X

बुद्ध, गांधी व मोदी

मोदी सरकारला एक वर्ष झालंय. सत्ता इतकी र्सवकष आहे की, तुलनात्मक विचाराला तुल्यबळ विरोधी पक्षच अस्तित्वात नाही.

मोदी सरकारला एक वर्ष झालंय. सत्ता इतकी र्सवकष आहे की,  तुलनात्मक विचाराला तुल्यबळ विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. त्यामुळे मोदींना त्यांचा प्रतिमा प्रस्थापनेचा कार्यक्रम कदाचित वेगळ्या पद्धतीने राबवावा लागेल.

गेल्या लेखामध्ये आपण राजकीय व्यक्तींच्या समाजमनातील प्रतिमा यांचा कलेच्या अंगांनी ऊहापोह करायला सुरुवात केली. त्याच अर्थी आपण या वेळी बुद्ध, मोहनदास गांधी (महात्मा गांधी) व नरेंद्र मोदी यांच्या समाजमनातील प्रतिमा, त्या निर्माण होण्याच्या पद्धती, त्या प्रतिमांचा परिणाम आदी गोष्टींकडे पाहू या.

सिद्धार्थ प्रत्यक्षात कसा दिसत होता कोणाला माहीत! बुद्धाचा संदेश, तत्त्वज्ञान हे त्याच्या जीवनकथेद्वारेसुद्धा समाजामध्ये पसरलं, भारताबाहेरही गेलं. या जीवनकथांच्या चित्रणांत बुद्ध कधीही मानव रूपात दिसत नाही. त्याची पदचिन्हं, रिकामं सिंहासन, धर्मचक्र, पिंपळपान, स्तूप, हत्ती अशा अनेक चिन्हांच्या रूपात त्याचं चित्रण केलेलं दिसून येतं. या चिन्हातील सर्व वस्तू त्याच्या जीवनाशी संबंधित आहेत. म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणून पिंपळपान, राज्य, प्रासादातील आरामदायी सुखमय जीवन तो सोडून गेला म्हणून रिकामं सिंहासन वगैरे. या चिन्हांद्वारे समाज बुद्धाला, त्याच्या शिकवणीला लक्षात ठेवत होता. हा काळ हिनयान पंथाचा किंवा ‘येरवाद’ असंही ओळखलं जातं तो होता.

पुढे महायान पंथामध्ये मोठय़ा प्रमाणावर बुद्धाचं मानवी रूपातील चित्रण प्रचलित झालं. त्याचे अनेक उत्कृष्ट नमुने आपल्याला इतिहासात पाहायला मिळतात. काळाच्या ओघात आध्यात्मिक जगाचा राजा म्हणून बुद्धाला एखाद्या राजाप्रमाणे ‘चक्रवर्ती’ असंही संबोधण्यात येतं. बुद्धाचं तत्त्वज्ञान लोकांनी आधी चिन्हरूपाने स्वीकारल्याने त्याचं मानवी रूप, प्रतिमा-स्वीकार सहज शक्य झाला, तिचा प्रभाव वाढला, आजही आहे.

येशू ख्रिस्ताची प्रतिमाही अशाच पद्धतीने, समाजात सुरुवातीला चिन्हं मानवरूपातील व नंतर मानवरूपातील प्रतिमा या क्रमाने रूढ झाली. महात्मा गांधींच्या प्रतिमेचा प्रसार काहीसा बुद्धाप्रमाणेच झाला आहे. ते आफ्रिकेत होते तेव्हा त्यांचा पोशाख वेगळा होता. ते भारतात आले, भारतभर फिरले. लोकांच्यात काम करताना बहुसंख्य भारतीय लोकांप्रमाणे कमरेला आखूड धोतर/पंचा व अंगावर गरज असेल तेव्हा कपडा, खांद्यावर पंचा असा पोशाख त्यांनी स्वीकारला. अगदी इंग्लंडलाही ते तसेच गेले. त्यांची देहयष्टीही बहुसंख्य भारतीय कष्टकऱ्यांसारखी.. उभं राहणं, बसणं, जीवनशैली, दिनक्रम, सर्व काही.. सामान्यजनांना आपल्यातलाच, आपला माणूस वाटायला निश्चितच मदत झाली असणार.

तो काळ माध्यमांचा नव्हता, अनेकांनी गांधींना कधी प्रत्यक्षांत पाहिलंच नसेल. पण त्यांचे ‘हरिजन’सारख्या संकल्पना, खादी, चरखा, सूत विणणं, स्वदेशी, वाईट बोलू-ऐकू-पाहू नये सांगणारं माकडांचं शिल्प, आदी गोष्टी जनतेपर्यंत गांधींना, त्यांच्या विचारांना घेऊन गेल्या. जनमानसातील गांधींचा प्रतिमाप्रवास व बुद्धाच्या प्रतिमेचा प्रवास यात हे एक आश्चर्यकारक साम्य आहे. गांधी बुद्धाप्रमाणेच आजही भारतीय जनमनावर प्रभाव पाडतात.

बुद्ध राजकीय व्यक्ती नव्हता, गांधी होते. पण त्यांच्या प्रतिमाप्रवास, त्यांची समाजमनातील प्रस्थापना, प्रभाव, याबाबतचं साम्य हे सिद्ध करतं की, केवळ व्यक्तीची प्रतिमा समाजमनात स्थापित होईलही पण ती त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा काळाच्या ओघात जिवंतपणी समाजमनातून विस्मरणातही जाईल. पण व्यक्तिगत प्रतिमेसोबत विचार, तत्त्वज्ञान यांना समाजापर्यंत नेण्यास इतर काही चिन्हं असतील तर त्या व्यक्तीचा, व्यक्तीच्या प्रतिमेचा प्रभाव फार मोठा काळ टिकून राहतो.

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या, त्याआधी काही वर्षांपासून नरेंद्र मोदींची प्रतिमा जनमानसात रुजवण्यासाठी व्यूहरचना, पद्धतशीर प्रयत्न केले गेले. या सर्व घटनांना आपण कलेच्या दृष्टिकोनातून पाहू या. नरेंद्र मोदी व भारतीय जनता पार्टी यांनी गेली लोकसभा निवडणूक काही राज्यांचा अपवाद वगळता, प्रचंड बहुमताने, संख्याबळाने जिंकली. ही एक ऐतिहासिक घटना म्हणून भविष्यात नोंदली जाईल. या विजयासाठी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने बराच काळ व्यूहरचना केली. नरेंद्र मोदींची एका विशिष्ट प्रकारे प्रतिमा समाजमनात निर्माण केली गेली. काँग्रेसच्या कारभाराला कंटाळलेल्या समाजमनाला ती आकर्षित करणारी ठरली. मोदींच्या प्रतिमेचा प्रभाव समाजमनावर पडला त्याचं रूपांतर भाजपला मतं मिळण्यात झालं.

निवडणूक येण्याआधी मोदींनी इंटरनेट, फेसबुक, ट्विटर, व्हॅट्सअ‍ॅप अशा सर्व साधनांचा वापर केला. ‘चहावाला’ असं मणिशंकर अय्यर यांनी हिणवल्यावर ‘चाय पे चर्चा’ चालू केली. सत्तेत आल्यावर ते ‘मन की बात’ आकाशवाणीवरून करतातच.

बऱ्याच वेळेला मोदींच्या कार्यालयातील टेबलामागे गांधींचा छोटा अर्धपुतळा दिसतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते गुजरातचे सुपुत्र आहेत. मोहनदास गांधी हे जरी अनिवासी भारतीय असले तरी मूळचे तेही गुजरातचे सुपुत्र. आफ्रिकेतून भारतात आले; राहिले, भारत देश त्यांची कर्मभूमी बनली.

२००२ साली गुजरातमध्ये दंगल झाली. हजाराच्या संख्येने माणसं मारली गेली. हिंसेचा संबंध, ती दंगल व नरेंद्र मोदी असा संबंध जनमानसात होता. या पाश्र्वभूमीवर मोदींची प्रतिमा बदलायची होती.

त्याकरता मोदींनी प्रशासन, विकास, प्रगती यांवर लक्ष केंद्रित केलं. गुजरातमधील त्यांच्या कार्याची प्रतिमा याकरता उपयोगी पडली. मोदींच्या आधी लालकृष्ण अडवाणी व अटलबिहारी वाजपेयी हे दोन भाजपचे चेहरे होते. अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली. राममंदिर निर्माणासंबंधी आंदोलन झालं. बाबरी मशीद पडली. देशांत अनेक ठिकाणी दंगली झाल्या. त्या पाश्र्वभूमीवर पुढे सत्तेत आल्यावर जास्त सौम्य, सुसंस्कृत प्रतिमा असलेल्या वाजपेयी यांना पंतप्रधानपदासाठी पसंती मिळाली.

समाजाने ज्याप्रमाणे वायपेयींना स्वीकारलं, त्यांचा ज्या पद्धतीने प्रभाव होता, प्रतिमा आहे त्याप्रमाणेच मोदींना समाजाने आपल्याला स्वीकारायला हवं असं वाटत असावं. याकरिता काही दृश्यप्रयोग केले गेले.

रामजन्मभूमीच्या वेळी भाजपच्या ध्वजातील भडक शेंदरी रंगाच्या पाश्र्वभूमीवर युद्ध करणारा राम हे मोठं चित्रं असे. त्यानंतर अनेक नेत्यांच्या प्रतिमा इत्यादी.. नेत्यांपेक्षा राम मंदिर ही कल्पना महत्त्वाची, प्रभावी बनलेली होती. भडक शेंदरी रंग भाजपच्या धार्मिक कट्टर, आग्रही भूमिकेशी जनमानसात जोडला गेला होता. मोदींच्या निवडणुकीत या सगळ्याला बऱ्यापैकी काट दिली गेली. मोदींच्या जाहिरातीत ही कट्टरता बदलण्यात आली. सलग सपाट शेंदरी भगव्या रंगापेक्षा आंब्याचा केशरी ते पिकलेल्या पपयाचा केशरी, काहीसा नारंगी व भगवा अशा अनेक रंगांच्या छटा वापरण्यात आल्या. त्यामुळे एक प्रकारची मनमोहक रंगछटा असलेली पाश्र्वभूमी तयार झाली आणि त्याचा फायदा कदाचित मोदी व गुजरात दंगल यातील संबंध विसरण्याकरिता झाला असेल.

या पाश्र्वभूमीवर पोस्टर्स, होर्डिग्जवर मोदींचा हसणारा चेहरा, पिकलेली दाढी-केस, चष्मा, अनुभवांचं सूचन करणारा.

मोदींच्या प्रतिमास्थापन काळात त्यांची प्रतिमा सतत तुलनात्मकरीत्या चर्चिली गेली, प्रस्थापित केली गेली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची निष्क्रियता, काँग्रेसमधील दोन सत्ताकेंद्र राहुल गांधींचा अनिश्चित राजकीय विचार, अपरिपक्वता, कॉमन वेल्थ गेम्स्, जमीन, कोळसा, २जी असे अनेक घोटाळे, त्यातला प्रचंड भ्रष्टाचार या गोष्टी मोदींकरिता, बुद्ध गांधींच्या चिन्हांसारख्या काम करू लागल्या. या गोष्टींचा विचार करताना तुलनात्मकरीत्या लोकांनी मोदींचा विचार केला. पोस्टर्समध्ये गर्दी नाही. साधी-सोपी आकर्षक, विचार व संदेश थेट-प्रभावी. काही प्रमाणात या पोस्टर्सनी लोकांना संमोहित केलं.

मोदींनी सत्तेत आल्यावर गांधीजींच्या प्रतिमेच्या वापरावरचा काँग्रेसचा हक्क संपवला. गांधीजींचाच स्वच्छतेचा कार्यक्रम राबवला. या कार्यक्रमाच्या चिन्हात गांधींचा चष्माच वापरण्यात आला. मोदी जनमानसात स्वत:ला गांधींजवळ घेऊन जाऊ इच्छित असावेत.

मोदी सरकारला एक वर्ष झालंय. सत्ता इतकी र्सवकष आहे की,  तुलनात्मक विचाराला तुल्यबळ विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. त्यामुळे मोदींना त्यांचा प्रतिमा प्रस्थापनेचा कार्यक्रम कदाचित वेगळ्या पद्धतीने राबवावा लागेल. त्यांचं तत्त्वज्ञान समाजापर्यंत न्यायला त्यांच्याकडे बुद्ध, गांधींप्रमाणे चिन्हं नाहीयेत. त्यामुळे एकटय़ा मोदींच्या प्रतिमेचा प्रभाव किती काळ जनमानसावर राहतो हे पाहायला हवं.

  • Tags: buddha, gandhi, modi, pm-modi,