अष्टांगयोगाची आपण थोडक्यात ओळख करून घेत आहोत. त्यामुळे प्राणायामाचा हेतू आणि त्याची व्याप्ती व त्यानं काय साधतं, एवढंच आपण पाहिलं. प्राणायाम कसा करायचा, हे मात्र तज्ज्ञाकडूनच शिकलं पाहिजे. त्यामुळे तो भाग इथे देत नाही. आता या ‘प्राणायामा’नंतर येतो तो ‘प्रत्याहार’. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पाच विषयांत न गुंतता इंद्रियं आत्मसन्मुख होणं, हा प्रत्याहार आहे. आपण मागेच पाहिलं होतं की, शब्द, स्पर्श, रूप आदींना इंद्रियांचे विषय मानलं जातं आणि त्या-त्या विषयाच्या गोडीनं इंद्रियं त्यात गुंततात, असं आपण मानतो. प्रत्यक्षात इंद्रियं ही निव्वळ साधनं आहेत. डोळ्यांनी पाहिलं जातं, पण पाहण्याची ओढ प्रत्यक्षात डोळ्यांना नसते. ही ओढ मनाला असते. आपण ‘जिभेचे चोचले’ म्हणून आरोप करीत वेगवेगळे पदार्थ खाण्याच्या ओढीचा दोष जिभेच्या माथी मारतो. प्रत्यक्षात हे चोचले मनाचेच असतात. त्यामुळे या इंद्रियांच्या साह्य़ानं भौतिक जगात विखुरलेलं मन आपल्या इच्छेनुसार आत्मसन्मुख करता येणं अथवा भौतिक जगात वावरत असतानाच त्याचा प्रभाव न पडू देता मनानं ध्येयानुरूप राहणं ज्या साधकाला साधलं त्यालाच ‘प्रत्याहार’ साधला, असं म्हणता येईल. स्वामी विवेकानंद सांगतात, ‘‘आपले मन आपल्या इच्छेनुसार केंद्राशी संयुक्त करणे किंवा आपल्या इच्छेनुसार केंद्रावरून काढून घेणे ज्याला जमले आहे त्यालाच प्रत्याहार साधला आहे, असे म्हणता येईल. ‘प्रत्याहार’ म्हणजे एकीकडे गोळा करणे, आपल्याकडे ओढून घेणे- मनाची बहिर्गामी गती रुद्ध करून, इंद्रियांच्या गुलामीतून त्याला सोडवून आत खेचून घेणे.’’ हा प्रत्याहार एका दिवसात साधणार नाही तर कठोर साधना करीत, धीर धरून सतत कित्येक र्वष अविरत प्रयत्न केल्यासच यश लाभणं शक्य आहे, असंही स्वामीजी स्पष्ट सांगतात. योगाची यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहार ही पाच बहिरंग साधनं आपण संक्षेपात जाणून घेतली. ही बहिरंग साधनं साधायलाही कित्येक र्वष खर्ची घालावी लागतील, हे स्वामीजींसारख्या योग्याचं मतंही आपण पाहिलं. इथून पुढे धारणा, ध्यान व समाधी ही अंतरंग साधनं सुरू होतात. अर्थात साधक थेट अंतरंगात उतरतो. त्या अंतरंग साधनांबाबत जाणून घेऊ. पतंजली मुनी सांगतात, ‘देशबन्धश्चित्तस्य धारणा।।’ चित्ताला कोणत्या तरी एका देशावर म्हणजे स्थानावर, केंद्रावर जणू बांधून ठेवल्यासारखे स्थिर करणे ही ‘धारणा’. ‘तत्र प्रत्ययैकतानता ध्यानम्।।’ त्या धारणेच्या प्रत्ययाची एकतानता म्हणजेच ‘ध्यान’ आणि मी ध्यान करीत आहे, असं स्फुरणही न होता स्वरूपाशी चित्ताची पूर्ण तादात्म्यता हीच ‘समाधी’! धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्हीचे फळ एकच- पूर्णत्वप्राप्ती. योगशास्त्रानुसार पूर्णत्वाच्या या प्रक्रियेत कुंडलिनी शक्तीचं कार्य फार मोठं आहे. आता यातला कुठलाही ‘योग’ न आचरता आपण केवळ नाम घेत असतो आणि योगानं जे साधतं तेच नामानंही साधतं, अशी ग्वाही श्रीगोंदवलेकर महाराजही देतात! श्रीमहाराजांच्या ‘नामयोगा’चा विचार करताना आपण कुंडलिनी शक्ती आणि ‘षट्चक्रां’नाही स्पर्श करणार आहोत.