जनावरांसाठी उन्हाळ्यात चारा डेपो उघडले जातात. पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्याच लाभार्थी कार्यकर्त्यांना ही कंत्राटे मिळतात. या चारा डेपोतही गैरव्यवहार झाल्याच्या बातम्या येतात.  अगदी छावणीतल्या गुरांच्या शेणातही गैरव्यवहार झाल्याची चर्चा होते. मुक्या जनावरांना काय माहीत .. त्यांच्याच नावाने हे सगळे चालू आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागली की सूर्य हळूहळू आग ओकायला लागतो. रणरणत्या उन्हात वावटळी घिरटय़ा घालायला लागतात. शेतातून पिकेनिघालेली असतात आणि वाळलेला पालापाचोळा रानोमाळ होत जातो. सगळा उन्हाळाच अशा वेळी अंगावर धावून येणाऱ्या आचेसारखा पोळायला लागतो. महाराष्ट्राच्या अनेक भागांत इथून पुढचे चार महिने शिवारभर सन्नाटा पसरल्यासारखेच वातावरण असते. हिरवा चारा संपतो, वाहणारे पाणी आटते. अशा वेळी गुरांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न असतो. कुणबिकीच्या धंद्यात सांभाळलेली जनावरे बाजाराच्या दिशेने चाललेली असतात. शेतकरी आनंदाने आपली जनावरे या बाजारात आणतो असे नाही. जी जनावरे आपण सांभाळली, ज्या जनावरांच्या मदतीने आपण शेतातील सर्व कामे केली ती जनावरे विकताना त्याच्या मनात घालमेल असते. आता पडत्या किमतीत विकायची आणि पुन्हा ऐन हंगामाच्या तोंडावर चढय़ा किमतीत घ्यायची याचीही सल असतेच. आता विकायची का तर आपल्याच्याने सांभाळ होणार नाही म्हणून. तीन-चार महिने पुरेल इतका चारा अनेकांकडे नसतो आणि तो विकत घेऊन जनावरांना खाऊ घालण्याची ऐपतही नसते. उन्हाळ्यात जिथे हंडाभर पाण्यासाठी कधी कधी तरसावे लागते तिथे या जनावरांना कुठून पाणी आणून पाजायचे अशीही चिंता सतावत असते. ज्या जित्राबावर आपला जीव असतो त्यांचे हाल बघवत नाहीत. त्यामुळे जिथे चारापाणी मिळेल तिथे तरी ही जनावरे जावीत अशी शेतकऱ्याची भावना असते.
.. जेव्हा आजच्या इतके यांत्रिकीकरण नव्हते तेव्हा गुरांची संख्याही जास्त होती. गुराढोरांनी गजबजलेले गोठे दिसायचे. आज ट्रॅक्टरने नांगरणी होते पण याच नांगरणीसाठी चार-सहा बलांचेही नांगर असत. आज मोबाइल सगळीकडेच आल्याने अंतर कमी झाले, पण जेव्हा मोबाइल नव्हते आणि बाहेरगावी शिकण्यासाठी आलेल्या मुलांना गावाकडून पत्रे यायची तेव्हा त्या पत्रात जनावरांचेही संदर्भ असायचे. आपल्या घरची गाय व्यालीय, तिने चांगला गोऱ्हा किंवा कालवड दिलीय. कधी कधी हे संदर्भ करुणही असायचे. एखाद्या चपळ किंवा अंगावर तेल पाजळल्याची तकाकी असणाऱ्या बलाचा पाय मोडलाय त्यामुळे तो दावणीतच अधू होऊन पडला आहे किंवा बरीच वष्रे सांभाळलेल्या एखाद्या जनावराला बाजार दाखवलाय. अशा वेळी गावाकडून आलेले ते पत्र वाचल्यानंतर येणारा अनुभव सुन्न करणारा असे. आता अशी पत्रे कुणाला येत नाहीत, पण या दिवसांत जनावरांचे बाजारात येणे थोडेच थांबले आहे. ..जसजसा उन्हाळा तापत जाईल तसतसे आठवडी बाजाराच्या दिशेने असे जनावरांचे कळपच्या कळप हाकारताना अनेक जण रस्त्याने दिसू लागतात. महाराष्ट्रात जनावरांचे काही बाजार प्रसिद्ध आहेत. मराठवाडय़ात लातूर जिल्ह्य़ातला हाळी, पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी पट्टय़ातला दिघंची, विदर्भातला घाटंजी असे अनेक सांगता येतील. या गुरांच्या बाजारात शेजारील राज्यांतलेही विक्रेते-खरेदीदार येत असतात. या शिवाय प्रत्येक ठिकाणी गुरांचा आठवडी बाजार असतोच.
जनावरांच्या बाजारात जसे विकणारे असतात तसेच खरेदीदारही. जे ढोर आपल्या दावणीला वर्षांनुवष्रे जगले आहे ते कसायाच्या हाती देऊ नये असा एक शिरस्ता पाळला जातो. दूध आटलेल्या काही भाकड गायी विकताना तर हे आवर्जून पाहिले जाते. ज्या गायी-म्हशीच्या दुधाने घरची लेकरे लहानाची मोठी झाली त्या विकताना चार पसे कमी आले तरी चालतील पण कसायला विकणे नको, असा विचार करणारीही माणसे आहेत. जनावरांच्या बाजारात या भावनेलाही विकणारे महाभाग असतातच. एखाद्या गावाकडच्या माणसाने जनावरासह बाजारात पाऊल ठेवले की दलाल लगेच त्याला गाठणार. बरे या दलालांचा वेशही शेतकऱ्याला पाझर फोडणारा. धोतर नेसलेले, कपाळावर अष्टगंध लावलेले हे दलाल (यांना काही भागात हेडे असेही नाव आहे) विक्रीसाठी जनावर आणलेल्या शेतकऱ्याजवळ बसणार. किती रुपयांना जनावर सोडायचे, असे विचारणार. एकदा किंमत जाणून घेतल्यानंतर घासाघीस करणार. सौदे जमवणारे दलाल दोन्ही बाजूंनी असतात. या दोन दलालांमध्ये जो सौदा होतो तो शेतकऱ्याला कळत नाही. या दोघांची आपसात बोलण्याची भाषा वेगळी. .. ही भाषा ‘पारुशी’. ती कोणालाच उमगत नाही. शेतकरी थेट आपले जनावर एखाद्या दुसऱ्या खरेदीदारास विकायला गेला तर ते यात मोडता घालणार. बाजारात जनावरांची बहुतांश खरेदी ही या दलालांमार्फत होते. सौद्याची घासाघीस करताना हे हेडे आणाभाका वाहतात. गळ्याची, आईची शपथ पावलोपावली घातली जाते. ज्याच्या गळ्यात जनावर अडकवायचे आहे त्याला म्हणणार असे जनावर तुला जन्मात शोधूनही मिळणार नाही. रुमालात बांधलेल्या चपला असतात, तो रुमाल डोक्यावर ठेवून ‘भाकरीची आण, तुम्हाला खोटं सांगत नाही’ अशी ग्वाही दिली जाते. कधी कधी जनावर विकणारा हटून बसलेला असतो. खाटकाला विकायचे नाही, जो सांभाळणारा आहे त्यालाच देऊन टाकायचे. ही त्याची इच्छा असते. अशा शेतकऱ्यांचे दुबळेपण हेडे लगेचच हेरतात. ‘ढोर नांदत्या घरात चाललंय, शे-दोनशाकडं पाहू नका, दुभतं जनावर खाटकाच्या हाती देण्यापेक्षा भरल्या घरात द्या. खाटकाच्या हाती ढोराचं दावं देण्यापेक्षा चिल्यापिल्यांच्या मुखात दूध जाईल,’ असे बोलल्यानंतर शेतकरी लगेच विरघळतो. पसे घेऊन दाव्यासकट जनावर हवाली करतो. जरा पुढे गेल्यानंतर आपली फसगत झाली हे लक्षात आले तरी इलाज नसतो. दोन दलाल आपसात बोलून जनावर विकून टाकतात. अगदी शेतकऱ्याला सांगितले जाते तसे ते जनावर कोणाच्या तरी दावणीलाच जाईल याची खात्री देता येत नाही.
..उन्हाळ्यात शेतकऱ्यांना जनावरांची चिंता लागू नये म्हणून छावण्या उभारल्या जातात. शेतकरी जनावरांसह छावणीत दाखल होतो. जनावरांच्या चारापाण्याची चिंता मिटल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर असते. गुरांची सोय लागली असे म्हणत तो स्वत:लाच धीर देतो. जनावरे दावणीला ठेवली तर चारापाणी मिळत नाही आणि छावणीला नेऊन बांधली तर उन्हाळ्यातली मशागत होत नाही. अशा वेळी मग अनुदान छावणीला देण्याऐवजी दावणीला द्या अशी मागणी पुढे येते. जनावरांसाठी चारा डेपो उघडले जातात. पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्याच लाभार्थी कार्यकर्त्यांना ही कंत्राटे मिळतात. या चारा डेपोतही गरव्यवहार झाल्याच्या बातम्या येतात. अगदी छावणीतल्या गुरांच्या शेणातही गरव्यवहार झाल्याची चर्चा होते. मुक्या जनावरांना काय माहीत? ..त्यांच्याच नावाने हे सगळे चालू आहे. ‘मुकी बिचारी कुणीही हाका’! छावण्यांमध्ये जनावरांच्या नोंदीच कधी कधी बोगस आढळतात. प्रत्यक्षात जनावरे कमी पण कागदावर नोंदलेली जनावरे अधिक. एरवी चारा-पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या जनावरांच्या हे गावीही नसणार की त्यांच्या नावाने काय काय सुरू आहे!
कधी कधी आसपासच्या गावांत जर जनावर विकले गेले तर ते बिचारे नव्या मालकाच्या घरी जाता जायला तयार होत नाही. अनेकदा फिरून मूळ खुंटय़ावर येऊन उभे राहते. जनावरांच्या बाजारातली हातचलाखी, छावण्यांमधल्या बोगस नोंदी, चारा डेपोतला गरव्यवहार हे पाहिले म्हणजे बहिणाबाई चौधरी यांचीच आठवण येते. ‘अरे माणसा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरं गोठय़ातलं जनावर.’ तर अशी ही मुक्या जिवांची कैफियत. ..उन्हाळा सुरू झालाच आहे, तो जसजसा तापत जाईल तसतसे जड पावलांनी गुरांना हाकारले जाईल, जनावरांचे बाजार गर्दीने फुलू लागतील.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
maval lok sabha mahayuti marathi news, shrirang barne latest news in marathi
श्रीरंग बारणे यांच्या अडचणी वाढल्या, चिंचवडमधून भाजपाचा विरोध कायम
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?