आपला आनंद हा कारणाशिवायचा नाही आणि कारणाचा आनंद हा कारणापुरताच टिकतो. त्यामुळे बाह्य़ परिस्थितीतून आनंद मिळविण्याची आणि त्यासाठी देह हेच माध्यम असण्याची आपली सवय ही वय वाढत जातं तसतशी घातक ठरते. आपण देहाच्या जोरावर हिरिरीने कित्येक कामं करतो. दहा लोकांना भेटतो. दहा ठिकाणी फिरतो. आपलं वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्य सततच्या धावपळीनं पूर्ण भरलं असतं. या धावपळीतूनच आपल्याला आनंद मिळत असल्याचा भ्रम आपण जोपासत असतो. जसजसा देह थकू लागतो आणि या धावपळीला साथ देईनासा होतो तेव्हा सक्तीचा एकाकीपणा वाटय़ास येतो. त्यातही सामाजिक, आर्थिक पातळीवर आपल्या अस्तित्वाला दुनियेच्या लेखी काही महत्त्व नसेल तर दुनियेला तुमच्याशी काही कर्तव्यही नसतं! आपण दहा ठिकाणी जाऊ शकत नाही, दहा लोकांना भेटू शकत नाही म्हणून तुमच्याकडे धावत यायला कुणालाही फुरसत नसते. घरातही स्थिती काही फारशी वेगळी नसते. घरात माणसं एकत्र राहत असतात पण ऐक्यतेनं राहत असतातच, असं नव्हे. तेव्हा बाह्य़ातून आनंद मिळविण्याच्या आपल्या वृत्तीला हादरे बसू लागतात. मग जगातल्या कोणत्याही गोष्टीचा लोभ नसताना आणि तिचा उपभोगही घेता येत नसताना आणि शरीर पूर्ण थकलं असतानाही पूर्ण समाधान टिकविणाऱ्या भाऊसाहेबांची थोरवी जाणवू लागते. देहाची कशीही अवस्था असली तरी आनंदात राहता येते, हे दाखविण्यासाठी श्रीमहाराजांनी त्यांचा आदर्श लोकांपुढे ठेवला होता! मग भाऊसाहेबांनी असं काय केलं की हे समाधान त्यांना लाभलं? त्यांनी जीवनातली सर्व चिंता महाराजांच्या पायी वाहिली आणि त्यांना आवडतं म्हणून नाम घेतलं! आयुष्यात वयपरत्वे, कालपरत्वे, परिस्थितीपरत्वे एकाकीपणा माणसाच्या वाटय़ाला येतोच. शरीरानं धावपळ सोसते तोवर हा एकाकीपणा आपल्या बाजूने टाळता येतो. तो अटळ होतो तेव्हा मात्र असह्य़ होतो. जगण्यातली उमेदच संपल्यासारखं वाटून माणूस रूक्षपणानं जगू लागतो. मग जोवर शरीराची पूर्ण साथ आहे तोवरच ‘एकांता’ची सवय आणि गोडी मनाला लागली तर सक्तीच्या एकाकीपणाची जागा समाधानानं भरलेला एकांत घेऊ शकेल! श्रीमहाराजांच्या बोधाचाच आधार घ्यायचा तर, ‘मी’ आहे तोवर ‘मी’पणा आहे. ‘मी’पणा आहे तोवर हवं-नकोपण आहे. हवं-नकोपण आहे तोवर हवं ते मिळविण्याची आणि नको ते टाळण्याची इच्छा आहे. इच्छा आहे तोवर कृतीसाठी धडपड आहे. माणसाला कर्माचं पूर्ण स्वातंत्र्य असलं तरी त्या कर्माचा परिणाम वा कर्माचं फळ हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. अर्थात कर्मफळाबाबत अनिश्चितता आहे. माणसाला मात्र नुसत्या कर्तव्यात गोडी नाही, त्या कर्तव्याच्या फळात त्याला अधिक गोडी आहे. अनेकदा त्या फळाकडेच लक्ष लागल्यानं कर्मही बिनचूक होत नाही. थोडक्यात माणसाची ही सारी धडपड ‘मी’ या एकाच पायावर उभी आहे. त्या एका ‘मी’चा अंत हाच खरा एकांत आहे! तो ‘एकांत’ साधत नाही तोवर खरं समाधान नाही.