रविवारी मॉस्कोमध्ये युक्रेन युद्धाच्या विरोधात निदर्शने होणार होती. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे राजकीय विरोधक आणि माजी उपपंतप्रधान बोरिस नेमत्सोव युक्रेन युद्धाचे कट्टर विरोधक. त्यांनीच त्या निदर्शनांचे आयोजन केले होते. शनिवारी नेमत्सोव त्याच्याच तयारीत व्यग्र होते. रात्री ते क्रेमलिनपासून जवळच असलेल्या एका पुलावरून चालले होते. त्यांच्यासोबत एक महिलाही होती. ते दोघे पूल ओलांडत होते. अचानक एका कारमधून त्यांच्यावर पाठीमागून चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. रशियातील राजकीय हत्याकांडांच्या लांबलचक यादीमध्ये आणखी एक नाव जोडले गेले. अशाच प्रकारे यापूर्वी स्टॅनिस्लाव मर्केलोव या तरुण वकिलाची हत्या करण्यात आली होती. ते मानवाधिकारांसाठी लढत असत. तीच लढाई लढणाऱ्या नतालिया एस्तेमिरोवा यांनाही संपविण्यात आले होते. त्याआधी पत्रकार अ‍ॅना पोलित्कोवस्काया यांना गोळ्या घालून मारण्यात आले होते. अलेक्झांडर लित्विनेन्को हा केजीबीचा माजी गुप्तहेर. त्यांना लंडनमध्ये विषप्रयोग करून ठार मारण्यात आले होते. या सर्व बळींमध्ये एक समान धागा होता. ते सर्व जण पुतिन यांच्या धोरणांचे विरोधक होते. चेचेन्या, युक्रेन येथील युद्धांतील अत्याचार, राष्ट्रवादाच्या नावाखाली चाललेला रशियातील मानवाधिकारांचा भंग, भ्रष्टाचार यांविरोधात ते आवाज उठवत होते. नेमत्सोव      (वय ५५) आणि हे सर्व जण यांत फरक एवढाच होता, की नेमत्सोव हे सोव्हिएत रशियाच्या पतनोत्तर कालखंडातील एक वरिष्ठ आणि लोकप्रिय राजकीय नेते होते. ते मुळात अणुशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादीही. १९८९ मध्ये पहिल्यांदा ते निवडणुकीच्या राजकारणात उतरले. १९९०मध्ये रशियाच्या संसदेत निवडून गेले. हा रशियातील अत्यंत अस्थिर असा काळ. १९९१ मध्ये बोरिस येल्त्सिन यांच्याविरोधात बंड झाले, तेव्हा ते येल्त्सिन यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिले. त्या निष्ठेमुळे त्यांना निझ्नी नोवगोरोडचे गव्हर्नरपद देण्यात आले. तो त्यांच्या राजकीय उत्थानाचा प्रारंभ. १९९७मध्ये येल्त्सिन यांनी त्यांना उपपंतप्रधान केले आणि त्यांच्यावर आíथक सुधारणांची जबाबदारी सोपवली. त्याच्या एका वर्षांतच रशियाला मोठय़ा आíथक संकटाला तोंड द्यावे लागले आणि नेमत्सोव यांची गाडी उताराला लागली, पण ते हरले नाहीत. त्यांनी उदारमतवादी मंडळींना एकत्र करून आपला पक्ष स्थापन केला. त्यांचा उदारमतवाद आणि पुतिन यांचा राष्ट्रवाद हे समोरासमोर येणारच होते. पुढच्या काही वर्षांत तसेच झाले. आता तर ते थेट पुतिन यांच्या अध्यक्षपदालाच आव्हान देण्याच्या तयारीत होते. बहुधा त्याचीच किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांची हत्या कोणी केली हे कदाचित कधीच समजणार नाही. एक प्रवाद असा आहे की, युक्रेन युद्धाच्या बाजूने असलेल्या रशियन राष्ट्रवाद्यांनी त्यांचा खून केला. अतिरेकी राष्ट्रवाद हा अंतिमत: असाच िहसक असतो. तेव्हा तसे घडलेही असेल. कदाचित त्यांचे मारेकरी सापडतीलही किंवा ‘सापडून’ दिले जातील; पण खरे सूत्रधार अंधारातच राहतील. देशप्रेम, राष्ट्रवाद यांचे झेंडे नाचवून लोकमानसातील भयगंडांचे रूपांतर क्रौर्यात करणारे हे सूत्रधारच सत्तेवर असल्यावर कोण कोणाला पकडणार? नेमत्सोव यांच्या मृत्यूचा दुखवटा संपला, की तेथे सारे काही पुन्हा शांत होईल.