प्रत्येक क्षणात माझ्या देहाकडून जशी स्थूल कृती घडते तशाच माझ्या मन, चित्त, बुद्धीने युक्त अशा अंत:करणातूनही काही कृती घडतात. स्थूल कृतीचे जसे फळ असते आणि त्यायोगे परिणाम अटळ असतात अगदी त्याचप्रमाणे सूक्ष्म कृतीचेही फळ आणि परिणाम अटळ असतो. उलट स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्हींचा ठसा उमटतोच. तो कुठे उमटतो? तो माझ्या सूक्ष्म वासनात्मक देहावर उमटतो. आता ही सूक्ष्म वासनात्मक देह, ही काय भानगड आहे? तर माझा जो देह मला दिसतो, तो स्थूल इंद्रिययुक्त देह आहे. तो हालचाल करतो, व्यवहार करतो, स्थूल कृती करतो. पण या त्याच्या हालचालीमागे, स्थूल कृतीमागे, व्यवहारामागे प्रेरणा असते ती त्याच्या ‘मी’ची. हा ‘मी’ म्हणजे वासनांचा पुंजकाच आहे जणू. मृत्यूने माझा स्थूल देह नष्ट होतो, पण वासनात्मक देह कायम राहातो. माझ्या मृत्यूनंतर माझं हे वासनांचं गाठोडंच माझ्यासोबत येतं आणि त्या गाठोडय़ानुरूपच मला पुढचा जन्मही लाभतो. आता हे वासनांचं गाठोडं बनतं तरी कसं? माझ्या मन, चित्त, बुद्धीद्वारे जी सूक्ष्म कृती होत असते त्यानुरूप त्या गाठोडय़ात भर पडते किंवा घट होते. आता या सूक्ष्म कृती म्हणजे काय? मनाची कृती आहे मनन, चित्ताची कृती आहे चिंतन, बुद्धीची कृती आहे बोधाची धारणा, निवड, निश्चितीकरण आदी. माझं मन ज्या दर्जाचं मनन करतं त्यानुसारचा ठसा माझ्या वासनात्मक देहावर पडत असतो. माझं चित्त ज्या दर्जाचं चिंतन करतं, त्यानुरूप ठसा माझ्या वासनात्मक देहावर पडत असतो. माझी बुद्धी ज्या प्रकारचा बोध करते त्यानुरूप ठसा माझ्या वासनात्मक देहावर पडत  असतो. तेव्हा प्रत्येक क्षणात माझ्याकडून स्थूल किंवा सूक्ष्म किंवा स्थूल व सूक्ष्म कृती घडतच असते आणि त्या प्रत्येक कृतीचा माझ्या वासनात्मक सूक्ष्म देहावर अटळ परिणाम संस्काररूपाने जमा होत असतो. म्हणजेच कोणताही क्षण वाया जात नसतो. कोणते ना कोणते फळ तो आपल्या पदरात टाकतच असतो. मग ‘क्षणाचे हे सर्व खरे आहे’ असं नामदेवमहाराज का म्हणतात? याचा अर्थ हे जग क्षणभंगूर आहे, क्षणापुरतंच ते खरं आहे, नंतर यातलं काहीही उरणार नाही, असाच आणि एवढाच आहे का? नाही. त्यापेक्षाही खोलवर जावं लागेल. आपल्या आयुष्याकडे पाहिलं तरी लक्षात येईल की आपलं जगणं काळाच्या पकडीत आहे. ठरावीक काळापुरतंच आपण जगणार आहोत, हेही आपल्याला माहीत आहे. या काळाचा सर्वात लघुत्तम घटक म्हणजे क्षण! तेव्हा क्षणा-क्षणाच्या प्रवाहानुसार माझा जीवनप्रवाह सुरू आहे. माझं जगणं अनंत क्षणांनी बांधलेलं आहे आणि ते कोणत्या क्षणी संपेल, याचा काही भरवसा नाही. अशा क्षणिक आयुष्यातला ‘मी’ जसा क्षणिक आहे, तसाच तो ज्या ज्या गोष्टींना ‘माझं’ मानून कवटाळतो त्या गोष्टीही क्षणिक आहेत. या क्षणात जे आणि जसं आहे ते पुढच्याही क्षणी तेच आणि तसंच असेल, याची काही शाश्वती नाही. त्यामुळे या क्षणापुरतंच ते खरं आहे! पाण्याचा बुडबुडा क्षणभर दिसतो, त्यामुळे तो ‘आहे’पणानं खरा मानावा तर पुढच्याच क्षणी तो लुप्त होतो!