देहाची शक्ती शेवटपर्यंत टिकावी, ही धडपड अयोग्य आहे; असा श्रीगोंदवलेकर महाराजांच्या बोधाचा नकारात्मक हेतू निश्चितच नाही. निदान स्वत:ची कामे स्वत: करता येण्याइतपत शक्ती टिकली तरी माणसाला आनंद वाटतो. तसं आपल्यालाही साधावं, ही इच्छा असणंही स्वाभाविकच आहे. त्यासाठी शरीराची काळजी घेणं, निगा राखणं, ते सुदृढ ठेवणं या गोष्टीही केल्या पाहिजेत. देहात अडकू नये त्याचप्रमाणे देहाबाबत बेफिकिरीही बाळगू नये. मग तरीही श्रीमहाराज, ‘वयपरत्वे शरीराची शक्ती घटणं स्वाभाविक आहे, तसं झालं नाही तर ते निसर्गनियमाच्या विरुद्ध वाटलं पाहिजे,’ असं जे सांगतात, त्यामागचा रोख काय आहे? या बोधाचा खरा रोख, खरा हेतू हा आनंदासाठी देहावर अवलंबून असण्याची आपली स्थिती पालटावी, हाच आहे. आपली इच्छा काहीही असो, पण कालपरत्वे देह थकतो, हे सत्य आहे. श्रीमहाराज सांगतात की, ‘ठरावीक वयानंतर मनाला त्रासही सहन होत नाही.’ म्हणजे वयपरत्वे देहाची क्षमता खालावते त्याचप्रमाणे मनाची सहनशक्तीही कमी होते. इथे श्रीमहाराजांच्या बोधाचा खरा उलगडा होतो! जन्मापासून देह आणि मनाचं अद्वैत माझ्यात असतं. देहाची मला जन्मजात सवय आणि आवड असते. माझं वर्तन, माझा व्यवहार, माझ्या सवयी, छंद हे सर्व मनाच्या आवडी-निवडीतून होत असतात. मनाच्या या आवडींना देहाची साथ असते आणि ती सदोदित अखंड राहील, हे मी नि:शंकपणे गृहीत धरलं असतं; किंबहुना माझ्या लेखी देह आणि मन वेगळंच नसल्यानं या गोष्टी सहज वेगानं घडत असतात. मग वयपरत्वे देह जसा थकू लागतो त्याचा पहिला धक्का मनालाच बसतो! तुम्हाला न विचारताच केस पांढरे होतात, सुरकुत्यांचं जाळं विस्तारू लागतं, दात पडू पडतात, गुडघे दुखू लागतात. जो देह मी ‘माझा’ मानत असतो तो मला न विचारता आणि माझी पर्वाही न करता असा बदलू लागतो आणि त्याचं दु:ख मनाला फार होतं. खरं तर देहाची शक्ती कमी होते, पण मनाची टिकून राहू शकते. आपल्या बाबतीत ते होतंच, फक्त त्याचं स्वरूप विपरीत असतं. म्हणजे देह थकतो, पण बाह्य़ परिस्थितीतून आनंद मिळवण्याची मनाची आशा थकत नाही! श्रीमहाराजांनीही कुठेतरी म्हटलं आहे की, ‘माणूस म्हातारा होत जातो, पण त्याची वासना (इच्छा) सदातरुण असते’! तेव्हा श्रीमहाराजांनी त्या शिष्याला जे सांगितलं आणि भाऊसाहेबांचा जो दाखला दिला त्याचा हेतू आम्ही जागं व्हावं, हाच आहे! देहाची स्थिती काय म्हातारपणीच खालावते थोडी? नव्हे, व्याधी, आजार किंवा अपघातानं माझं शरीर मला कधी साथ देईनासं होईल, हे सांगता येत नाही. तेव्हा देहाची स्थिती बेभरवशी आहे पण मनाची स्थिती चांगली राखणं माझ्या हातात आहे, त्याकडे मी विचारपूर्वक लक्ष द्यावं, हाच या बोधाचा हेतू आहे. प्रत्यक्षात लहानसहान आरोग्याच्या तक्रारींनी गांजून आपण महाराजांकडे करुणा भाकतो, त्यामुळेच खुरडत चालावं लागणाऱ्या शिष्याला ‘शेवटपर्यंत चालत राहिलंच पाहिजे का’, हा जो प्रश्न महाराज करतात त्याचा आपल्याला धक्का बसतो!