सांगणारा केवळ आपल्या हितासाठीच कळकळीनं सांगत आहे. त्यात त्याचा काही स्वार्थ नाही, हे जाणवलं तरी ते कठोर सांगणं लोक सहन करतात. त्यात जर कठोरपणे सांगणाऱ्याचं भगवद्अनुसंधानही जाणवलं तर? मग अंतकरण दुखावणार नाहीच. बरेचदा काय होतं? साधनेनं एक कठोरपणा येतो. त्यातून दुसऱ्याला कठोरपणे सांगणं साधू लागतं पण त्याला भगवंताच्या अनुसंधानाचा पाया नसेल तर त्या सांगण्यात निस्वार्थता असतेच, असे नाही. ‘दुसऱ्यानं माझं सांगणं ऐकलंच पाहिजे, माझ्या सांगण्यानुसार वागलंच पाहिजे,’ हा हट्टाग्रहही त्यात येऊ लागतो. अगदी लहान मुलं जेव्हा रडत असतात आणि हट्ट करत असतात तेव्हा त्यांच्याशी गुरुदेव ज्या अपार प्रेमानं वागत असतात, ते पाहूनही खूप काही शिकता येतं. एक साधक होते. त्यांनी एकदा आपल्या लहान पुतणीचा हट्ट मोडून काढताना तिला मारलं. ती रडू लागली आणि म्हणाली, ‘एवढं महाराज महाराज करतो आणि मला मारलं.’ त्या साधकाला एकदम वाईट वाटलं. त्यांनी हजारो किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराजांना दूरध्वनी केला आणि काय घडलं वगैरे न सांगता एवढंच बोलले की, महाराज माझी चूक झाली. तिकडून गुरूजी म्हणाले, ‘‘ती लहान पोर तिला कशाला मारायचं? आणि माझं ऐकत नाही म्हणून अहंकारानं मारणं तर फार वाईट!’’  तेव्हा आपण दुसऱ्याशी कठोरपणे वागतो, बोलतो आणि त्यातून त्याच्या हितासाठीच आपण हे करीत आहोत, असं अगदी प्रामाणिकपणे मानतोही. पण प्रत्यक्षात त्या कृतीतून आणि बोलण्यातून आपला अहंकार ज्वालामुखीसारखा खदखदत ओसंडत असतो. जेव्हा मी निस्वार्थी होईन आणि भगवंताचं अनुसंधानही मला साधेल तेव्हाच सत्य तेच बोलूनही, सत्य तीच कृती करूनही दुसऱ्याचं अंतकरण दुखावलं जाणार नाही! अहंकार हा वाईटच. राजस आणि तामस अहंकार उघडपणे जाणवतात पण सात्त्विक अहंकार फार खोलवर रुतून असतो. श्रीमहाराजही म्हणूनच सांगतात की, ‘‘सात्त्विक कृत्ये चांगली खरी, पण त्यात अभिमान ठेवला तर फार वाईट. एक वेळ वाईट कृत्ये परवडली; केव्हा तरी त्यांचा पश्चात्ताप होऊन मुक्तता तरी होईल. पण सात्त्विक कृत्यातला अभिमान कसा निघणार?’’ साधनेने राजस आणि तामस अहंकार एकवेळ कमी होत जातो पण सात्त्विक अहंकार वाढण्याचा मोठाच धोका असतो. आपण श्रीमहाराजांचे आहोत म्हणजे कुणी वेगळे आहोत, आपण उपासना करतो म्हणजे उपासना न करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहोत, असा भाव अलगदपणे मनात शिरकाव करतो. मग या श्रेष्ठतेच्या भावनेतूनच आपण लोकांना सांगायला लागतो, ऐकवायला लागतो, काय करा हे समजावू लागतो. त्यातूनच मग मनात येऊ लागतं की परमात्म्याच्याच भक्तीत मी जीवन व्यतीत करीत आहे तर परमात्म्यानं मला त्याची शक्तीही द्यावी. मग लोककल्याणाचे काम मी अधिक ताकदीने करू लागेन; नव्हे हे काम म्हणजेही तर त्याचीच भक्ती आहे! परमात्म्याचेच काम करायला त्याच्याकडून शक्तीची अपेक्षा करण्यात गैर काय?