प्रजासत्ताक दिनाचे खास पाहुणे बराक ओबामा यांनी जाता जाता भारताला राज्यघटनेची आठवण करून देत धार्मिक सहिष्णुतेवरून कानपिचक्या दिल्या. नंतर काही दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गिरिजाघरे आणि ख्रिस्ती धर्मोपदेशक यांच्यावर होत असलेल्या हल्ल्यांवरून हिंदू कट्टरतावाद्यांना चार शब्द सुनावले; परंतु त्याचा फार काही परिणाम झाल्याचे दिसत नसून, त्यानंतरही ख्रिस्ती प्रार्थनास्थळांची नासधूस करण्याचे प्रकार घडत आहेत. पश्चिम बंगालमध्ये परवा घडलेला प्रकार तर त्या सर्वाहून अत्यंत गंभीर आणि घृणास्पद. तेथील एका कॉन्व्हेंट शाळेतील वयोवृद्ध जोगिणीवर दरोडेखोरांनी बलात्कार केला. त्यासंबंधी आता जी काही माहिती उजेडात येत आहे त्यावरून या घटनेकडे केवळ फौजदारी गुन्हा या दृष्टीने पाहता येणार नाही. पाच जणांनी दरोडा घातला. काही रक्कम चोरली. शाळेतील सामानाची मोडतोड केली, येथवर ‘सामान्य’ दरोडा या रकान्यात बसणारे ते कृत्य होते; परंतु त्यानंतर त्यांनी त्या जोगिणींना तुमच्यातील वरिष्ठ कोण आहे, असे विचारले. त्यांनी त्या ७१ वर्षीय वृद्धेकडे बोट दाखविले, तसे त्या दरोडेखोरांनी बाजूच्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हे सूडाचे कृत्य होते. त्यामागे धार्मिक द्वेषभावना होती की काय हे अद्याप समजू शकलेले नाही. कदाचित जेव्हा त्या दरोडेखोरांना अटक होईल तेव्हाच ते स्पष्ट होईल. अन्य प्रकरणांत मात्र धार्मिक द्वेषभावना उघडच दिसते. जोगिणीवरील बलात्काराचे प्रकरण हे तृणमूल सरकारला बदनाम करण्यासाठी कम्युनिस्ट आणि भाजपाईंनी रचलेले कारस्थानच असल्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप जेवढा हास्यास्पद आहे तेवढेच गिरिजाघरांवरील हल्ले चोरीच्या प्रकरणांतून झाल्याचे म्हणणे हेही मूर्खपणाचे आहे. मात्र तसा कांगावखोरपणा होताना दिसतो. अर्थात हरियाणातील एका प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्ल्याबाबत तेही म्हणता येणार नाही. तेथील क्रॉसची मोडतोड करून तेथे हनुमानाची मूर्ती बसविण्यात आली. ही घटना सरळच धार्मिक द्वेषातून घडली असून, ती करणाऱ्यांचे नाते सांगायचे तर ते पाकिस्तानातील तालिबानींशी सांगता येईल. त्या देशात परवाच दोन गिरिजाघरांवर मुस्लीम सनातन्यांनी बॉम्बहल्ले केले. हे असे हल्ले केले जातात ते त्या-त्या समाजांमध्ये भयगंड निर्माण करण्यासाठी. हा देश तुमचा नाही, तुम्ही दुय्यम दर्जाचे नागरिक आहात, हे सांगण्यासाठी. त्यात या धर्माध शक्ती यशस्वी होताना दिसत आहेत, हे अधिक भयंकर आहे. पंजाबमधील खलिस्तान्यांच्या राष्ट्रद्रोही चळवळीचा बीमोड करण्यात मोलाची कामगिरी बजावणारे ज्युलिओ रिबेरो यांच्यासारखे ज्येष्ठ अधिकारी जेव्हा ‘मला मी हिट लिस्टवर असल्यासारखे वाटत आहे,’ अशी भावना ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील लेखाद्वारे व्यक्त करताना दिसतात, ‘आपल्याच देशात आपणांस परक्यासारखी वागणूक मिळाल्यासारखे दिसत आहे,’ असे म्हणतात, तेव्हा ती कोणा ‘स्युडो-सेक्युलरा’ची भावना असल्याचे म्हणत त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी धार्मिक तेढ दर्शविणाऱ्या घटनांबद्दल मंगळवारीच व्यक्त केलेल्या चिंतेमध्ये या काळजीचा समावेश आहे की नाही हे कळावयास मार्ग नाही. एक मात्र खरे, की तो असावयास हवा. देशाची धार्मिक एकात्मतेची वीण तुटू नये याची चिंता देशाच्या पंतप्रधानांना असायलाच हवी.