आपली चर्चा पुढे सुरू करण्याआधी एका साधकाच्या मनात आलेल्या शंकेचं निराकरण करू. सावनसिंह महाराज यांचे विचार वाचून ही शंका आली आहे आणि तिचं निराकरण करताना आपल्या या सदराच्या प्रारंभबिंदूचेच पुन्हा स्मरण करून देता येणार आहे. मनुष्यजन्मात काही संकल्प शेष उरले तर त्यांच्या पूर्तीसाठी अनुरूप असा पशुपक्ष्याचा देहसुद्धा पुढील जन्मी मिळतो किंवा मनुष्य जन्मात जीवाच्या इच्छा आणि लालसा पशुसमान असल्या तर त्याला अधोगत होऊन पुढील जन्म पशुयोनीत मिळेल, हे विचार वाचून या साधकाला वाटले की माणसाचा जन्म हाच शेवटचा असून त्यानंतर मोक्ष मिळत नाही का आणि एकदा माणसाचा जन्म लाभला की नंतर पशुयोनीत जन्म कसा काय शक्य आहे? या शंकेचा विचार करू. एक गोष्ट अशी की ज्यांचा पुनर्जन्माच्या संकल्पनेवरच विश्वास नाही त्यांना ही सारीच चर्चा म्हणजे थोतांड वाटेल. पण चराचरातील समस्त जीवसृष्टीत एक जीव माणूस म्हणूनच का जन्मला आणि एक जीव क्षुद्र प्राण्याच्या देहातच का जन्मला, याचं उत्तर मात्र त्यांनाही देता येणार नाही. तेव्हा पुनर्जन्माच्या संकल्पनेचा स्वीकार अभिप्रेत धरूनच आपण हा विचार करीत आहोत. पहिली गोष्ट म्हणजे माणसाचा जन्म शेवटचा असेलच, असे काही नाही. मुळात माणसाचा जन्म मला लाभतो तो माझ्या कर्तृत्वाने नव्हे. उलट मला माझ्या प्रारब्धानुसार पशुपक्ष्याचाच जन्म लाभणार होता. पण परमात्म्याच्या विशेष कृपेने मला माणसाचा जन्म लाभला. विशेष कृपा अशासाठी की केवळ माणसाच्या जन्मातच मोक्षासाठी प्रयत्न शक्य आहे. आता विशेष कृपेने माणसाचा देहही लाभला आणि मोक्षप्राप्तीसाठी नेमके काय प्रयत्न करायचे, हे श्रीमहाराजांच्या माध्यमातून जाणताही आले तरीही अंतरंगात पालट झाला नाही आणि सर्व इच्छा-वासना पशुवतच राहिल्या तरी पुढचा जन्म पशूचा मिळेल किंवा महाराजांच्या बोधानंतरही अंतरंगातील इच्छांचा जोर कमी झाला नाही तरी त्या इच्छांना अनुरूप असा जन्म लाभू शकेल. म्हणूनच श्रीमहाराज म्हणतात, ‘मनुष्य म्हणून जन्माला आलेला माणूस हा माणूस म्हणून मेला तर खरा.’ हे वाक्यच आपल्या या चिंतनाचा पाया आहे. कारण जो माणसाच्या देहात जन्मला आहे तो खरे तर पशू म्हणूनच जन्मणार होता, हे श्रीमहाराज जाणतात. त्यामुळे अंतरंगातील पशुवत वासनांपुढे जीव हतबल आहे, हेसुद्धा ते जाणतात. म्हणूनच त्या दोषांना, त्या वासनांना पाहून ते त्या जिवाला नाकारत नाहीत. उलट जवळ घेऊन त्याला माणूस बनण्याची शिकवण देतात. त्यांच्या बोधानुरूप जगायचा प्रयत्न केला तरच माणूस म्हणून जन्मलेला मनुष्य हा खऱ्या अर्थाने माणूसच होईल आणि हा देह सोडतानाही तो माणूस म्हणूनच जाईल. निदान या जन्मात येऊन एवढं साधलं तरी खूप! आपण साधक तरी खऱ्या अर्थानं आहोत की नाही, हे देवच जाणे. त्यामुळे सिद्ध वगैरे होण्याची गोष्ट तर दूरच, पण निदान आपण माणूस बनू शकलो तरी खूप झालं. त्याउपर जर महाराजांचा माणूस बनू शकलो तर? सर्वार्थाने त्यांचे झालो तर त्यापुढे मोक्षपदही फिकेच आहे!