श्रीकृष्णांकडे साह्य़ मागण्यासाठी गेलेल्या दुर्योधनासमोर दोन पर्याय होते. भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचं सैन्य. दुर्योधनानं विचार केला, कृष्ण एकटाच आहे. सैन्य तर हजारो सैनिकांचं. एकाची शक्ती मोठी की हजारांची? तेव्हा त्या हजारांनाच मागून घ्यावं. अर्जुनाची निवड निव्वळ कृष्ण हीच होती. दुर्योधनाला उमगले नाही की सैन्य आपल्याच राजाविरोधात कसे लढेल? एकतर ते लढणार नाही किंवा पुऱ्या ताकदीनिशी लढू शकणार नाही. ही गोष्ट आज आपल्याही जगण्याच्या लढाईतही लागू आहे. आज आपल्यालाही जगताना निवड करायची आहे भगवंताचा मार्ग की दुनियेचा मार्ग? भगवंताचा आधार की दुनियेचा आधार? भगवंत तर एकटा आहे.  दुनिया शेकडोंची आहे. अडीअडचणीला एकापेक्षा अनेकांचाच आधार मोठा नाही का? त्यामुळे त्या एकाला सोडून आपणही अनेकांना धरून राहू पाहातो आणि शेकडोंना पकडून राहाता यावं यासाठी शेकडोंबरोबर शेकडो प्रकारची फरपट सहन करीत राहातो. त्या एकाला धरून राहिलो असतो तर? आता हे भगवंताला धरून राहाणं म्हणजे तरी काय? आपण आधीच पाहिलं की आधार हा देहाचा नव्हे, मनाचा आहे. तेव्हा आज दुनियाकेंद्रित असलेलं आपलं मन भगवंतकेंद्रित करणं म्हणजे भगवंताला धरून राहाणं.  आज आपलं मन हे दुनियेशी जखडलेलं आहे. बहिर्मुख आहे. ते अंतर्मुख करून भगवंताशी दृढ करणं म्हणजे भगवंताचा आधार घेणं. श्रीमहाराज म्हणूनच जणू सांगतात की जगण्याच्या युद्धात उतरण्याआधी आपल्या मनबुद्धी शरीररूपी रथाचे सूत्र भगवंताकडे द्यायचं की दुनियेकडे हे आधी ठरवा. आपण रथाच्या दोऱ्या दुनियेच्या हाती देतो आणि मार्ग निर्वेध व्हावा म्हणून भगवंताला आळवत राहातो. चाकरी दुनियेची करतो, पगार मात्र रामाकडे मागतो. त्यात बदल करायचा आहे. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात की शाश्वत समाधान भगवंताच्या प्राप्तीनेच मिळेल. प्रपंचाच्या पसाऱ्यातून नव्हे. ते म्हणतात, ‘‘प्रपंचात अनेक वस्तू आहेत, पण भगवंत एकच वस्तू आहे. प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे. पण भगवंताचे तसे नाही; भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको.’’ (प्रवचने, २७ एप्रिल) आपण मात्र त्या एका भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सोडून दृश्य, स्थूल प्रपंचाचा पसारा वाढविण्यातच स्वतला जुंपून घेतो. श्रीमहाराज सांगतात, ‘‘सर्व अपूर्ण वस्तू मिळून एक पूर्ण वस्तू होत नाही. म्हणून सर्व दृश्य वस्तूंतून पूर्ण सुख मिळणार नाही.’’ (बोधवचने, अनु. २९७) आता याचा अर्थ माणसानं प्रपंच सोडून भगवंताचा शोध घ्यावा, असं श्रीमहाराजांना अभिप्रेत नाही. प्रपंच आणि परमार्थ यात त्यांनी अशा ऐक्याची शिकवण दिली आहे की अवघं जगणं, अवघा प्रपंच हाच परमार्थ व्हावा.