‘राजकीय पक्ष, निवडणुका घटनाबाह्य’ हे अण्णा हजारे यांच्या निवेदनाबद्दलचे वृत्त (१ जून) वाचले. ‘राजकीय पक्ष नेस्तनाबूत करायचे’ असे अण्णा म्हणतात, पण देशाचा कारभार कसा चालवायचा याबद्दल या निवेदनात कुठलाच उल्लेख नाही. कदाचित विचित्रपणाचा हा दुसरा अध्याय असावा.. या निवडणूक प्रक्रियेतून गुंड, भ्रष्टाचारी, व्यभिचारी लोक पहिल्या निवडणुकीपासूनच निवडून येताहेत असे अण्णांचे म्हणणे आहे; तरीही हा देश ६६ वर्षे टिकून आहे, थोडीफार का होईना प्रगती करीत आहे, लोकशाही व्यवस्था टिकून राहिलेली आहे.
अण्णांना अपेक्षित असलेले सद्गुणी, सद्वर्तनी, भ्रष्टाचाराचा लवलेश नसलेले उमेदवार- अन् मतदारही- माझ्या मते कारखान्यातूनच निर्माण करावे लागतील. हाडामांसाच्या माणसांकडून अण्णांना अपेक्षित ‘दुसरा स्वातंत्र्यलढा’ पूर्ण होणार नाही!
– डॉ. विजय देवराम पाटील,  पाळधी (जळगाव)

घटनाबाह्य म्हणजे घटनाविरोधी नव्हे
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘सर्व राजकीय पक्ष हे ‘घटनाबाह्य’ आहेत’, असे सांगून कोणत्याही राजकीय-पक्षाला मतदान करू नये असे आवाहन केले आहे. घटनेत राजकीय पक्ष बनवावेत असे म्हटलेले नसले तरी ते बनवू नयेत असेही म्हटलेले नाही. पक्ष बनणे हे स्वाभाविक आहे. ‘घटनाबाह्य’ या शब्दामुळे ‘घटनाविरोधी’ असा भाव व्यक्त होतो व तो दिशाभूल करणारा आहे.
‘पंतप्रधानपदाचा उमेदवार’ असा शब्दही घटनेत किंवा लोकप्रतिनिधित्व कायद्यात नाही. पण पक्ष जेव्हा निरनिराळी आश्वासने देतात, त्यात ‘आम्ही कोणती व्यक्ती सभागृहाचा नेता म्हणून निवडू’ याचे आश्वासन देऊ शकतात. भाजपने अटलजींपासून हा शब्द वापरायला सुरुवात केली. पण व्यक्तीबाबतचे आश्वासन देऊ नका, असेही घटनेने म्हटले नसल्याने हा शब्दही अण्णांच्या अर्थाने ‘घटनाबाह्य’ दिसला तरी घटनाविरोधी ठरत नाही.
उमेदवार अपक्ष असला म्हणजे तो अण्णांच्या नतिक कसोटीला उतरेलच असेही आपोआप ठरत नाही. तसेच अण्णांच्या नतिक कसोटीला उतरणे म्हणजे देशहित कशात आहे हे कळणे असेही आपोआप ठरत नाही.
संजीवनी चाफेकर, एरंडवणा, पुणे</strong>

ब्राह्मणेतरवाद ‘तकलादू’ नाही
‘पुन्हा तोच प्रश्न’ या मधु कांबळे यांच्या लेखात (रविवार विशेष, २ जून) पूर्वार्ध अतिशय योग्य पद्धतीने मांडलेला आहे. लेखाच्या उत्तरार्धात मात्र कांबळे यांना बाबासाहेबांचा ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ दृष्टिकोन दिसला नाही, याचे आश्चर्य वाटते.
मार्क्‍सवादी विचारसरणी अखेर आर्थिक सिद्धान्तावर रचलेली आहे  व आंबेडकरवादी विचारसरणी भारतातील समाजरचनेच्या अभ्यासावर उभी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन जागतिक राजकारणाचा अभ्यास करूनच आपले विचार ‘बुद्धमय’ केले आणि तथाकथित ‘उच्च’ वर्णीयांकडून होरपळलेल्या दलित, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून दिला, हेही खरे. मात्र,  संपूर्ण लेखाचा आटापिटा त्यांच्या उत्तरार्धात दिसून येतो. लेखात मुद्दा होता नक्षलवादाचा, परंतु ते ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर’ या वादापाशी कसे येऊन धडकले हेच समजले नाही. तसेच ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद एखादा समाज वा संघटना यांपुरता मर्यादित नसून संपूर्ण भारतभर जनमानसात पसरलेला आहे याचा विसर कांबळे यांना पडला आहे काय? ब्राह्मण-ब्राह्मणेतर हा वाद म्हणजे भंपक व तकलादू असे लेखकाचे म्हणणे आहे. या वादाला लोकमान्य टिळकांपासूनचा इतिहास आहे, तो लक्षात न घेता नक्षलवादाच्या चर्चेऐवजी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादावर खापर फोडणे घातक आहे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवराय या महापुरुषांचे विचार घेऊनच बहुजन प्रगती करत आहेत. विनाकारण त्यांच्या विचारांविषयी आणि चळवळीविषयी गरसमज पसरवू नयेत.
शंकर माने.

राजकारण्यांचे घोडामैदान..
भाडेपट्टा संपुष्टात येत असलेली महालक्ष्मी रेसकोर्सची जागा टर्फ क्लबकडेच ठेवण्यासाठी अजित पवार आग्रही आहेत हे वाचून आश्चर्य वाटले नाही. किंबहुना शिवसेनेचा लुटूपुटूचा विरोध मावळून यासाठी उद्या सर्वपक्षीय ‘मांडवळ’ झाल्यासही आश्चर्य वाटू नये. एकीकडे उच्च न्यायालयाच्या आदेशाने ग्रामीण महाराष्ट्रातील गाव-जत्रांतील बलांच्या वा बलगाडय़ांच्या शर्यती बंद होत असताना धनिक-वणिक बाळांचा जुगारी षौक पुरविण्यासाठी घोडय़ांच्या शर्यती सुरू ठेवण्यात शासनाला शरम वाटली पाहिजे.
एवढा प्रचंड भूखंड टर्फ क्लबला भाडेपट्टय़ाने देताना त्याचे आजचे तसेच भविष्यातील बाजारमूल्य विचारात घेतले जाईल का? या शर्यतीतून कररूपाने शासनाला किती पसे मिळतात? शर्यती व टर्फ क्लबमुळे किती मराठी माणसांना रोजगार मिळतो, याची शासनाने माहिती दिली पाहिजे.
शंकर गोसावी

कर्नाड यांची अमिताभविषयीची विधाने प्रगल्भ आहेत?
‘वैचारिक भूमिकेवर ठाम राहणे महत्त्वाचे’ या ‘आयडिया एक्सचेंज’मधील गिरीश कर्नाड यांची एकूण सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक विषयातील चिंतनशील भूमिका आणि विचारधारा वाचली (लोकसत्ता, २ जून). आपल्या तत्त्वांशी ठाम राहून, प्रसंगी विरोध झेलून त्यांनी केलेले काम निश्चितच अभिनंदनीय आहे. पण अमिताभ यांनी गुजरात कॅम्पेन करणे मला आवडलेले नाही हे वाचून मात्र कर्नाड यांच्याविषयी असलेल्या आदराला एक गालबोट लागले. नाटक, सिनेमा, साहित्य या क्षेत्रात एक सर्जनशील व्यक्ती म्हणून वावरणाऱ्या कर्नाड यांना अमिताभ यांनी गुजरातसाठी काम करणे संतापजनक वाटणे हे त्यांच्या विद्वत्तापूर्ण व्यक्तिमत्त्वाला न शोभणारे आहे. मुळात अमिताभ हा जाहिरात करतो आहे ती गुजरात राज्याची (मोदींची नव्हे). गुजरात राज्य, तेथील नागरिक, संस्कृती ही आपल्या देशाचाच एक अविभाज्य घटक आहे. त्यांचा या हत्याकांडात दोष काय?
मुस्लिमांवर गुजरातमध्ये अत्याचार झाले हे बरोबर आहे, तसे दिल्लीमध्ये शिखांवर अत्याचार झाले म्हणून १९९२ मध्ये केंद्र सरकारचा पद्मभूषण हा सन्मान कर्नाड यांनी नाकारला का? १९९४चा साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला का?
 यापुढे जाऊनही सलीम जावेद यांच्या पटकथेवर अमिताभ मोठे झाले म्हणजे मुस्लिम लेखकांच्या पाठबळावर ते लोकप्रिय झाले म्हणून ज्या राज्यात मुस्लिमांवर अत्याचार झाले त्या राज्याची जाहिरात करू नये, अशी अपेक्षा करणे हे केवळ हास्यास्पदच नाही तर ते कर्नाडांच्या बुद्धिमत्तेबद्दल, सर्जनशीलपणाबद्दल एक प्रश्नचिन्ह मनात उभे करते.
शुभा परांजपे, पुणे

युवावर्ग इथे विरळच..
सर्व धर्म परिषदेला उपस्थित राहण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी १२० वर्षांपूर्वी मुंबईहून शिकागोला प्रयाण केले. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मृती राष्ट्रपती, राज्यपाल आणि हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रामकृष्ण मठाने मुंबई विद्यापीठाच्या परिसरात जागवल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करून शैक्षणिक यंत्रणेचा विस्तार केल्यास स्वामीजींच्या स्वप्नातील भारत साकारेल आणि त्यांची १५०वी जयंती खऱ्या अर्थाने साजरी केल्यासारखे होईल, असे सांगून आशा जागविली. परंतु समाजातील ज्या वर्गाने स्वामीजींच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा आहे तो युवा वर्ग समारंभ मंचावर तर नव्हताच, परंतु श्रोतृवर्गातही विरळ होता!
पद्मा चिकूर, माहीम (मुंबई)

यंदाही वाहणारच?
यावर्षीच्या दुष्काळाने पाण्याचा काटेकोर वापर किती महत्त्वाचा व गरजेचा आहे हे प्रत्येकालाच जाणवले असेल. आधीच अमाप वृक्षतोड, पावसाचे कमी झालेले प्रमाण, घटलेली भूजलपातळी, पाण्याचा अपव्यय यामुळे टंचाई वा दुष्काळाशी सामना करताना नाकीनऊ आले. पावसाचे वाया जाणारे पाणी अडवून ते साठवून व शुद्ध करून वापरात आणल्यास मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते, हे (रेन वॉटर हार्वेस्टिंगचे) तंत्रही अजिबात नवे नाही. देशात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. तरीही अशा तंत्रांचा वापर करून पाणी साठवण्यास कमी लोक पुढे येतात, हे चिंताजनक आहे.
-राकेश हिरे, कळवण (नाशिक)