News Flash

ज्यांचे घर उन्हात!

ऊन आहे म्हणून कोणी घरात बसत नाही. शेताची बांध-बंधिस्ती करण्यापासून ते विहिरी फोडण्यापर्यंतची कामे याच दिवसांत केली जातात.

| May 19, 2014 02:09 am

ऊन आहे म्हणून कोणी घरात बसत नाही. शेताची बांध-बंधिस्ती करण्यापासून ते विहिरी फोडण्यापर्यंतची कामे याच दिवसांत केली जातात. अशी रखरखीत उन्हात भाजून निघणारी माणसे काम करताना पाहिली म्हणजे त्यांनी कुणाशी भांडण केले आहे म्हणून त्यांचे घर उन्हात असेल, असाही प्रश्न पडतो. नदीचे पात्र कोरडेठाक आणि तापत्या वाळूनेच भडका उडालेला असतो या पात्राचा. दूरवरून या वाळूतही उन्हाच्या लाटा दिसू लागतात..
‘सूर्य आग ओकू लागला’ म्हणजे काय ते आता आपण अनुभवतोच आहोत. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे. तशी ही नक्षत्रे कोरडेपणा घेऊन येणारी, रखरखीत आणि पेटत्या उन्हाचा दाह सोसायला लावणारी या दिवसांतली तगमग म्हणूनच असह्य़ करते. अंगाची लाहीलाही होणे म्हणजे काय ते याच दिवसांत कळते. या दिवसांत झुळझुळ वाहणारे पाणी दिसत नाही. जिथे पाय ठेवावा ती जागा तापलेली आणि सारा आसमंतच जणू झोतभट्टी झालेला. या दिवसांत झाडांना पान राहात नाही, निष्पर्ण झाडे निमूटपणे उभी असतात. शिवार पिकांनी मोकलून गेलेले असते. सर्वत्र मोकळी जमीन आणि सुनसान असे वातावरण. पिकांचा वाळलेला पालापाचोळा आणि झाडांच्या गळालेल्या पानांचा खच. अशा वेळी जरा कुठे ठिणगी पडलीच तर तिचा वणवा होईल एवढी आग असते आजूबाजूला. जरा कुठे शिवारात एखाद्या झाडावर कुऱ्हाड पडलीच तर त्याचा टणत्कार अशा करकरीत दुपारच्या वातावरणात घुमत राहतो. चुकार गुरेढोरे सावलीच्या आडोशाने कुठे तरी उभी असतात. कधी काळी पिकांनी भरलेली शेते अशा वेळी नांगरून टाकली जातात. नजरेच्या टप्प्यात कुठेच ओल दिसत नाही. अर्थात हे असे ऊन आहे म्हणून कोणी घरात बसत नाही आणि आता हे कडक उन्हाचे दिवस संपल्यानंतरच कामाला लागू असे म्हणत सावलीही शोधत नाही. अशा उन्हातही राबावेच लागते. अनेक कामे ही उन्हाळ्यातच उरकली जातात. शेताची बांध-बंधिस्ती करण्यापासून ते विहिरी फोडण्यापर्यंतची कामे याच दिवसांत केली जातात. वीटभट्टय़ाही याच दिवसांत लागतात आणि खाणीतला दगडही याच दिवसांत काढला जातो.
अजिंठय़ाच्या डोंगरात, किनवटसारख्या जंगलात झाडांचा िडक काढणे, तेंदूपत्ता गोळा करणे यांसारखी कामे करणारी अनेक माणसे आढळतात. डोंगरमाथ्यालगतच्या रस्त्यांवरून वाहने येतात, जातात, पण या काम करणाऱ्या माणसांना काहीच देणे-घेणे नसते. आपल्याच नादात ही माणसे काम करताना दिसतात. बारीकसारीक लाकूडफाटा गोळा करणे आणि तो विकणे यावरही अनेकांची रोजीरोटी अवलंबून असते. मराठवाडय़ात गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूर वगरे भागांतील माणसे येतात. ती आजूबाजूच्या आदिवासी पट्टय़ातलीही असतील. अनेक शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीत, बांधावर काही मोठमोठी झाडे-झुडपे असतात. अशी झुडपे छाटून ती मुळासकट उखडणे शेतकऱ्यांना होत नाही. नेहमीच्या शेतातल्या कामापेक्षा ही कामे जरा वेगळी आणि फुरसतीची. ही आदिवासी माणसे आपल्या लेकराबाळांसह आलेली असतात. बायाबापडय़ा झुडपे तोडत असतात, माणसे जमीन खोदून झाडांची खोडे वर काढतात आणि कुठल्या तरी तकलादू, विरविरीत सावलीत लहान लेकरे माती चिवडत बसलेली असतात. अशा पडीक जमिनीवरची झुडपे छाटून आणि त्या झाडाझुडपांची खोडे मुळापासून उखडून ही सर्व लाकडे जाळली जातात. त्यांचा कोळसा तयार केला जातो. केलेल्या कामाचा कोणताच मोबदला ही माणसे घेत नाहीत. जळून तयार झालेल्या कोळशावरच यांचा अधिकार. हा कोळसा ठेकेदाराला विकला जातो. तो विकत घेणारे ठेकेदार या लोकांना ठरलेला मोबदला देतात. मराठवाडय़ात प्रत्येक उन्हाळ्यात अशी झाडे तोडून कोळसा तयार करणारी आदिवासी माणसे मोठय़ा संख्येने येतात. वर आभाळातला सूर्य अंगार होऊन निखारे ओततोय आणि खाली या माणसांचे काम चाललेले. आपल्याच तंद्रीत ही माणसे काम करतात. गेल्या काही वर्षांत अनेक शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवरची अशी झाडे जाऊन त्या वहितीखाली आल्या. अशा माणसांना काम करताना उन्हाचा कोणताच अडसर जाणवत नाही असे नाही, पण त्यांना हे काम केल्याशिवाय पर्यायही नाही. घनगर्द सावली यांच्यासाठी कायम पारखी झालेली. आयुष्यातले ऊन टाळताच येत नाही त्यांना.
लहानपणी खेळात भांडणे झाल्यानंतर एखाद्या घरचा मुलगा तिरमिरीत घरी आला आणि ज्याच्याशी भांडण झाले त्याची तक्रार करू लागला तर त्याचे आधी ऐकून घेतले जाते. लेकराची समजूत काढण्यासाठी त्याला सांगितले जाते, ‘त्याने तुझ्याशी भांडण केले काय, थांब आपण त्याचे घर उन्हात बांधू.’ घर म्हणजे सावली हे माहीत असलेल्या त्या मुलाला हे ऐकून बरे वाटते. जो आपल्याशी भांडलाय त्याचे घर आता उन्हात याचा नेमका अर्थ कळण्याचेही वय नसते ते. पण कुठल्याही लेकराचे असे ऐकून समाधान होते हे मात्र नक्की. अशी रखरखीत उन्हात भाजून निघणारी माणसे काम करताना पाहिली म्हणजे त्यांनी कुणाशी भांडण केले आहे म्हणून त्यांचे घर उन्हात असेल, असाही प्रश्न पडतो.
काही डोंगराळ भागांत जळतण गोळा करणाऱ्या बाया-बापडय़ांच्या, मुलींच्या पायाला पळसाची पाने बांधलेली आढळतात. उन्हाळ्यात माती तापलेली असते. अशा तापलेल्या वाटेवरून अनवाणी चालणे म्हणजे नुसती पायपोळ. अशा वेळी पायात काहीच नसेल तर मग जीवघेणी तगमग होणारच. ती टाळण्यासाठी चपलाही मिळत नाहीत तेव्हा पळसाची पाने तळपायाला बांधली जातात आणि रस्त्यावरची पायपोळ टाळली जाते. तशी ती टाळली तरीही आयुष्याच्या वाटेवर मात्र पाय भाजतच राहतात. अशा अनेकांचा रस्ताच कायम पायपोळीचा असतो.
शिवारात कुठेच पाण्याचा थेंब नसेल तर अशा वेळी जिथे नजर भिडते तिथपर्यंत जरी पाहिले तरी मृगजळाशिवाय दुसरे काही दिसत नाही. कोरडय़ा आणि रखरखीत जमिनीवरून धावणाऱ्या लाटाच दिसू लागतात. कुठेच जरासाही पाण्याचा मागमूस आढळत नाही. जे ओढे नाले, नद्या वाहतात अशांच्या नशिबीही मोठी रखरख असते. नदीचे पात्र कोरडेठाक आणि तापत्या वाळूनेच भडका उडालेला असतो या पात्राचा. दूरवरून या वाळूतही उन्हाच्या लाटा दिसू लागतात. अशा उन्हाचा तडाखा किती? खेडय़ातली जुनी माणसे म्हणतात, ‘चालतं माणूस एका ठिकाणी थांबलं तर जागेवरच पेट घेईल.’ एवढे भयंकर असते वैशाखातले ऊन. त्याचा दाह सहन न होणारी चिमणी पाखरे, बारकेसारखे पक्षी शिवारात अनेक ठिकाणी मरून पडलेले दिसतात. कधी पाण्याविना तडफडून तर कधी आग ओकणाऱ्या उन्हामुळे त्यांची चोच तापलेल्या भुईवर रुतली जाते. अशा असंख्य मुक्या जिवांच्या जगण्याच्याच मुळावर उठते हे ऊन. आपण फार फार तर काय करू शकतो, एखाद्या मातीच्या भांडय़ात पाणी टाकून ते घरासमोर कुठे तरी पाखरांची चोच ओली करण्यासाठी टांगू शकतो किंवा त्याच्या बाजूलाच ज्वारीचे कणीस लटकवतो पाखराची चोच खुपसण्यासाठी. उन्हाळ्यातला आपला परमोधर्म इतकाच आणि परदु:ख शीतल करण्याचा मार्गही एवढाच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 2:09 am

Web Title: brick kiln workers continue to work under burning sun
Next Stories
1 ढगांचा गडगडाट आणि वांझोटे आभाळ
2 खैरलांजी ते खर्डा, निखाऱ्याची वाट..
3 झेपावणाऱ्या ठिणग्या
Just Now!
X