मूलाधारचक्रात असलेली कुंडलिनी शक्ती जागी होऊन ऊध्र्वगामी झाली तर विशुद्धचक्रापर्यंत सरळ जाते, पण अधोगामी झाली तर? जर ही कुंडलिनी शक्ती अधोगामी झाली तर जिवाला वासनागर्तेत खोल बुडवते. कंठाच्या मागे असलेल्या विशुद्धचक्रापर्यंतचा प्रवास तुलनेत सोपा असतो, पण ‘विशुद्ध’नंतर ‘आज्ञाचक्रा’कडे येण्यासाठी पाठीच्या कण्याचा मार्ग सोडून भ्रूमध्यावर यावे लागते! हा वळसा वरकरणी फार छोटा असला तरी मोठा धोक्याचा असतो. घाटच तो! घाटातच अपघाताची भीती मोठी असते. या घाटात जो कोसळेल तो उलट क्रमाने मूलाधारचक्रापर्यंत फेकला जाईल. कंठामागील विशुद्धचक्रात तो घसरला तर त्याच्या वाणीनं लोक मोहित होतील पण ती वाणी अध्यात्म तत्त्वचिंतनाचा मुखवटा घेऊन प्रत्यक्षात त्याचा अहंकार जपण्यासाठी आणि पोसण्यासाठी राबत असेल. मग हृदयाशी जोडलेल्या अनाहतचक्रात तो कोसळला तर त्याचं अंतरंग क्षुद्र वासनांनी भरून जाईल. तेथून नाभिस्थानामागे पाठीच्या कण्यात असलेल्या मणिपूरचक्रात कोसळताना तो आपल्या कथित पारमार्थिक मोठेपणाचा वापर आपल्या वासनापूर्तीसाठी करू लागेल. तिथून खाली तर वासनेच्या गर्तेतच बुडणं आहे. या ‘घाटरस्त्या’ची आणि त्या प्रवासातील धोक्याची माहिती त्याच नाथसंप्रदायी सत्पुरुषानं करून दिली होती. तेव्हा मूलाधार चक्रापासून सुरुवात करून विशुद्धचक्रातला घाटरस्ता ओलांडून साधक भ्रूमध्यावरील आज्ञाचक्रात आला, तर त्याचं मनच त्याच्या ताब्यात येतं! योगशास्त्रानुसार जी सहा चक्रे आहेत ती अत्यंत त्रोटक स्वरूपात आपण पाहिली. आता नाथपंथातील सद्गुरू श्रीगोरक्षनाथ यांच्या आधारे ‘आज्ञाचक्रा’च्या अनुषंगाने थोडा विचार करू. श्रीगोरक्षनाथांचा ‘सिद्ध-सिद्धांत-पद्धती’ हा एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. (मराठीतील अनुवादकार्याचे स्वामी स्वरूपानंद कृपांकित संपादक – म. दा. भट, स. र. आघारकर / प्रकाशक- अनमोल). या ग्रंथाच्या द्वितीयोपदेशात, अर्थात दुसऱ्या प्रकरणात ‘पिण्डविचार’ मांडला आहे. त्यात पिण्डात सहा नव्हे तर नऊ चक्रे सांगितली आहेत. (पिण्डे नवचक्राणि।). यात प्रत्येक चक्राचं स्थान कुठे आहे आणि तिथे ध्यान केलं तर काय लाभ होतो, याचं विवेचन आहे. हा सगळा तपशील काही आपल्यासाठी गरजेचा नाही. संक्षेपात ही चक्रे आणि तेथील ध्यानाचा लाभ पुढीलप्रमाणे : १-मूलाधारातील ब्रह्मचक्र (कामनापूर्ती), २- स्वाधिष्ठान (जगाचे आकर्षण. अर्थात जग हे परमात्म्याचीच लीला आहे, या जाणिवेने लीलाभावानेच हे आकर्षण असावं), ३- नाभिचक्र (सर्वसिद्धीकर), ४- हृदयाधारचक्र (इंद्रियांवर ताबा), ५- कंठचक्र वा विशुद्धचक्र (यथार्थज्ञानप्राप्ती), ६- तालुचक्र (चित्ताचा लय), ७- भूचक्र वा आज्ञाचक्र (याचं विवरण आपण ओघानं पाहू), ८- ब्रह्मरंध्र निर्वाणचक्र (मोक्ष), ९- आकाशचक्र (सर्व इच्छापूर्ती व पूर्णत्वप्राप्ती). तर आपणच केलेला नामोच्चार आपल्याच कानांनी ऐकल्यावर ज्या आज्ञाचक्रावर अंतर्दृष्टी सहज केंद्रित होते, त्याकडे वळू.