‘वर्षांनुवर्षे राहत असलेल्या रहिवाशांवर कारवाई केल्यास मी त्यास विरोधच करीन, आणि तो गुन्हा असला तरी पुन्हापुन्हा करीन. त्यासाठी फासावर जायचीही माझी तयारी आहे’.. ठाण्यात वनजमिनींवरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईस आव्हान देताना ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र ऊर्फ बंटी आव्हाड यांनी केलेले हे वक्तव्य! वरकरणी अशा वक्तव्यांमागे सामान्य जनतेचा कळवळा दिसत असला, तरी त्या मुखवटय़ांमागील ‘चेहरे’ वेगळेच असतात. पक्षाने आव्हाडांना जणू आंदण दिलेल्या ठाण्यात अनधिकृत बांधकामांचा अस्ताव्यस्त सुळसुळाट झाला आहे आणि त्याला राजकारणी, बिल्डर, सरकारी अधिकारी व पालिका प्रशासन यांच्या अभद्र युतीचा आशीर्वाद आहे, ही बाब शीळफाटय़ावरील भीषण दुर्घटनेनंतर लख्खपणे समोर आली, तेव्हा मुखवटय़ांमागील अनेक खरे चेहरे उजेडात आले. अनधिकृत बांधकामांच्या बेकायदा धंद्यात संगनमताखेरीज हात धुऊन घेता येत नाहीत. या धंद्याला प्रोत्साहन व संरक्षण देण्यामागे केवळ गरिबांचा पुळका एवढे एकच कारण नाही. हातमिळवणीच्या या धंद्यातून आणखीही बरेच राजकीय हेतू साधता येत असतात. मुख्य म्हणजे, अशा अनधिकृत इमारतींचे जाळे उभे करून त्यांमध्ये बेकायदा राहणाऱ्या रहिवाशांना वारंवार कारवाईपासून वाचविणारा नेता स्वस्तात स्वत:ला ‘मसीहा’ म्हणवून घेऊ शकतो. अनधिकृतपणे वाढणाऱ्या झोपडपट्टय़ांना संरक्षण देणे, झोपडीदादांना आश्रय देणे आणि अनधिकृत इमारतींना नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी सरकारी यंत्रणांवर राजकीय दबाव आणणे हा राजकारणाचाच एक सहउद्योग बनला आहे. गरिबांच्या डोक्यावरील घराची सावली अनधिकृतच ठेवण्यामागे पुण्यकर्माची किंवा परोपकाराची कोणतीही भावना या राजकारणात नसते. घाम गाळून कष्टाने कमाविलेल्या पैशात गरिबांनी विकत घेतलेली ही स्वप्ने कोणत्याही क्षणी धुळीला मिळू शकतात, याची जाणीव असतानाही, गरिबांसाठी काहीतरी केल्याचा आव हे मुखवटे आणत असतात, तेव्हा मतपेढी बांधल्याच्या स्वार्थाचे समाधान या मुखवटय़ामागील चेहऱ्यावर झळकत असते. ठाण्यात जितेंद्र ऊर्फ बंटी आव्हाड यांनी वनजमिनींवरील अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईस विरोध करताना संबंधित अधिकाऱ्याला धमकावले, अर्वाच्य शिवीगाळ केली, काही गुंडांची तर संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर बलात्कार करण्याच्या धमक्या देण्यापर्यंत मजल गेली. यासंबंधीच्या तक्रारींची दाद घेतली जाईल आणि या झुंडशाहीपासून संरक्षण मिळेल या अपेक्षेने जिथे पाहायचे त्यांनी मात्र या प्रकरणात थंड भूमिका घेतली, हे आणखीनच संतापजनक आहे. हे मुखवटाधारी चेहरे केवळ ठाण्यातच नाहीत. गावोगावी असे ‘मतलबी चेहरे’ साळसूदपणाचे मुखवटे धारण करून वावरत असतात. ठाण्यात आमदार आव्हाडांनी अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचे ‘कर्तव्य’ बजावताना फासावर जायचीदेखील तयारी दर्शविली. हे सारे सामान्य जनतेसाठी करत असल्याचा त्यांचा दावा असला, तरी याच भागात अधिकृतपणे राहणाऱ्या, प्रामाणिकपणे कर भरून सुविधा विकत घेणाऱ्या ज्या सामान्य जनतेवर या अनधिकृतपणाचा अनाठायी ताण पडतो, त्या जनतेवर मात्र आपण अन्याय करत आहोत, याची त्यांना साधी जाणीवदेखील नाही हे आश्चर्यकारक आहे. त्याच वेळी उल्हासनगरात पप्पू कलानीदेखील अनधिकृत बांधकामांच्या बाजूने उभे ठाकल्याचे दृश्य समोर आले आहे. पप्पू कलानीचे राजकीय साटेलोटेही जगजाहीर आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने अनधिकृत बांधकामांच्या विरोधात उपोषण केले, आणि आज पप्पू कलानी अनधिकृत बांधकामांच्या बाजूने झुंडशाही करताना दिसू लागले. मतांचे राजकारण हेच अशा खेळामागचे कारण असल्याने, गावोगावीच्या बंटी आणि पप्पूंचा बंदोबस्त करण्याची हिंमतही त्यांच्या पक्षाकडे वा त्यांच्या ‘जाणत्या नेत्यां’कडे नसावी, यात आश्चर्य नाही.