किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँ काय किंवा जयपूर घराण्याचे संस्थापक अल्लादिया खाँ काय, त्यांना ज्या शैलीचा साक्षात्कार झाला, तो त्यांच्या शिष्यांमध्ये त्यांना संक्रमित करता आला. हुबेहूब त्यांच्यासारखे गाणारे शिष्य त्यांनी तयार केले नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिष्यांनी त्या शैलीमध्ये स्वत:चे काही गुण ओतले आणि ती समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. असा हुनर असणारे कलावंत शिष्य म्हणून लाभणारी घराणी काळाच्या ओघात टिकली आणि त्यात सौंदर्यपूर्ण बदलही होत राहिले.
कलांमधील अंतर्गत बदल स्पष्टपणे पुढे यायला आणि त्यांचे वेगळेपण जाणवायला वेळ लागतो. त्याचे कारण हे बदल घडत असताना सहजी लक्षात येत नाहीत. ते घडवणाऱ्या कलावंताला त्याबद्दलच्या सर्जनाची पुरेशी कल्पना असली, तरीही त्याचे अंतिम चित्र निर्माण व्हायला वेळ लागतो. सर्जनाची ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी घडय़ाळाचे काटे आणि दिनदर्शिका उपयोगी पडत नसतात. कलावंताच्या आंतरिक ऊर्जेतून आणि सततच्या विचारमंथनातून ते घडत असते. असे करून पाहू या, तसे करून पाहू या, असे प्रयोग होत असतात, ते स्वत:लाच आवडतात किंवा आवडत नसतात. हे ठीक आहे किंवा हे असुंदर आहे, याबद्दलची जी जाणीव असते, त्यामागे त्या कलावंताची सौंदर्याची अनुभूती असते. प्रत्येकाची सौंदर्यदृष्टी वेगळी असते. त्यामध्ये सौंदर्याबद्दलचा एक ठोस विचार असतो. संगीताच्या क्षेत्रातच काय, पण सगळ्याच कलांमध्ये हे सातत्याने घडत आले आहे. संगीतातील घराण्यांचा उगम हा या वेगवेगळ्या सौंदर्यवादी दृष्टीतून झाला आहे. जेव्हा एखादा कलावंत संगीतात स्वत:ची नवीन शैली प्रस्थापित करत असतो, तेव्हा त्याच्यासाठी आतून येणाऱ्या सादाला मिळणारा प्रतिसादही तेवढाच महत्त्वाचा असतो. मला हे आवडते म्हणून मी तसेच संगीत करणार, हा हट्ट असला, तरी त्याला रसिकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाशिवाय पूर्णार्थ प्राप्त होत नाही. एखादी नवी गोष्ट जेव्हा मोठय़ा समूहाला आवडू लागते, तेव्हा ती गोष्ट पुन:पुन्हा करण्याचा मोह अनावर असतो. स्वत:च्या सौंदर्यवादी दृष्टीला तपासत असतानाच जे नवनिर्माण होते आहे, ते पुन्हा सादर करताना, तेवढय़ाच ताकदीने करता येणार आहे किंवा नाही, याचाही विचार कलावंताच्या मनात सतत असतो. शैलीची निर्मिती तात्कालिक नसते आणि त्यामध्ये सातत्य टिकवून ठेवणारे काही गुणधर्म असावे लागतात. शैली सातत्य हा त्यामुळेच एक अतिशय आवश्यक गुण असतो. भारतीय संगीतातील घराणी ही या शैलींची नावे आहेत. त्या नावांवरून शैली लक्षात यावी, असेही काही नाही. बहुतेक घराण्यांची नावे तर स्थळनिदर्शकच आहेत. म्हणजे, ग्वाल्हेर, कैराना (किराणा), जयपूर, इंदौर, दिल्ली, पतियाळा, भेंडीबजार, रामपूर सहस्वान ही सगळी नावे स्थळांची आहेत. तरीही ही नावे त्या घराण्यातील कलावंतांची कलात्मक अभिव्यक्तीची ओळख असतात.
अभिजात संगीताच्या दरबारात या नावांमागे शैलीचे एक देदीप्यमान वलय असते. किती तरी दशके ही घराणी एका विशिष्ट शैलीचा आग्रह धरताना दिसतात. त्या शैलीचे वेगळेपण टिकविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. त्यासाठी कित्येक वेळा कठोर होतात. शैली म्हणजे घराणे असे केवळ नाव घेऊन सादर करता येत नाही. त्यासाठी गुरूकडून त्या घराण्याची दीर्घकाळ तालीम घ्यावी लागते. त्या शैलीचे वळसे, खाचाखोचा आणि आकार-उकार नीट समजावून घ्यावे लागतात, ते आपल्या गळ्यात उतरवावे लागतात. गुरूकडून हे अतिशय कडक शिस्तीत घडून यावे लागते. स्वर कसा लावायचा, त्याचा पोत काय असला पाहिजे, त्याचा झोत कुठे असला पाहिजे, रागाची मांडणी करताना कशाला महत्त्व द्यायचे, बंदिशीची रचना, त्यातील शब्दांचा स्वरांशी असलेला संबंध, त्या शब्दांच्याच आधारे होणारी बोलबढत, बोलतान, त्यानंतरची तान या साऱ्या गोष्टी शैलीमध्ये जसाच्या तशाच उतरणे आवश्यक असते. शैलीतील हे सातत्य पिढय़ान्पिढय़ा टिकून राहात असते; पण त्याहीपलीकडे प्रत्येक शैलीमध्ये तिची ओळख सांगणारा एक केंद्रबिंदू किंवा डीएनएसारखा मूलकण असतो. तंत्र म्हणून गाणे कसे गायचे हे समजले, तरीही घराण्याची शैली गळ्यात उतरल्याशिवाय त्या तंत्राच्या व्याकरणाला सौंदर्याचा स्पर्श होत नाही. संगीत ही एकमेव गोष्ट अशी असेल, की जी गुरुमुखातून शिकण्याशिवाय पर्याय नसतो. केवळ ऐकून संगीत सादर करता येईलही, मात्र त्यामधील सौंदर्याचा प्राण सततच्या रियाजाशिवाय ओतता येत नाही. मागील शतकामध्ये घराण्याच्या या गायकीबद्दल कलावंतांमध्ये कमालीचा अभिमान होता. इतका की, दुसऱ्या घराण्याचे गाणे ऐकण्याचीही शिष्यांना बंदी असे. त्या ऐकण्यातूनही असे संस्कार होऊ नयेत, जे आपल्या शैलीत विरघळणार नाहीत, अशी काळजी त्यामागे होती. हा दुरभिमान काही वेळा पराकोटीलाही गेला आणि त्यामुळे संगीताचे काही भले झाले नाही. गुरुमुखातून विद्या संपादन केल्यानंतर त्याच्या परवानगीने किंवा मान्यतेनेच ती सादर करता येणाऱ्या त्या काळातही बंडखोर शिष्य निपजले. त्यांनी घराण्याची तालीम घेत असतानाच त्यात नवे प्रयोग करायला सुरुवात केली आणि त्या प्रयोगशाळेतूनही काही प्रयोग यशस्वी झाले. गुरूकडून जी विद्या मिळते, त्यात केवळ शिस्तच नसते, तर स्वत:ला आतमध्ये डोकावून पाहण्यासाठी आवश्यक असणारी नजर त्यातून तयार होत असते. स्वरांच्या अंगणात स्वप्रतिभेला धुमारे फुटणाऱ्या अशा अनेक कलावंतांनी आपले गाणे खूप श्रीमंत केले आणि त्याने त्या घराण्याची शैली अधिकाधिक उजळूनच निघाली. हुबेहूब गुरूसारखे गाता येणे म्हणजे नक्कल झाली. अभिजात संगीतात अशी नक्कल दुय्यमच मानली गेली.
याचा अर्थ असा, की घराण्याच्या शैलीचा केंद्रबिंदू ढळू न देता, त्यामध्ये नवे प्रयोग करत राहून एका नव्या उपशैलीला जन्म देणे. किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खाँ काय किंवा जयपूर घराण्याचे संस्थापक अल्लादिया खाँ काय, त्यांना ज्या शैलीचा साक्षात्कार झाला, तो त्यांच्या शिष्यांमध्ये त्यांना संक्रमित करता आला. हुबेहूब त्यांच्यासारखे गाणारे शिष्य त्यांनी तयार केले नाहीत. त्यामुळे त्यांच्या शिष्यांनी त्या शैलीमध्ये स्वत:चे काही गुण ओतले आणि ती समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. असा हुनर असणारे कलावंत शिष्य म्हणून लाभणारी घराणी काळाच्या ओघात टिकली आणि त्यात सौंदर्यपूर्ण बदलही होत राहिले. तरीही त्या शैलीच्या केंद्रबिंदूमुळे त्या गाण्याची ओळख त्या घराण्याशीच जोडली गेली. ज्या काळात घराण्याच्या अभिमानाचे रूपांतर दुरभिमानात झाले, त्याच काळात या जगात तंत्रज्ञानाची पहाट होत होती. ध्वनिमुद्रणाबरोबरच ध्वनिक्षेपणाचे तंत्रज्ञानही अवतरत होते. गाणे म्हणजे पाण्यावरची अक्षरे हे खरे असले, तरी ते पुन्हा ऐकण्याची सोय ध्वनिमुद्रणाच्या तंत्राने करून ठेवली. एकाच वेळी शेकडो रसिकांपर्यंत आपला आवाज पोहोचविण्यासाठी गळ्यावर पडणारा ताण ध्वनिक्षेपणाने संपला होता. गाण्यातील अगदी बारीक जागाही सुस्पष्टपणे ऐकण्याच्या या सुविधेमुळे कलावंताच्या गळ्याला नुसता आराम मिळत नव्हता, तर त्यांची संवेदनशीलताही प्रवाही होऊ शकत होती. अगदी याच काळात जागतिक सत्तास्पर्धेचे वारे फिरू लागले होते आणि जगातल्या सगळ्यांनाच अस्तित्वाच्या भीतीने गोठवले होते. त्याचा परिणाम अर्थकारणावर होणेही स्वाभाविक होते. अशाही परिस्थितीत घराण्याचा दुरभिमान राखणाऱ्यांना आपले गाणे टिकविण्यापेक्षा आपल्या शैलीचीच काळजी पडली होती. तंत्रज्ञानाने आणि आर्थिक, सामाजिक कारणांमुळे संगीतावर परिणाम होत होते, मात्र ते समजून घेण्याची त्यांची फारशी तयारी नव्हती. दरबारातील संगीत आता समाजात पोहोचू लागल्यामुळे संगीत ऐकण्याची नवी सोय संगीत परिषदांच्या रूपाने पुढे येत होती. इतर घराण्यांमधील दिग्गज कलावंतांना ऐकण्याची ही संधी रसिकांपेक्षाही कलावंतांसाठी अधिक महत्त्वाची होती. कलावंत आपल्या कलेचा विचार कसा करतो, याचा अभ्यास करण्याची अशी संधी त्यापूर्वी मिळतच नव्हती. परिणामी आपली शैली इतर शैलींच्या संदर्भात तपासून घेणे शक्य होऊ लागले. त्यातील सौंदर्याच्या विचाराची छाननी होऊ लागली. प्रतिभावंत कलावंतासाठी ही पर्वणीच होती. त्यांनी आपली शैली नव्याने घडविण्यासाठी एक वेगळी मूस तयार करण्यास सुरुवात केली आणि त्यातून नवे गाणे निर्माण होऊ लागले. घराण्यांच्या तटबंदी गळून पडू लागल्या आणि कलावंताचे कलाविश्वही मुक्त होऊ लागले. आपले गाणे इतरांपेक्षा नुसते वेगळे असण्यापेक्षा, ते अधिक सौंदर्यपूर्ण कसे होईल, याचा ध्यास कलावंतांनी घेतला. अशा परिस्थितीत खरे तर घराण्यांच्या गायनशैलींची सरधोपट सरमिसळ व्हायला हवी होती.
ही सरमिसळ झाली नाही आणि मूळच्या शैलीतील डीएनएचा मूलकण जराही ढळला नाही. आजही विशिष्ट घराण्याचे कलावंत हा मूलकण आपल्या संगीतात टिकवून ठेवण्याचा प्राणपणाने प्रयत्न करीत असतात. मानवी जीवनातील मूलभूत प्रेरणांचा ध्यास नव्याने प्रतिबिंबित होत असलेल्या संगीतातही तेवढय़ाच ताकदीने व्यक्त होताना दिसतो. जगण्याच्या पद्धती बदलल्या. जगातील अनेक संस्कृती वेगवेगळ्या कारणांनी एकमेकांच्या जवळ आल्या. काहींनी एकमेकांच्या हद्दीत प्रवेशही मिळवला. तरीही घराण्यांच्या भिंती ढासळून कोलमडल्या मात्र नाहीत!