News Flash

राजस्थानी उंट, रायका आणि महिला पशुवैद्य

ही कहाणी मुख्यत्वे करून उंट आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्या रायकांच्या दुरवस्थेबद्दल व त्याविरुद्ध लेखिकेने रायकांसोबत दिलेल्या लढय़ाबद्दल आहे.

| February 14, 2015 12:47 pm

ही कहाणी मुख्यत्वे करून उंट आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्या रायकांच्या दुरवस्थेबद्दल व त्याविरुद्ध लेखिकेने रायकांसोबत दिलेल्या लढय़ाबद्दल आहे.

१९९० च्या सुमारास इल्से कोहलर रोलेफसन नावाची जर्मन पशुवैद्य स्त्री उंटांवर संशोधन करण्यासाठी राजस्थानमध्ये आली. बिकानेरच्या उंट संशोधन केंद्रात ती गेली. पण येथील पुस्तकांबरहुकूम चाललेल्या उंटांच्या ‘यांत्रिक’ जोपासनेचा अभ्यास करण्यात तिला रस नव्हता. राजस्थानमध्ये उंटांची पारंपरिकरीत्या जोपासना करणारी एक रायका नावाची जमात आहे. एका स्थानिक पशुवैद्याच्या मदतीने ती रायकांना भेटली. रायकांचे उंटांबरोबर असलेले पिढय़ान्पिढय़ांचे अनोखे नाते, शतकानुशतकांच्या अनुभवातून त्यांच्याकडे आलेले उंटांबाबतचे ज्ञान हे सगळे बघून ती भारावून गेली. या नात्याचे विविध पैलू शोधून काढण्यासाठी ती सिंध प्रांतापर्यंत भटकून आली. उंट आणि रायका यांच्यातल्या नात्याचा अभ्यास करतानाच ती या दोघांमध्येही खोलवर गुंतत गेली.
राजस्थानमध्ये सातशे वर्षांपूर्वी पाबूजी राठोड यांनी पाकिस्तानमधून पहिला उंट आणला. वाळवंटी प्रदेशात तग धरण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे त्याची संख्या राजस्थानमध्ये वेगाने वाढत गेली. वाहतुकीसाठी उंट हे sam08महत्त्वाचे माध्यम बनले. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात राजस्थानमध्ये उंटांसाठी असलेले चराऊ कुरणांखालचे क्षेत्र विविध कारणांनी आक्रसत गेले. त्यामुळेच राजस्थानमधील उंटांची संख्याही झपाटय़ाने कमी होत गेली. रायकांसमोरच्या अडचणी कमालीच्या वाढत गेल्या. रायकांची पुढची पिढी रोजगाराच्या शोधात राजस्थानच्या बाहेर पडू लागली. रायकांकडे असलेले उंटांबाबतचे ज्ञान हा एक अमोल ठेवा असल्याचे तिच्या लक्षात आले. हा ठेवा नष्ट होऊ नये, त्याचबरोबर आधुनिक काळातही उंटांचे महत्त्व अबाधित राहावं म्हणून ती धडपडू लागली. आणि सन १९९० मध्ये जर्मनीवरून आलेल्या एका उंटाच्या संशोधिकेचे सन २०१४ पर्यंत रूपांतर उंट, रायका व पिढय़ान्पिढय़ा पशुधन बाळगणाऱ्यांच्या हक्कांसाठी धडपडणाऱ्या एका ‘संशोधक कार्यकर्ती’मध्ये झाले. तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या रोलेक्स पुरस्काराने विभूषित करण्यात आले. सन २०१४ पर्यंतच्या तिच्या अविरत प्रयत्नांमुळे राजस्थान सरकारला उंटांचे महत्त्व उमगले. राजस्थान सरकारने २०१४ मध्ये उंटाला राजस्थानचा राज्यप्राणी म्हणून घोषित केले. या महत्त्वाच्या क्षणीच तिच्या पाव शतकाच्या धडपडीची तिने स्वत: लिहिलेली ही कहाणी ‘कॅमल कर्मा’ प्रकाशित झाली.
‘कॅमल कर्मा’ ही कहाणी मुख्यत्वे करून उंट आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्या रायकांच्या दुरवस्थेबद्दल व त्याविरुद्ध इल्से कोहलर रोलेफसन हिने रायकांसोबत दिलेल्या लढय़ाबद्दल आहे. स्वातंत्र्य मिळेपर्यंत राजस्थानमधील बऱ्याचशा जमिनींची मालकी संस्थानिकांकडे होती. त्यामुळे उंटांसाठी मोठय़ा प्रमाणात चराऊ कुरणे उपलब्ध होती. परंतु स्वातंत्र्योत्तर कमाल जमीन धारणा कायदा आला. त्यामुळे जमिनींचे छोटे छोटे तुकडे होऊन जमिनीची मालकी विभागली गेली. मोठय़ा प्रमाणात विंधन विहिरी खोदल्या गेल्या. वाळवंटामध्ये भूगर्भातल्या पाण्याचा उपसा करून बरीचशी जमीन लागवडीखाली आणली गेली. दूरदृष्टी न ठेवता झालेला हा विकास उंटांच्या मुळावर आला. राजस्थानच्या अर्थव्यवस्थेत असलेले उंटांचे महत्त्व सरकारलाही ओळखता आले नाही. त्याचबरोबर उंटांमध्ये गर्भपाताची मोठी समस्या निर्माण झाली. त्यावरही काहीच उपाययोजना न झाल्याने उंटांची संख्या आणखी झपाटय़ाने कमी होऊ लागली.
उंटांचे व त्यांच्यावरच अवलंबून असणाऱ्या रायकांचे नष्टचर्य यावरच संपले नाही. स्वातंत्र्योत्तर वेगवेगळी राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये घोषित झाली. चरणारे पाळीव प्राणी हे पर्यावरणविरोधक गणले गेले. त्यांना वनखात्याने संरक्षित वनांमध्ये प्रवेशबंदी केली. खरे तर पाळीव प्राणी हाही पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. या दृष्टीने आजपर्यंत कोणत्याच पाळीव प्राण्याकडे पाहिलेच गेले नाही. परंतु या प्रकाराने जंगलांची व वन्यप्राण्यांचीही जी हानी झाली, त्याच्याकडेही या पुस्तकातील ‘फॉरेस्ट’ या प्रकरणात लक्ष वेधलेले आहे. लेखिकेने त्यासाठी वेगवेगळी उदाहरणे दिलेली आहेत. भरतपूर राष्ट्रीय उद्यानात म्हशींना चराऊ बंदी केली गेली. याअगोदर उद्यानातल्या तलावात म्हशी डुंबत राहायच्या. आजूबाजूच्या पाणवनस्पती त्या खायच्या. म्हशींच्या चराऊ बंदीनंतर पाणवनस्पतींची अर्निबध वाढ झाली. त्यामुळे सायबेरियन क्रेनना जमिनीतून कंदमुळे उकरून काढणे अवघड झाले. ही कंदमुळे सायबेरियन क्रेनचे अन्न होते. सायबेरियन क्रेनना अन्न न मिळाल्यामुळे भरतपूरला येणाऱ्या सायबेरियन क्रेनची संख्या कमालीची रोडावली. त्याचप्रमाणे उंटांना अभयारण्यात केलेली चराऊ बंदीही जंगलवाढीसाठी हानिकारक असल्याचे रायकांचे म्हणणे होते. उंट हे झाडाचा वरचा पाला खातात व त्यामुळे झाडांची झपाटय़ाने वाढ होण्यास मदत होते. वनांच्या व्यवस्थापनाची आखणी करताना वनव्यवस्थापकांना वनांमध्ये पाळीव प्राण्यांना सरसकट बंदी करताना यापुढे विचार करावा लागेल हे निश्चित.
आधुनिक राजस्थानमध्ये वाहतुकीचा प्राणी म्हणून उंटांचे महत्त्व आज कमी झाले आहे. परंतु किती तरी आजारांवर रामबाण ठरणारे उंटाचे दूध हे आधुनिक काळाचे अमृत ठरले आहे. त्यापासून बनणाऱ्या साबणाला आज परदेशात प्रचंड मागणी आहे. उंटाच्या केसांपासून शाली बनवल्या जातात. त्याच्या शेणापासून पेपर बनवला जातो. त्यामुळे राजस्थानमधल्या कुटीरोद्योगांना प्रोत्साहन मिळत आहे. उंटाला या नव्या रूपात जगासमोर उभे करण्याची लेखिकेची तळमळ आणि धडपड बघून आश्चर्यचकित व्हायला होते.
पिढय़ान्पिढय़ा रायकांकडे असलेले उंटांबाबतचे ज्ञान हा एक राजस्थानने जपावा असा ठेवा आहे. परंपरा फक्त राजा-महाराजांच्या राजवाडय़ांच्या जपणुकीत नसते, तर सामान्यांकडे शतकानुशतके असलेल्या एखाद्या विषयाच्या अमोल ज्ञानाचा व कौशल्याचा ठेवा योग्य वेळी जपला नाही तर आधुनिक काळात तो नष्ट व्हायला वेळ लागणार नाही, याकडे लेखिकेने लक्ष वेधले आहे.
जंगली प्राण्यांवर आपल्याकडे बरेचसे संशोधन होत आहे. त्यांचे महत्त्वही विविध माध्यमांतून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. परंतु सार्वजनिक गायराने आज वेगाने नष्ट होत आहेत. संरक्षित वनांमध्ये पाळीव प्राण्यांना स्थान नाही. त्यामुळे पाळीव प्राणी व त्यांच्यावर पिढय़ान्पिढय़ा अवलंबून असणारा भटका समाज आज सैरभैर झाला आहे. आपल्याकडेही शेळ्या-मेंढय़ा घेऊन भटकणारा धनगर समाज आहे. त्यांचे प्राण्यांविषयीचे पिढय़ान्पिढय़ा जपलेले ज्ञान समजून घ्यावे, असा फारसा प्रयत्न झालेला नाही.
उंटांचे महत्त्व जगाला समजावे म्हणून लेखिकेने राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशातून ८०० किमीचा प्रवास उंटांवरून करून ‘उंट बचाव’ अभियान केले. अशिक्षित रायका त्यांचे पारंपरिक ज्ञान घेऊन आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गेले. पिढय़ान्पिढय़ा पशुधन बाळगणाऱ्यांच्या जागतिक परिषदांमध्ये राजस्थानमधील उंटांच्या पारंपरिक व्यवस्थापनाबद्दल बोलले. जागतिक व्यासपीठांवर त्यांनी आपल्यासमोरच्या अडचणी मांडल्या. आपल्या पारंपरिक व्यवसायाला असलेली प्रतिष्ठा त्यांना उमगली. समृद्ध भारतीय वारशाचा एक भाग असलेल्या रायकांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य लेखिकेने केले आहे.
*कॅमल कर्मा
*लेखिका : इल्से कोहलर रोलेफसन
*प्रकाशक: ट्रॅन्क्वेबर प्रेस
*पृष्ठे : ३७७,  किंमत ५९५ रु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 12:47 pm

Web Title: camel karma by elsie kohler rollefson
Next Stories
1 चविष्ट पदार्थातली पौष्टिकता!
2 पक्षी वाचवणारा लेखक
3 बांगलादेशनिर्मिती आणि नंतर
Just Now!
X