श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘आनंदाचा शोध संतांनी केला. राम कर्ता मानून स्मरणात राहणे हाच आनंदाचा खरा मार्ग होय. आपली आनंदाकडे स्वाभाविक ओढ आहे. आपण आनंदाला कारणे निर्माण करतो. त्यामुळे मध्ये आडकाठी आपणच आणतो. कारणाचा आनंद कारणापुरता टिकतो. ज्या भगवंताजवळ आनंद राहतो त्याचे होऊन राहिले तरच अखंड आनंदी होता येईल.’’ आपणही जन्मापासून अखेपर्यंत आनंद मिळावा म्हणूनच धडपडतो. संत मात्र तो आनंद अखंड मिळवतात आणि दुसऱ्याला देऊही शकतात. याचं कारण आनंद मिळवण्याचा आपला मार्ग आणि त्यांचा मार्ग भिन्न असतो. ज्या अर्थी आपल्याला अखंड आनंद मिळत नाही आणि त्यांना मिळतो, त्या अर्थी आपला मार्ग चुकीचा असला पाहिजे आणि त्यांचाच बरोबर असला पाहिजे. एखाद्या झाडाची जोपासना करायची असेल तर त्याच्या प्रत्येक पानाला पाणी घालण्याची धडपड जशी बिनकामाची असते, तसा आपला आनंदाचा शोध असतो. झाडाच्या मुळाशीच पाणी घातलं तर ते संपूर्ण झाडाला आपोआप पोहोचतं, त्याप्रमाणे या विश्वाचं जो मूळ आहे त्या परमात्म्याचीच प्राप्ती संत करून घेतात आणि त्यामुळे अखंड आनंदाचं झाडंही त्यांच्या जीवनाच्या अंगणात बहरत असतं. झाडाच्या प्रत्येक पानाला पाणी घालण्याची धडपड करावी त्याप्रमाणे प्रपंचातल्या आणि आपल्या गोतावळ्यातल्या प्रत्येक माणसाला आपलासा करण्याची आपली धडपड असते! ‘आपलासा’ म्हणजे आपल्या मनासारखा. आता जोवर आपल्या स्वार्थाला बाधा येत नाही तोवरच आपणही जिथे दुसऱ्याचे राहातो, तिथे प्रत्येकजण कायमचा आपल्या मनानुसार व्यवहार करणारा होणे कसे शक्य आहे? तेव्हा परस्परांच्या स्वार्थात बाधा येत नाही तोवरच या जगातले संबंध टिकतात आणि चांगलेही भासतात. स्वार्थाला थोडं नख लागलं की त्या संबंधांत बेबनाव निर्माण होतो. या सर्व धडपडीत आपल्या व्यवहारात, आपल्या विचारात, आपल्या भावनेतदेखील एकवाक्यता राहात नाही. त्याचा परिणाम आपल्याही मनाच्या स्थिरतेवर होतो. आपण दूरच्या प्रवासाला निघालो आहोत आणि गाडीतल्या काही सहप्रवाशांचा स्वभाव आपल्याला आवडला नाही तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मुक्कामाला पोहोचण्याकडेच आपलं सर्व लक्ष असतं. त्या सहप्रवाशाला ‘सुधारायच्या’ किंवा त्याचे ‘विचार बदलायच्या’ प्रयत्नांत आपण मुक्कामाकडे दुर्लक्ष होईल, इतपत गुंतून पडत नाही. प्रपंचात मात्र दुसऱ्याला सुधारण्यात, म्हणजेच त्याला आपल्या मनासारखं घडविण्यात, वळविण्यात आपण नको तितकी शक्ती आणि वेळ खर्च करीत असतो. भ्रमात अडकलेल्या एकाने दुसऱ्याचा भ्रम दूर करण्याचाच हा आटापिटा असतो. आधी मी सुधारलो आहे का, माझ्या जीवनाची दिशा योग्य आहे का, याचा विचारही आपण करीत नाही. संतदेखील दुसऱ्याला योग्य काय, ते सांगतात. पण त्यात आंतरिक कळकळ असते, आटापिटा नसतो. त्यांचं संपूर्ण जीवन एकाशीच केंद्रित असल्यानं ते अखंड आनंदाची एकलय अनुभवत असतात.