औषध पोटात गेलं तर त्याचा उपयोग होतो, तसं नाम समजून घेतलं म्हणजेच ते अंतरंगात पोहोचेल, असं घेतलं तरच ते भवरोग दूर करू लागतं. या मुद्दय़ापासून आता आपल्या या चिंतनातला अखेरचा टप्पा आपण सुरू करीत आहोत. हा टप्पा म्हणजे नामरहस्याचा शोध! श्रीगुरूदेवांचं प्रथम दर्शन झालं तेव्हा त्यांच्या प्रशांतगंभीर रूपानं मी दिङ्मूढ झालो होतो. अचानक त्यांनी विचारलं, ‘काय करता?’ मी गडबडून म्हणालो, ‘रामनाम घेतो’. त्यांनी अधिक थेट विचारलं, ‘रामनामच का?’ मी गडबडून गेलो. आपण नामच का घेतो, असा विचारही आपण कधी करीत नाही. त्यामुळे मग जे कुणालाही सुचेल, असं उत्तर देऊन टाकलं, ‘महाराज सांगतात म्हणून!’ त्यांच्या चेहऱ्यावर हास्य विलसलं आणि त्यांनी श्रीरामरक्षेतला श्लोक उच्चारला, ‘‘य: कण्ठे धारयेत्तस्य करस्था: सर्वसिद्धय:!’’ जो हा (राम)मंत्र कंठात धारण करतो त्याच्या हाती समस्त सिद्धी येतात! आपण लहानपणापासून ‘रामरक्षा’ म्हणतो, पण तिच्या अर्थानुसार राममंत्राकडे पाहतो का? त्या विश्वासाने नामस्मरण करतो का? आता क्षुद्र सिद्धीसाठी कोणतीही उपासना करूच नये, पण निदान परमार्थात जे काही सिद्ध होण्यासारखं आहे ते नामानंच होईल, असं आपण निश्चयानं मानतो का? आपण नाम घेतो पण नामच का घेतो, याचा विचार कधी करतो का? ‘महाराज सांगतात म्हणून’ हे सोपं उत्तर आपण सांगतो पण श्रीमहाराजांच्या अपेक्षेनुसार आपण ‘समजून’ नाम घेतो का? नामानं काय काय साधतं, याचं वर्णन श्रीमहाराजांच्या बोधात जागोजागी आहे. तसं साधेल इतकं नाम आपण विश्वासानं घेतो का? नामाची थोरवी आपल्याला शब्दानं माहीत आहे पण अनुभवानं ती अंतरंगात दृढ आहे का? ‘नाम हा माझा प्राण आहे’, असं महाराज सांगतात. ते नाम आपण प्राणाइतकं जपतो का? या प्रश्नांच्या प्रकाशातच आपला हा अखेरचा टप्पा सुरू होत आहे. आपल्या या चिंतनाचे आता तीसेक भाग राहिले आहेत, त्या भागांत आपण श्रीमहाराजांनी सांगितलेला जो ‘नामयोग’ आहे त्याच्या अनुषंगाने नामाच्या रहस्याचाच मागोवा घेणार आहोत. हा शोध सुरू करण्याआधी दोन-तीन गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. नामाचं माहात्म्य सांगण्याचा माझा अधिकार, पात्रता किंवा वकूब नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, नामाचं माहात्म्य शोधताना अन्य साधनापद्धतींना कमी लेखण्याचा जराही उद्देश नाही. जगात भिन्न भावप्रकृतीचे, विचारप्रकृतीचे लोक आहेत. परमार्थासाठी ज्याच्या-त्याच्या भावप्रकृतीनुसारचा साधनामार्ग आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक साधनामार्ग आपापल्या जागी योग्य, अनिवार्य आणि उपयुक्त आहे. पण हे चिंतन श्रीमहाराजांना वाहिलेलं असल्यानं त्याचा समारोप नामातच होणं स्वाभाविक आहे. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट नामधारकांनी लक्षात ठेवावी. नामरहस्याचा हा शोध वाचून नंतर विसरून जा आणि नामातच बुडा. कारण महाराजही सांगतात, ‘‘अत्यंत कठीण प्रमेये असलेले जगातले ग्रंथ वाचावेत, पण शेवटी अत्यंत सोप्यातले सोपे असे नामच घ्यावे!’’(चरित्रातील नामविषयक वचने, क्र. ५५).