपत्राचा परदेशी वार्ताहर आणि नंतर तर परदेश विषयाचा संपादकच. त्यामुळे त्याला बरंच काही पाहायला मिळालं आणि ते पाहणं तो सहजपणे मांडत गेला. त्याची भूमिका स्वच्छ असते. रिपोर्ताज पद्धतीनं लिहायचं. विचाराचं पिल्लू सोडायचं. विचारवंताचा आव अजिबात आणायचा नाही पण तरी वाचकाला विचार केल्याशिवाय सोडायचं नाही.  ‘द लेक्सस.. ’ च्या सुरुवातीलाच त्यामुळे तो सांगून टाकतो. मी काही विद्वानबिद्वान नाही.. त्यामुळे मी काही भूमिका घेऊन लिहितोय असंही नाही. मी जे काही पाहतोय, अनुभवतोय ते तुमच्या समोर मांडणार आहे. विचार तुम्ही करायचाय.. अर्थही तुम्हीच लावायचाय. असं सांगत सांगत तो वाचकाला जे घोळात घेतो ते समजून घ्यायचं असेल तर ते पुस्तक अनुभवायलाच हवं.
त्यात एके ठिकाणी तो दोन-पाच महत्त्वाचे देश घेतो. म्हणजे उदाहरणार्थ ब्रिटन. मग तो तिथल्या सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांचा निवडणूक जाहीरनामा घेतो. त्याची तुलना करतो. मग विचारतो.. बघा तुम्हाला काही वेगळं वाटतंय का.. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये. या प्रश्नावर आपण एकदम चमकतो आणि नकळतपणे काँग्रेस आणि भाजप या आपल्याकडच्या दोन्ही पक्षांची तुलना करून बघतो मनातल्या मनात. मग आपल्यालाही जाणवतं काहीच फरक नाहीये दोघांच्या आर्थिक धोरणांत. हा जागतिकीकरणाचा परिणाम, थॉमस सांगतो. आणि पटतंही ते आपल्याला. थॉमस मग आपल्याला आणखी पुढे नेतो आणि आपण एके ठिकाणी एकदम थबकतो. खरं तर दचकतोच. जेवताना दाताखाली खडा आल्यावर जशी आपली प्रतिक्रिया होते.. तशीच प्रतिक्रिया थॉमसच्या एका वाक्याने होते. कारण त्यानं लिहिलेलं असतं : ज्या दोन देशांत मॅक्डोनाल्ड आहे, ते देश कधीही युद्ध करत नाहीत.
हे अजबच.. असं आपल्याला वाटू लागतं. काही क्षण हास्यास्पदही वाटतं. मग आपण विचार करू लागतो. सगळा युद्धांचा इतिहास आठवतो आपण. आणि मग खरोखरच पटतं आपल्याला थॉमस काय म्हणतो ते. कारण एक अपवाद वगळला तर खरोखरच ज्या दोन देशांत मॅक आहे त्यांनी कधीच युद्ध केलेलं नाही. असं का?
थॉमस अत्यंत गोळीबंद युक्तिवाद करतो. त्यानं जगाची विभागणी दोन गटांत केलेली आहे. एका बाजूला लेक्सस या आलिशान मोटारीचं स्वप्न पाहणाऱ्या देशांचा गट. आणि दुसऱ्या गटात ऑलिव्हवाल्यांचा.. म्हणजे जुनी.. किंवा जुनाटही.. मूल्यं मानणाऱ्या, तीच उराशी कवटाळून बसणाऱ्या देशांचा गट. या दोन गटातल्या देशांनी परस्परांशी युद्धं केलेली आहेत. पण थॉमस म्हणतो त्या प्रमाणे मॅक असणारे दोन देश मात्र एकमेकांशी युद्ध करण्याच्या फंदात पडलेले नाहीत. थॉमसचं म्हणणं असं की ज्या देशांना अर्थव्यवस्थेच्या भरभराटीचं महत्त्व कळलेलं आहे, ते देश एकमेकांची डोकी फोडण्यात वेळ घालवत नाहीत. पण या उलट ऑलिव्ह गटातील देश मात्र छोटय़ामोठय़ा कारणांवरनं माऱ्यामाऱ्या करत बसतात. ते वाचल्यावर एकदम आपल्याला बेळगाव महाराष्ट्रात यायला कसा पाहिजे, अस्मिता वगैरे मुद्दे आठवतात आणि त्याचं म्हणणं पटू लागतं. थॉमसचं म्हणणं असं की जागतिकीकरणाच्या रेटय़ात भरभराट झालीये ती अर्थव्यवस्थेचं महत्त्व ओळखणाऱ्या देशांची. ज्या प्रदेशांना हा अर्थ कळलेला नाही, ते देश मग ज्यांना तो कळलाय त्या देशांची बाजारपेठ बनू लागतात.
म्हणून त्या पुस्तकाचं नाव द लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री.  या पुस्तकाचा प्रभाव बराच काळ टिकला. त्यामुळे थॉमस वाचायची सवय लागली. मग कळलं त्याचं आणखी एक पुस्तक आहे. या आधीचं बहुधा. फ्रॉम बैरूत टू जेरुसलेम या नावाचं. थॉमस मूळचा बातमीदार. पश्चिम आशियाच्या या सगळय़ा पट्टय़ात त्यानं वेगवेगळय़ा काळात न्यूयॉर्क टाइम्ससाठी बातमीदारी केलेली आहे. त्या वार्ताहरकीच्या अनुभवावंर आधारित ते पुस्तक आहे. त्याचे अनुभव वाचल्यावर पत्रकार म्हणून फक्त हेवा वाटण्यापलीकडे काहीच आपल्याला करता येत नाही. पश्चिम आशियातलं वाळवंट अगदी खदखदत होतं त्या काळात थॉमस तिकडचा बातमीदार होता. तेसुद्धा न्यूयॉर्क टाइम्ससारख्या आंतरराष्ट्रीय दबदबा असलेल्या वर्तमानपत्राचा. एवढय़ा मोठय़ा वर्तमानपत्रासाठी काम करताना सत्ताधाऱ्यांचे अडथळे तितकेसे येत नाहीत. म्हणजे सौदीचा राजा वगैरे लगेच मुलाखतीसाठी वेळ देतो, एखाद्या देशाचा व्हिसा हवा असेल तर अडवणूक होत नाही. त्यामुळे थॉमसचे अनुभव हे मुक्त संचाराचे अनुभव आहेत. त्यातील काही अनुभव तर आजही कालबाह्य़ वाटत नाहीत. उदाहरणार्थ सीरिया. हा देश आजही सामुदायिक हिंसाचाराचा जीवघेणा अनुभव घेतोय. आताचे सीरियाचे प्रमुख असलेले असाद यांचे वडील सत्ताधीश असताना झालेल्या हत्याकांडाचं वर्णन वाचलं की बापसे बेटा सवाई की बापच सवाई हा प्रश्न पडावा. त्या हत्याकांडानंतर जवळपास दोन दिवसांनी थॉमस तिकडे पोहोचला. परंतु तिथल्या गटारांतून वाहणारे रक्ताचे ओहोळ त्यावेळीही ओले होते.. असं निरीक्षण थॉमस नोंदवतो. म्हणजे किती प्रचंड प्रमाणावर शिरकाण झालं असेल याचा अंदाज येतो आणि काटा येतो अंगावर. बैरूत या ख्रिश्चन, मुसलमान अशी मिश्र वस्ती असलेल्या शहरातही थॉमस बराच काळ राहिला. तिथलं वातावरण, बॉम्ब वर्षांवाच्यावेळचे अनुभव हे सगळं मुळातूनच वाचण्यासारखं आहे. पुढे तो इस्रायलची राजधानी जेरुसलेम इथेही होता काही काळ. थॉमस मुळात यहुदी. अमेरिकेतले अनेक बडे पत्रकार हे छुपे इस्रायल समर्थक असतात. त्या मानानं थॉमस तितका एकांगी नसावा. इस्रायलची पुंडाई देखील तो रंगवतो.
या पुस्तकाचा परिणाम इतकाच झाला की थॉमस अधिकच आवडायला लागला. त्याचं लिखाणही अधिक चटपटीत व्हायला लागलं. एव्हाना इंटरनेटचा प्रसार बऱ्यापैकी झाला होता. जगातल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर तरुण भारतीय अभियंत्यांचा पगडा जगालाही जाणवू लागला होता. माहिती क्षेत्र हे भारताच्या विकास गाडीचं इंजिन ठरेल अशी हवा तयार झाली होती. ती तशी व्हावी यासाठी थॉमसनं मोठाच पुढाकार घेतला होता. वाय टू के समस्या जगाला संकटाच्या खाईत लोटणार आहे आणि त्यापासून वाचायची ताकद भारतीय अभियंत्यांकडेच आहे.. असं तो लिहायला लागला होता. त्यामुळे भारतातही थॉमसचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीमुळे भारत जणू जगावर राज्यच करणार आहे.. अशा स्वरूपाचं त्याचं लिखाण असायचं. त्यात तो बंगलोरला येऊन गेला आणि त्याचं जे काही वर्णन त्यानं सुरू केलं की असं वाटायला लागलं बंगलोर बहुधा वॉशिंग्टनचीच जागा घेणार.
तेव्हापासून त्याची जरा काळजीच वाटायला लागली. याला जरा तपासून घ्यायला हवा, याची जाणीव झाली. हा जरा वाव्हतच चाललाय अशीही शंका यायला लागली. मग याच काळात त्याचं पुढचं पुस्तक आलं द वर्ल्ड इज फ्लॅट. माहिती-तंत्रज्ञानामुळे देशोदेशींच्या सीमा कशा पुसल्या जाणार आहेत असं एक तत्त्वज्ञान मांडणारा वर्ग त्या काळी माजलेला होता. हे सगळं ते मांडतायत ते शुद्ध बकवास आहे असं त्याहीवेळी मला वाटत होतं. द वर्ल्ड इज फ्लॅट वाचलं आणि खात्रीच पटली आपण बरोबर आहोत याची. याच सुमारास कारगिलच्या निमित्तानं भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर येऊन ठेपले होते. आता जणू या देशांत युद्धाला तोंड फुटणारच अशीच सगळय़ांची खात्री होती. पण ते युद्ध टळलं. तेव्हा थॉमसनं लिहिलं हे युद्ध टळलं ते राजकारणी वा अन्यांमुळे नव्हे, तर जीई सारख्या कंपन्यांमुळे. त्याचा सिद्धांत असा की माहिती आणि संबंधित तंत्रज्ञान क्षेत्राची ताकद आता इतकी वाढलीये की देशोदेशींच्या भवितव्याचे निर्णय आता त्या संगणकाच्या कळफलकावरच अवलंबून आहेत जणू.
इतके दिवस तो जरा अति लिहितोय असं वाटत होतं. पण हे वाचलं आणि तोपर्यंतचं अतिसुद्धा जरा कमीच भासलं. पण थॉमसची लोकप्रियता चांगलीच वाढली होती एव्हाना. अनेक भारतीय वर्तमानपत्रांत त्याचे स्तंभ सुरू झाले होते. पण हीच वेळ होती थॉमस फ्रीडमनचं वाचन थांबवण्याची. कारण त्याचं अनुकरण करत गावोगाव छोटे थॉमस फ्रीडमन किंवा मोठे नंदन निलेकणीसदृश अनेक तयार झाले होते. त्यामुळे जीडीपीच्या नजरेतूनच सगळीकडे पाहायचं असतं असं बिंबवलं जात होतं आणि भारत कसा महासत्ता होऊ घातलाय हे आपल्या कानीकपाळी ओरडून सांगितलं जात होतं.
आता मागे वळून बघताना सगळेच किती उथळ होते याची प्रकर्षांनं जाणीव होते. थॉमस वाचून आता दहा वर्षांपेक्षा अधिक काळ होऊन गेला. जाणवतं या काळात तो किती सोपा होत गेला.
अति सोपं होणं तसं वाईटच.

१) द लेक्सस अँड द ऑलिव्ह ट्री
प्रकाशक  : पिकॅडॉर.
पृष्ठे : ५१२; किंमत : ११.५६ डॉलर.

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

२) फ्रॉम बैरूत टू जेरूसलेम
प्रकाशक : फरार, स्ट्रॉस अँड गिरॉक्स
पृष्ठे : ५७२; किंमत : १७ डॉलर

३) द वर्ल्ड इज फ्लॅट
प्रकाशक : पिकॅडोर
पृष्ठे :  ६६०; किंमत : ११.५६  डॉलर
(वि. सू.-  पुस्तकाच्या उपलब्धतेविषयी लेखकाकडे चौकशी करू नये.)