News Flash

एका कॉम्रेडची साद..

‘आपुलाल्या साभिमाने, लोक चालिले अभिमाने, परंतु हे विवेकाने, पाहिले पाहिजे’ या समर्थवचनाचा विसर न पडू देता कॉ. शरद् पाटील यांचे लिखाण वाचले पाहिजे.

| April 14, 2014 01:10 am

‘आपुलाल्या साभिमाने, लोक चालिले अभिमाने, परंतु हे विवेकाने, पाहिले पाहिजे’ या समर्थवचनाचा विसर न पडू देता कॉ. शरद् पाटील यांचे लिखाण वाचले पाहिजे. पाटील हे आंबेडकरविरोधी होते की ब्राह्मणविरोधी की मार्क्‍सविरोधी, यापेक्षा ते जात्यंतक प्रबोधनवादी होते, हे महत्त्वाचे ठरावे..
आपल्याकडे विचारवंतांनी वैचारिक ऊर्जेच्या निर्मितीत कसूर ठेवलेली नाही; परंतु या वैचारिक ऊर्जेचा प्रसार मात्र एखाद्याच व्यक्तिकेंद्री, पंथवादी संघटनेपुरता मर्यादित राहिल्याची खंत उरते किंवा त्या वैचारिक ऊर्जेवर भलत्याच लोकांनी आपापले आकडे टाकून तिचा गैरवापर केल्याचे चित्र दिसते. हे असे महाराष्ट्रात वारंवार घडल्याने यातून विचारवंताचा पराभव झाला असे मानायचे का यावरील खलच अधिक वाढत जातो. असा खल करणारे हास्यास्पद ठरतात. याचे कारण असे की, विचारवंताच्या हयातीसोबत जणू सारे संपलेच, असे गृहीत या व्यर्थ चर्चामागे असते. यातून उघड होते ती चर्चा करणाऱ्यांची पराभूत मानसिकता. प्राच्यविद्यापंडित आणि सत्यशोधक मार्क्‍सवादी पक्षाचे संस्थापक कॉम्रेड शरद् पाटील यांच्या निधनानंतर जी चर्चा होईल, ती तरी अशी होऊ नये. उलट, पाटील यांच्या निधनानंतर ‘श्रद्धेच्या ओंजळी’ वाहून मोकळे होण्यापेक्षा त्यांच्या वैचारिक मांडणीची आणि या विचारांच्या प्रसार-अपप्रसाराची चर्चा करण्यात मराठीजनांना रस आहे, हे महत्त्वाचे मानले जावे. परंतु तसे होणार नाही. शरद् पाटील यांचे लिखाण आम्ही वाचलेच नाही असे सांगणारे भरपूर आणि पाटील यांनी लिहिलेल्या महत्त्वाच्या सातपैकी दोन-तीन पुस्तके वाचूनसुद्धा पाटील यांच्यावर बुद्धविरोधी, ब्राह्मणविरोधी, मार्क्‍सविरोधी, आंबेडकरविरोधी, असा कोणताही एक शिक्का मारण्यास उत्सुक असलेलेही कमी नाहीत. त्यामुळेच पाटील यांच्या निधनानंतर तरी त्यांना समजून घेतले जावे, ही अपेक्षा मुद्दामहून मांडावी लागते. भारतीय इतिहासाचे अधिक मूलगामी अर्थ लावण्याची कॉ. पाटील यांची तळमळ त्यांना दामोदर धर्मानंद कोसंबी किंवा लोकायतकार देबीप्रसाद चट्टोपाध्याय यांच्या पंक्तीत नेऊन बसविणारी आहे. त्यामुळे पाटील हे केवळ महाराष्ट्राचे ठरत नाहीत. परंतु चट्टोपाध्याय किंवा कोसंबी यांच्याहीपेक्षा एका भाषक समाजाची- महाराष्ट्रीय समाजाच्या ताण्याबाण्यांची जाण संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ातील एक सैनिक, एक मार्क्‍सवादी कार्यकर्ता आणि पुढे इतिहासतज्ज्ञ- विचारवंत अशी ओळख असलेल्या पाटील यांना होती. हे प्रादेशिकत्व मोलाचेच आहे.
कम्युनिस्ट पक्षातील १९६४च्या फुटीपूर्वीपासून पाटील त्या पक्षात होते. त्यापुढील १४ वर्षे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षात राहून अखेर १९७८च्या ऑक्टोबरात त्यांनी स्वत:च्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. भाजपच्या एका स्थानिक नेत्याने या पक्षाची संभावना ‘दोन तालुक्यांपुरता पक्ष’ अशी केली होती. परंतु हा पक्ष फारसा सत्ताकांक्षी नव्हताच आणि त्याचे नेते शरद् पाटील हेदेखील रूढार्थाने नेते नसून विचारवंतच होते. कम्युनिस्टांनी भारतीय समाजाचे वर्ण-जाती संदर्भ जसे समजून घ्यावयास हवे होते तसे कधीच घेतले नाहीत, या घुसमटीची पराकोटी म्हणजे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष. हे संदर्भ समजण्यासाठी, इतिहासातील एकेका घटनेचे खरेखोटेपण तपासण्यात धन्यता मानण्याऐवजी इतिहासाची सामाजिक, राजकीय आदी अंगे तपासून त्यांचा अन्वयार्थ लावण्यावर पाटील यांनी भर दिला. अन्वयार्थ का लावायचा, याबद्दल कॉ. पाटील यांची दृष्टी स्वच्छ होती. जे दिसते ते क्षणिक सत्य असू शकते, त्यामुळे नेणिवेच्या पातळीवर जे समजते त्याचा व दिसणाऱ्या सत्याचा एकत्रितच विचार केला पाहिजे, ही शिकवण त्यांनी सुमारे साडेचौदाशे वर्षांपूर्वीचा बौद्ध दार्शनिक दिग्नाग याच्याकडून घेतली. दिग्नागाचे हे सौत्रांतिक दर्शन पाटील यांनी समाजकेंद्री प्राच्यविद्या व सामाजिक इतिहासलेखनातील एक प्रमाणशास्त्र किंवा एपिस्टेमॉलॉजी म्हणून विकसित केले. पाटील यांच्याशी अनेकांचे, अनेक विषयांबाबत वाद झाले, ते याच प्रमाणशास्त्रामुळे. पाटील यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षालाच सौत्रांतिक प्रमाणशास्त्रातून आलेल्या संशोधनपर अन्वयार्थाची बैठक दिली. त्याआधी मार्क्‍सवादाला फुले, आंबेडकरवादाची जोड द्यायला हवी असे ते म्हणत होते. हा त्यांचा मार्क्‍स-फुले-आंबेडकर (माफुआं)वाद. मात्र उत्तरायुष्यात, माफुआंवादाच्याही मर्यादा जाणवल्याने आपण सौत्रांतिक समाजवादाची मांडणी करीत आहोत असे पाटील म्हणाले आणि त्यांच्या विरोधकांत भरच पडली. सौत्रांतिक समाजवादी मांडणीतील कच्च्या दुव्यांची चर्चा यापुढेही होत राहील; परंतु पाटील यांचे वाद झडले ते या मांडणीतून कुणाचे तरी महत्त्व नाकारले जाते म्हणून. स्त्रीसत्ताक गणसमाज हा ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम’चा पाया आहे, असे पाटील म्हणाल्याने एकाच वेळी नवबौद्ध आणि कम्युनिस्ट, दोघांच्या टीकेचे लक्ष्य ठरले होते. शिवाजी महाराजांनी छत्रपती होण्यापूर्वी -राज्याभिषेकापूर्वी- केलेला आंतरजातीय विवाह हा खरे तर शाक्तपंथाचा दीक्षाविधी होता, शिवरायांच्या किल्ल्यांवर सर्व जातीजमातींचे लोक असणे हे केवळ वैचारिक उदारतेचे लक्षण नसून प्रचलित (ब्राह्मणी) सामाजिक उतरंडीशी जाणीवपूर्वक केलेला तो संघर्ष होता, असे अन्वयार्थही पाटील यांनी मांडले. यापैकी सोयीचे तेवढेच त्या-त्या अनुयायांनी किंवा अस्मितावाद्यांनी स्वीकारले. एरवी, पाटील यांचे अन्वयार्थ गैरसोयीचे वाटावेत आणि म्हणून त्यांच्यावर टीका व्हावी हाच क्रम सुरू राहिला होता. पाटील यांच्या या मांडणीमागची जात्यंताची कळकळ समजून घेण्याची तसदी यापुढे तरी घेणे आवश्यक आहे. हयात असताना पाटील यांचे सहा फुटी करारी व्यक्तिमत्त्व, अनेक संकल्पनाव्यूहांचे त्यांना असलेले अंतर्बाह्य़ आकलन, शब्दांवरील त्यांचे प्रभुत्व आणि एवढे असूनही वादांमध्ये स्वत:ची बाजू मांडताना विरोधकाच्या मुद्दय़ांकडे दुर्लक्षही करण्याची त्यांची हातोटी, आदी वैशिष्टय़ांमुळे पाटील यांचे आव्हानच मोठे होते आणि ते स्वीकारण्याच्या ऊर्मीपायी अनेकांनी त्यांच्याशी वाद घातले. आता पाटील नाहीत, त्यामुळे अशा वादांतील लौकिक हारजितीचा मुद्दा संपुष्टात आला आहे. पाटील यांची बाजू विरोधकांनीही आधी समग्रपणे समजून घ्यावी यासाठी हे कारण पुरेसे आहे.
अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र हा पाटील यांचा ग्रंथ हे लेखसंकलन आहे. कोसला ही कादंबरी, उत्सव हा चित्रपट, हयवदन हे नाटक अशा गाजलेल्या कलाकृतींवर पाटील यांनी लिहिलेले लेख या संग्रहात आहेत. प्राध्यापकी थाटा-घाटात घुटमळत राहिलेली मराठी समीक्षा वाचण्याचा कंटाळा कुणालाही येतो, तसे या संग्रहाचे होत नाही. वैचारिक साधने दूरची असोत वा जवळची, इतिहासातील असोत वा आत्ताची, त्यांची सांगड घालणारा विचारव्यूह या लिखाणाने रचला आहे. आपण पाहातो कसे, आपल्याला साहित्याकडून काय हवे असते आणि आपल्या सौंदर्यकल्पना आज जशा आहेत त्या तशाच का आहेत, हे प्रश्न वाचकाला या पुस्तकातून पडतात आणि तो सुजाण होतो. भारतीय समाज कसा घडला, मातृसत्ताक व्यवस्थेपासून ते मुसलमानी आक्रमणांच्या आधीपर्यंतच्या बहुधर्मीय भारतीय समाजाचे पितृसत्ताक जाती-वर्णामध्ये कसे होत गेले, वर्ण आणि वर्ग हे भारतीय संदर्भात एकच मानावेत काय आणि जातिअंताच्या सांघिक कृतींचा पराभव भारतीय समाजाने कसकसा केला, अशा अनेक प्रश्नांपर्यंत पाटील यांच्या अन्य पुस्तकांचे वाचक जातात, यापुढेही गेले पाहिजेत. त्या प्रश्नांची उत्तरे पाटील यांच्या साथीने शोधायची तर आपापले राजकारण, आपापल्या अस्मिता हे जरा बाजूला ठेवावे लागेल. परंतु मराठीजनांची स्थिती अशी झालेली आहे की अब्राह्मणी हा शब्द आला रे आला की हे काही तरी ब्राह्मणविरोधी असणार, अशा वैचारिक भिंती तयार होतात. ‘आपुलाल्या साभिमाने, लोक चालिले अभिमाने, परंतु हे विवेकाने, पाहिले पाहिजे’ या समर्थवचनाचा विसर अशा वेळी पडतो आणि आपणच जपत असलेल्या दुहीचे आपल्याला काही वाटेनासे होते, असा आजचा काळ आहे. या दुहीमुळे कॉ. शरद् पाटील यांच्या लेखनातील सत्त्वाकडे त्यांच्या हयातीतही लोकांनी सर्वस्तरीय दुर्लक्ष केले.
यापुढेही हे दुर्लक्ष सुरूच राहण्याचा धोका आहे. शिवाजी-संभाजीचा शाक्तपंथ सांगणारे पाटील एका जातीला नको असतील, तर कम्युनिस्टांचा ब्राह्मणीपणा उघड करू पाहणारे पाटील आणखी एका जातीला. तरीही आपण  जातवादी नाही, हे सांगण्यास सारे तयारच. अशा कठीण काळातही पुस्तकरूपाने शरद् पाटलांसारखा कॉम्रेड -साथी, सहकारी, सहप्रवासी- आपल्या वैचारिक प्रवासाला सत्यशोधनाची साद घालत राहणार आहे. ती आपण ऐकायला हवी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 1:10 am

Web Title: call of a comrade
Next Stories
1 इतिहासाचे अखंड वर्तमान
2 वाळूत तापल्या रेषा..
3 माँ, माटी आणि मुजोरी
Just Now!
X