श्रीगोंदवलेकर महाराज यांची जी तीन बोधवचने आपण पाहणार आहोत, त्यातील पहिले वचन असे आहे की, ‘‘ज्या गोष्टीची आस लागते तिचा ध्यास लागतो. जसा अळीला भुंग्याचा ध्यास लागतो. ध्यास म्हणजे स्वतचा विसर. तो भगवंताच्या स्मरणातच झाला पाहिजे.’’ या वचनात एक रूपक वापरले आहे ते आहे अळी आणि भुंग्याचे. श्रीगुरूगीतेतही म्हटलं आहे की, ‘कीटभ्रमरवत् तत्र, ध्यानं भवति तादृशम्’ आणि ‘गुरूध्यानं तथा कृत्वा, स्वयं ब्रह्ममयो भवेत’ म्हणजे श्रीसद्गुरूंचं शिष्य अखंड ध्यान करील तर तो श्रीसद्गुरूंप्रमाणेच ब्रह्ममय होईल. जशी अळी भ्रमराचे ध्यान करता करता भ्रमरच होऊन जाते! याचाच अर्थ ज्या गोष्टीचा ध्यास लागतो तिचेच ध्यान होते आणि मग आपणही तद्रूपच होऊन जातो. श्रीनिसर्गदत्त महाराजांनीही ‘ध्यान म्हणजे ध्यास’ अशी व्याख्या केली आहे. आता ध्यास कधी लागतो? जर त्या गोष्टीची आस लागली असेल तर. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘वासनेच्या किंवा हवेपणाच्या तीन अवस्था आहेत. एक आस, दुसरी हव्यास आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे; हव्यासामध्ये वस्तू नेहमीच आपल्याजवळ असावीशी वाटते; आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय काहीच सुचत नाही.’’ (चरित्रातील वासनाविषयक बोधवचने, क्र. १) तेव्हा आस आणि ध्यास ही वासनेचीच अवस्था आहे. हवेपणाचंच ते सक्रिय रूप आहे. आपली ही वासना अर्थात हवेपणा, हांव प्रपंचासाठीच असते. अळीला जसा भ्रमराचा ध्यास लागतो आणि त्या ध्यासानेच ती भ्रमर होऊन जाते, तसा आपल्या रोमारोमात प्रपंचाचाच ध्यास आहे आणि म्हणून आपण अट्टल प्रपंचीच झालो आहोत. आपण रोज रोजचाच प्रपंच करतो तरी त्याबाबतची आस आणि ध्यास किंचितही कमी होत नाही. रोज नव्या आशेने त्यात आपण बुडून जातो. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखवते. खरे म्हणजे खेळ जुनेच असतात. पण आपली वासना मात्र नवी असते.’’ (चरित्रातील वासनाविषयक बोधवचने, क्र. २०) प्रपंच तोच तोच असतो, पण त्यात वासनेचा खेळ नित्यनवा असतो. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘मनुष्य तेच तेच करीत असूनसुद्धा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही? कालच्या गोष्टीच आज आपण करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, तीच ती नोकरी, तोच तो पैसा मिळविणे, सगळे तेच! असे असताना माणसाला कंटाळा येऊ नये का? इतक्या त्याच त्या गोष्टी असूनसुद्धा मनुष्याला कंटाळा न येता त्याच गोष्टी करीत जगावेसे वाटते. याचे कारण असे आहे की, विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे, किंवा हावेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे. आपल्याला पाहण्याची हौस आहे म्हणून आपण पाहतो, आपल्याला ऐकण्याची हौस आहे म्हणून आपण ऐकतो, आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे. ज्याची हाव म्हणजे वासना पुरी झाली नाही तो आशेवर अवलंबून असतो..’’ (वासनाविषयक बोधवचने/ क्र. १०)

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !