जोनाथन ग्लान्सी या लेखकाचे भारताशी तीन पिढय़ांचे संबंध आहेत. त्याचे आजोबा भारतात मेजर जनरल होते. त्याच्या वडिलांचा जन्म लाहोरचा. दोघांनीही ईशान्य भारतात खूप काळ घालवला आहे आणि लेखक स्वत: चार-पाच वेळेस नागालँडमध्ये जाऊन राहिलेला. त्याचे अनेक जवळचे नातेवाईकही आसाममध्ये नोकरी-व्यवसायासाठी राहिलेले. त्यामुळे नागालँड आणि एकंदरच भारताबद्दल आस्था असल्यास नवल नाही.     
नागा शेकडो वर्षांपूर्वी दक्षिण तिबेटमधून आले असावेत असा समज आहे, पण लेखकाच्या मते ते समुद्रकिनाऱ्यालगत राहत असावेत, कारण कवडी, शंख, शिंपला हे आभूषणे म्हणून ते वापरतात. नागालँडमध्ये सुमारे २० लाख नाग राहतात आणि शेजारील मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि ब्रह्मदेशात आणखी १५-२० लाख असावेत. त्यांच्या एकंदर किती जमाती (टोळ्या) आहेत हे लेखकालाही माहीत नाही. ३० ते ७७ पर्यंत असाव्यात. त्यातील १६ नागालँडमध्ये असून प्रत्येक जमातीची भाषा वेगळी आहे. सर्व बोलीभाषा आहेत, त्यांना लिपी नाही. शंभर वर्षांपूर्वीपर्यंत सर्व नागा निरक्षर होते. आपापसात बोलायला ते असमिया भाषेचा वापर करतात किंवा इंग्लिश वगैरे शब्दांचा वापर करतात. नवीन नागालँड राज्याने इंग्लिशला राजभाषेचा दर्जा दिला आहे, पण हिंदीचा वापर ते अजिबात करत नाहीत. नाग लोकांत हेडहंटिंगची पद्धत आता आतापर्यंत होती. म्हणजे शेजारील गावावर हल्ला करून तेथील लोकांचे शिरच्छेद करून त्यांची कापलेली शिरे घेऊन यायची आणि त्या कवटय़ा ओळीने घरात लावायच्या. विवाहापूर्वी नाग तरुण-तरुणी अनेकांशी संबंध ठेवतील, पण एकदा मनासारखा जोडीदार मिळाला की, त्याच्याशी एकनिष्ठ राहतात. मेजर जन. सरदेशपांडे यांनी पकोइ नागांवर केलेल्या अभ्यासात म्हटले आहे की, ते संशयी, पण संवेदनशील असतात. त्यांच्या डोळ्यांत सदिच्छाच दिसून येते. एकदा त्यांना मित्र कोण हे कळले, की त्याच्याशी पूर्ण मैत्रीने वागतील, पण त्यांच्यासारखा वाईट वैरी नाही.
इंग्रज आणि त्यांचे मिशनरी १८३० पासून त्या भागात येत होते. नागांची इंग्रजांशी शेवटची लढाई १८७९ साली खोनोमा गावाजवळ झाली. दुसऱ्या महायुद्धात १९४४ मध्ये तीन महिने ब्रिटिश-भारतीय विरुद्ध जपानी-आझाद हिंद फौज अशा घनघोर लढाया कोहिमात झाल्या. कोहिमा रणभूमीचे आणि स्मशानभूमीचे स्मारकाचे लेखकाने केलेले वर्णन हृदयंगम आहे. ते आवर्जून वाचावे असे आहे.   
१९२९ साली आलेल्या सायमन कमिशनला केलेल्या निवेदनात नागांनी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली होती. १९४७ साली पुन्हा त्यांनी स्वातंत्र्य मागितले. त्यास गांधींनी नाखुशीने होकार दर्शविला, पण फाळणीत नागांना काही मिळाले नाही. नंतरच्या आतंकवादामुळे १९६३ मध्ये नेहरूंनी नागालँड हे वेगळे राज्य निर्माण केले. लेखकाने त्याला ‘एक चलाख खेळी’ म्हटले आहे. आता नागांमध्ये फूट पडली. एकाने नवीन राज्याचा स्वीकार केला, तर दुसऱ्याने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी सोडली नाही. चीन आणि पाकिस्तानने दोघांनाही मदत चालू ठेवली. (व्हिएतनाम लढाईत अमेरिकेनेही नागांना गुप्तपणे लष्करी शिक्षण दिले असावे अशी लेखकाला दाट शंका आहे.) ते एकमेकांतही लढायचे आणि भारताविरुद्धही लढायचे. शेवटी १९६९ मध्ये सरकारने चढाईचे धोरण स्वीकारले आणि मोठय़ा प्रमाणात चकमकी घडू लागल्या. १९७५ साली नाग नॅशनल कौन्सिलने शिलाँग करारावर फिझोला न विचारता सही केली. लेखकाने असम रायफल्सने नागांवर केलेल्या अत्याचाराचे शहारे आणणारे वर्णन केले आहे. ते जर खरे असेल तर सर्व भारतीयांनाच त्या पापाचे धनी व्हावे लागेल.  
अंगामी झापू फिझोला पकडण्यासाठी सरकारने दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. १९६० साली फिझो रेव्हरंड मायकेल स्कॉट या बाप्टिस्ट मिशनऱ्याच्या मदतीने पूर्व पाकिस्तानमार्गे इंग्लंडला पळून गेला. एसेम जोशी जनता पार्टीच्या काळात लंडनला त्याला एक आठवडाभर रोज भेटले. एस. एम. जोशी त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, ‘एका आठवडय़ाच्या शेवटी फिझो आधीच्या भूमिकेपेक्षा बराच नरम झाला.’ परंतु लेखकाने एसेम यांचा उल्लेखच केलेला नाही. मोरारजी देसाई न्यूयॉर्कहून परतताना लंडनला थांबले. त्या अवधीत एसेमनी फिझोची मोरारजींशी भेट घडवून आणली. ‘‘तुमचा भारतीय घटनेवर विश्वास नाही तर माझ्याशी बोलू नका,’’ असे मोरारजींनी म्हटल्यावर ती बोलणी पूर्ण फिस्कटली. नागांच्या लेखी मेल्यावरही फिझो एक प्रेरणादायी वीरपुरुषच राहिला. हल्ली त्याची सत्तरी उलटलेली मुलगी अदिनो ही लंडनहून सूत्र हलवते.       
गायदिन्लिऊ  या नाग स्त्रीने सैन्य उभारून ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. १९३२ सालापासून ती जन्मठेप भोगीत होती. नेहरू तिला १९३७ साली भेटले होते. स्वातंत्र्यानंतर २ महिन्यांनी नेहरूंनी तिची सुटका केली. १९७२ मध्ये नाग आतंकवाद टोकाला गेला असताना सरकारने तिला ताम्रपत्र आणि पद्मभूषण देऊन गौरविले.
सध्या नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडचे (क-ठ) आणि (ङ) असे दोन भाग पडले आहेत. (क-ठ)ला चीनकडून साहाय्य मिळते. त्यांनी फिझोला विश्वासघातकी जाहीर केला आणि भारत व (ङ) विरुद्ध आतंकवाद चालूच ठेवला आहे.
१९४७ नंतर नागांचे ख्रिस्तीकरण जोरात झाले. रोमन लिपी, बायबल वाचता येणे आणि थोडे फार इंग्लिश समजणे या गोष्टींमुळे नाग आणि भारतीय यांच्यातली दरी वाढत गेली. लेखकाच्या मते ख्रिस्ती धर्म ही भारत आणि नागालँडमधील पाचर असून हिंदू संस्कृतीला ते एक आव्हान आहे. हिंदू मूलतत्त्ववाद हा अगदी अलीकडचा आहे आणि तो केवळ ख्रिस्ती आणि इस्लामी आक्रमणांना उत्तर म्हणून आहे. तरी नागालँडमध्ये सुधारणा होऊ  लागल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल जमीर हे अलाहाबाद आणि कलकत्ता येथून कायद्याची पदवी घेतलेले मोकोक्चुन्गमधील नाग होते. मोठय़ा गावांतून लॅपटॉप, मोबाइल वगैरे सर्रास दिसतात. २००७ साली कोहिमात ‘मिस नागालँड’ सौंदर्य स्पर्धाही झाली. एस्तेरिन इरालू हिने २००३ साली लिहिलेले अ श््र’’ंॠी फीेीेुी१ी ि ही नाग व्यक्तीने लिहिलेली पहिली कादंबरी आहे, पण ती भारत आणि नाग या दोघांच्या रोषास पात्र झाली. परिणामी लेखिकेला भारत सोडून नॉर्वेमध्ये आश्रय घ्यावा लागला ही गोष्ट आपल्या देशाला अजिबात शोभणारी नाही. स्वातंत्र्य जरी बहुतेक नागांना हवे असले तरी शांती, शिक्षण, समृद्धी हवी असलेला मध्यमवर्ग निर्माण होऊ  लागला आहे. तरीदेखील, लेखकाच्या मते, नागांच्या ज्वालामुखीचा उद्रेक कधी होईल हे सांगता येत नाही.         
१९४४ सालच्या कोहिमाच्या युद्धाची तुलना २००० वर्षांपूर्वी ग्रीकांनी पर्शियन सैन्यावर थमीपायलीच्या खिंडीत मिळवलेल्या विजयाशी केली आहे. पुस्तक माहितीने खच्चून भरलेले असून लेखनशैलीही लक्ष खिळवून ठेवते.    
नागालँड – अ जर्नी टू इंडियाज् 
फरगॉटन फ्रण्टिअर : जोनाथन ग्लान्सी, 
फेबर, लंडन,

पाने : २६८, किंमत : १३९९ रुपये.