सांप्रत परिस्थितीत आपला मेंदू शाबूत ठेवणे हे मोठे काम बनले आहे. समाजाचे ब्रिगेडीकरण करण्याचे उद्योग जोमाने सुरू आहेत आणि पाहावे तिकडे कळप. त्यामुळे आपल्यावर अन्य कुणास कबजा मिळवू द्यायचा की नाही, हा ज्याच्या-त्याच्या मेंदूचा प्रश्न आहे.
संगणकाच्या साह्य़ाने एका व्यक्तीला दुसऱ्याच्या मेंदूवर नियंत्रण ठेवणे आता शक्य होणार आहे, ही गोष्ट वृत्तपत्रीय गुळगुळीत भाषेत सांगायची, तर प्रचंड खळबळजनक आहे. वॉशिंग्टन विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांनी नुकताच तसा प्रयोग केला. त्यांनी इंटरनेटच्या साह्य़ाने दोन व्यक्तींचे मेंदू एकमेकांस जोडले. त्यातल्या एकाने न बोलता दुसऱ्या व्यक्तीच्या मेंदूला एक संदेश पाठवला आणि त्या व्यक्तीने त्या संदेशानुसार कृती केली. शब्दांविण संवादच तो. नुसताच संवाद नाही, तर हे आपणांस हवे ते करून घेणारे अघोरी तंत्र आहे. त्यांत या शास्त्रज्ञांना यश आले. मानवी संबंधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या या प्रयोगामध्ये प्रा. राजेश राव या भारतीय वैज्ञानिकाचा समावेश होता, ही अर्थात उगाचच एक आपली अस्मितावर्धक गोष्ट.
हे सर्व अद्याप केवळ प्रयोगाच्याच पातळीवर आहे. हे तंत्र प्रत्यक्षात सर्वसामान्यांच्या हाती येण्यास काही तंत्रपिढय़ा तरी नक्कीच जातील. कदाचित ते सर्वसामान्य लोकांच्या वापरासाठी खुले होणारही नाही. पण खरे तर तंत्रज्ञान आणि त्याचा वापर याबाबत कोणीही अशी भविष्यवाणी करू नये. हे तंत्र सर्वासाठी उपलब्ध होईल की नाही, हा खूपच पुढचा प्रश्न झाला. सुरुवातीच्या काळात ते काही लोकांच्याच हाती असणार. परंतु त्यातही प्रचंड धोका आहे. आज बाल्यावस्थेतला हा प्रयोग उद्या प्रौढ होऊन काही मोजक्या लोकांच्या हाती गेला आणि त्यातल्या एखाद्याचा मेंदू फिरला, तर त्यातून काय उत्पात होऊ शकतो याची कल्पनाही मेंदूला झिणझिण्या आणणारी आहे.
कल्पना करा, समजा हे तंत्र राजकारण्यांच्या हाती गेले. त्यांची तर चनच होईल. मतदार बंधू आणि माता-भगिनींना भुलवण्यासाठी राजकारण्यांना काय काय नाटक-तमाशे करावे लागतात. मतदारांचे लांगूलचालन करा. त्यांच्या जातीय, धार्मिक अस्मिता फुलवा. त्यांच्यासमोर दरवेळी नवनवे बागुलबुवा उभे करा. कधी दहशतवादाचे भय दाखवा तर कधी मंदीचे, कधी धार्मिक आक्रमणाची भीती घाला, तर कधी परप्रांतीयांच्या. त्यांना भरभरून आश्वासने द्या. त्यांच्यापुढे भरभरून पॅकेजे ओता. निवडणुका आल्या की त्यांना हे मोफत द्या, ते फुकट द्या. नाना उद्योग. नाना तऱ्हा. परंतु हे मेंदूवरील नियंत्रणाचे तंत्र हाती आले की बस्स. इंटरनेटवरून मात्र एक आदेश प्रसारित करायचा, की त्याला जोडलेली मेंदूंची अवघी ब्रिगेड एक-संघपणे आपणांस हव्या त्या उमेदवाराचे बटण दाबणार.
एका कोणीही न केलेल्या सर्वेक्षणानुसार संपूर्ण जगात नवरा ही अशी वस्तू आहे की जिचे घरात कोणीही ऐकत नाही. अनेक गरीब-बिचाऱ्यांना तर घरात उच्चारस्वातंत्र्यही नसते. अशा व्यक्तिविशेषांसाठी हे मेंदूसंपर्काचे तंत्र म्हणजे वरदानच ठरेल. मुक्या मुक्या आदेश द्यायचा, की त्याची अंमलबजावणी झालीच समजा. हा झाला विनोदाचा भाग. पण यातूनही पुढे काय होऊ शकते याचे दिग्दर्शन होते. आता यावर कोणी शंकाकार म्हणेल, की एक इंटरनेटची बाब वगळली, तर या प्रयोगात नावीन्य ते काय आहे? हे मेंदू नियंत्रणाचे शास्त्र तर पूर्वीपासूनच भरतखंडात आहे.
जगातील सारे ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान पूर्वी आपल्याकडे होतेच, असा दावा करणारा एक ‘पुना’ संप्रदाय आपल्याकडे आहेच. मेंदू ते मेंदू संपर्काची ही बातमी ऐकल्याबरोबर हे तंत्र आपल्या ऋषी-मुनींनी कसे विकसित केले होते, याचे श्रुती-स्मृतीपुराणोक्त दाखले आणि पुरावे शोधण्याच्या कामी या संप्रदायातील मंडळी पळाली असतील, यात काही शंका नाही. आम्ही मात्र वर जे, मेंदू नियंत्रणाचे शास्त्र पूर्वीपासूनच आपल्याकडे आहे, असे म्हटले आहे, त्याचा अर्थ एवढाच की शक्य होईल तेव्हा आणि शक्य होईल त्याच्यापुढे आपले मेंदू स्वहस्ते व कोणत्याही ‘जोरजबरदस्ती’शिवाय गहाण ठेवण्याच्या कामी आपण जी महारत प्राप्त केली आहे, त्यावरून हे शास्त्र आपणांस अजिबात नवे नाही. उलट आज अमेरिकेत प्रयोगावस्थेत असलेले हे तंत्रशास्त्र आपल्याकडे खूपच प्रगतावस्थेत आहे. बाबावाक्यम् प्रमाणम् हा या शास्त्रातील पहिला यमनियम आहे. भारतीयांची आध्यात्मिक आणि आधिभौतिकशास्त्रातील प्रगती सर्व जगाने वाखाणली आहे. परंतु खेदाची गोष्ट हीच, की शरीरशास्त्रात आम्ही जी क्रांती केली आहे तिच्याकडे कोणाचेच लक्ष नाही. जगभरात माणसांच्या मेंदूवर तऱ्हेतऱ्हेचे प्रयोग सुरू आहेत. कोणी कृत्रिम मेंदू तयार करण्याच्या प्रयत्नात आहे, तर कोणी संगणकालाच मानवी मेंदूची क्षमता बहाल करू पाहत आहे. गुगल या कंपनीने अलीकडेच १६ हजार संगणकांचा प्रोसेसर वापरून ‘गुगलब्रेन’ निर्माण केला आहे. भारतातही मानवी मेंदूला उन्नत व सुसंस्कृत करण्याकामी अनेक सुधारक आणि विचारवंतांनी आपले देह ठेवले आहेत. पण याहून अभिनव असा, गुडघ्यात मेंदू असलेला मनुष्यप्राणी बनवण्याचा शोध आपण लावलेला आहे. नियंत्रण अशाच मेंदूवर ठेवावे लागते की ज्याच्यात विचारशक्ती असते. परंतु विचारशक्ती दुबळी करणाऱ्या ‘अफू’च्या सर्वाधिक गोळ्याही आपण तयार केलेल्या आहेत. तेव्हा हे शास्त्र आपल्या चांगलेच परिचयाचे आहे. मेंदूवर नियंत्रण ठेवण्यासाठी, यंत्रमानव बनविण्यासाठी आपल्याला कोणत्याही इंटरनेटची गरज नाही.
स्वातंत्र्य आणि सत्ता यामध्ये मुळातच एक अंतर्गत विसंगती असते. आपण येथे हे नीटच लक्षात घ्यायला हवे, की लोकांच्या मेंदूवर नियंत्रण मिळविणे ही सत्तेची गरज असते. हे नियंत्रण सामाजिक व्यवस्थेसाठी काही प्रमाणात आवश्यकही असते. फक्त त्याचे प्रमाण कोण ठरवणार हा कळीचा प्रश्न असतो. तो तत्त्वज्ञांचा विचारप्रांत झाला. येथे आपण हे ध्यानी घेतले पाहिजे की प्रचार-प्रोपागंडा हे त्या नियंत्रणासाठीचे सर्वात मोठे साधन आहे. हिटलरने तर या प्रचाराचे एक तंत्रशुद्ध शास्त्रच बनवले होते. त्याचे पुरावे ‘माईन काम्फ’मध्ये जागोजागी विखुरलेले आहेत. पण केवळ हुकूमशहांनाच अशा नियंत्रणाची गरज असते असे नाही. लोकशाहीलाही ती असते. आजच्या बाजारप्रेरित व्यवस्थेत तर सर्वच पातळ्यांवरून ग्राहक नामक लोकांच्या मेंदूनियंत्रणाचा प्रयत्न केला जात असतो. हे नियंत्रण केवळ जाहिरातींच्या, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातूनच केले जाते हा भ्रम आहे. खरेतर जॉर्ज ऑर्वेलची ‘१९८४’ काय किंवा अल्डस हक्सलेची ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ काय, या कादंबऱ्या म्हणजे केवळ युटोपियन – काल्पनिका आहेत, असे आजच्या काळात समजणे हाही एक भ्रमच आहे. सरकार आणि बाजार या व्यवस्थांनी हे वैचारिक गुलामांचे ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ केव्हाच आणलेले आहे. दूरचित्रवाणी संचावरून जरा नजर हटवली आणि आजूबाजूला पाहिले, तर आपल्या हेच लक्षात येईल, की समाजाचे ब्रिगेडीकरण करण्याचे उद्योग आज जोमाने सुरू आहेत आणि पाहावे तिकडे जमावाऐवजी कळप दिसत आहेत. स्वतंत्र विचारी माणूस कोणालाच नको आहे. तो जेवढा विवेकशून्य आणि भावनाधीन असेल, तेवढे त्याला पेटविणे, इतरांचा द्वेष करण्यास, हवे ते विकत घेण्यास शिकवणे सोपे. अशा परिस्थितीत आपला मेंदू शाबूत ठेवणे हेच मोठे काम बनलेले आहे. त्याचा ज्यांना कंटाळा आहे, त्यांच्या बाबत काय बोलणार? त्यांनी चित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका आणि जाहिरातीच पाहाव्यात, प्रचारसभांना जाऊन टाळ्याच वाजवाव्यात. अखेर आपल्या मेंदूवर अन्य कुणास कबजा मिळवू द्यायचा की नाही, हा ज्याच्या-त्याच्या मेंदूचा प्रश्न आहे.