दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात बळी ठरलेल्या मुलीला अमेरिकेने जागतिक धैर्य पुरस्कार जाहीर केल्यानंतर, आठच दिवसांत या  प्रकरणातील प्रमुख आरोपी रामसिंह याचा तिहारच्या तुरुंगातील संशयास्पद मृत्यू भारताची जागतिक पातळीवर लाज घालवणारा आहे. ही आत्महत्या की हत्या, या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर रामसिंहच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतरही मिळालेले नाही. या तपासणी अहवालात त्याच्या देहावर कोणत्याही जखमा नसल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याने गळफास लावून घेतला असल्याचे सिद्ध झाले असले, तरी आरोपीच्या वकिलांनी मात्र त्यास आक्षेप घेताना रामसिंहच्या देहावर अनेक व्रण पाहिल्याचे म्हटले आहे. तुरुंगात डांबून ठेवलेल्या या आरोपीला न्यायालयासमोर जाण्यापूर्वीच मृत्यू येणे, ही घटना भारतातील तुरुंग व्यवस्थापनाचे वाभाडे काढणारी आहे, हे तर निश्चितच; परंतु त्यामुळे तुरुंगातील आरोपींवर करडी नजर ठेवणारी यंत्रणा किती कुचकामी आहे, हेही सिद्ध करणारी आहे. रामसिंहचा मृत्यू पहाटे ४.३० ते ४.४५ या काळात झाल्याचे उत्तरीय तपासणीचा अहवाल सांगतो. मात्र त्याच्या मृत्यूची पहिली खबर तिहार तुरुंगातील पोलिसाला पहाटे ५.४५ वाजता मिळाली. याचा अर्थ रामसिंह मृत पावल्यानंतर तासभर त्याच्याकडे सुरक्षा रक्षकाचे लक्षही गेले नाही, असा होतो. तुरुंगातील गैरप्रकार आणि गैरव्यवहार याबद्दल यापूर्वीही अनेकदा जाहीर आरोप झाले आहेत. ज्या घटनेमुळे भारतभर जनक्षोभ उसळला आणि संसदेला बलात्कारासारख्या घटनेतील शिक्षेबाबत, बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या वयाबाबत कायदे बदलावे लागले, त्या घटनेतील प्रमुख आरोपी तुरुंगातील हलगर्जीपणामुळे मृत पावतो, हे किती निर्लज्जपणाचे आहे, याची जराशीही जाणीव केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवेदनात दिसली नाही. ‘अतिमहत्त्वाच्या’ आरोपीबाबत अशी काळजी का घेतली गेली नाही, याचा शोध घेण्यासाठी तपास करण्याचे आदेश देऊन गृहमंत्र्यांनी आपले अंग काढून घेणे, हेही तेवढेच टीकास्पद आहे. रामसिंहला ज्या खोलीत ठेवले होते, त्या खोलीची उंची आणि त्याची शारीरिक उंची पाहता हा नैसर्गिक मृत्यू असणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. रामसिंहच्या कुटुंबीयांनी तर हा खून असल्याचा आरोप केला आहे. तुरुंगातील आरोपींच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर असतो, याचे भान अनेकदा नागरिकांनाही असत नाही. रामसिंहच्या मृत्यूमुळे सरकारवर टीका करणाऱ्या नागरिकांपैकी अनेकांनी मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात सापडलेल्या कसाबच्या सुरक्षेवरील खर्चावर जाहीर टीका केली होती. कसाब जिवंत राहणे, ही न्यायप्रक्रियेची गरज होती. त्यासाठी त्याच्या सुरक्षेवर होणारा खर्च न्याय्य होता, याची जाणीव त्या वेळी टीका करणाऱ्यांना नसावी. आपल्या देशावर अतिरेकी हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला न्यायालयाद्वारे शिक्षा मिळणे, हे राष्ट्राच्या नैतिकतेसाठी महत्त्वाचे असते, याचे भान न राहिल्यामुळे कसाबवर झालेल्या खर्चाचेच भांडवल केले गेले. त्यापैकीच काही आता मात्र रामसिंहच्या सुरक्षेबाबत कानाडोळा झाल्याबद्दल टीका करायला पुढे सरसावले आहेत. रामसिंह आत्महत्या करू शकतो, असे गृहीत धरून त्याच्यावर पाळत ठेवणारी यंत्रणा निर्माण करण्यात आली होती. मात्र काही काळाने कोणत्याही कारणाविना ही यंत्रणा का काढून घेण्यात आली, याचे उत्तर मिळायला हवे. गुन्हेगार तुरुंगांऐवजी बाहेरील जगातच अधिक सुरक्षित असतात की काय, असा प्रश्न पडावा, अशी देशातील तुरुंगांची सध्याची अवस्था आहे. दिल्लीतील सामूहिक बलात्काराने जाग्या झालेल्या संवेदनांना रामसिंहच्या मृत्यूमुळे धक्का बसला आहे. सरकारने त्यावर पांघरूण घालण्याऐवजी आपली चूक मान्य करून ती सुधारण्यासाठी कडक पावले टाकणेच आवश्यक आहे.