ज्या कृतीसाठी विशिष्ट क्षमतेची जरुरी लागते त्या कृतीला माणूस नकळत मोठेपण देतो. जी कृती कुणालाही करता येण्यासारखी आहे, जिच्यासाठी मोठय़ा क्षमतेची गरज नाही, असं माणसाला वाटतं, त्या कृतीलाही मग तो सामान्य मानतो. नामस्मरण हे कोणत्याही वयातला, कोणत्याही स्थितीतला, कोणत्याही वकुबाचा माणूस सहज करू शकतो आणि त्यामुळेच नामस्मरण हे वरकरणी सोपं साधन वाटतं. जे सोपं आहे ते सर्वसामान्यांसाठीच आणि म्हणून सामान्य साधन आहे, अशी गैरसमजूत त्यातनंच होते. प्रत्यक्षात श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘नामाचे महत्त्व आपल्यासारख्याला कळणे फार कठीण आहे. आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत आणि नाम तर निरुपाधिक आहे. म्हणून संतांनाच नामाचे खरे महत्त्व कळले’’ (चरित्रातील नामविषयक वचने, क्र. १). आपण देहबुद्धीच्या उपाधीत अडकलो असल्यामुळे आपल्याला नामाचं महत्त्व कळत नाही. संतांच्या ठायी देहबुद्धीचा लवलेशही नसल्यामुळे त्यांनाच नामाचं खरं महत्त्व कळतं. देहबुद्धीला रुची, स्वाद, गंध, नाद, प्रकाश या गोष्टींचं अप्रूप आहे. या गोष्टींचं मिश्रण नसलेला अनुभव हा देहबुद्धीला बेचव, नीरस वाटतो. त्यामुळे या गोष्टींची शक्यता ज्या साधनाप्रकारांत आहे, त्याचं देहबुद्धीला आकर्षण वाटतं. नामात या अनुभवांवर भर नसल्याने मनाला नामाबद्दल उपजतच गोडी नाही. तरीही नामच सातत्यानं करीत गेलं तर देहबुद्धी हळूहळू क्षीण होऊ लागते. ज्याच्यात देहबुद्धी नाहीच, अशा संतांना मात्र नामाशिवाय दुसरं काही सुचत नाही, समजत नाही, करवत नाही, आठवत नाही की आवडतही नाही. देहबुद्धी असूनही जर नामाची संगत सोडली नाही, तर नामच नामधारकामध्ये पालट घडविल्याशिवाय राहणार नाही. जशी संगत, तशी वृत्ती बनते. धनवंताच्या संगतीच्या प्रभावानं सामान्य परिस्थितीतील त्याच्या मित्राची वृत्तीही ऐषोरामासाठी अधिक उत्सुक अशी बनते. मग निरुपाधिक नामाच्या संगतीनं नाम घेणाराही उपाधींपासून हळूहळू मोकळा होत जातो, यात काय आश्चर्य? त्यासाठी श्रीगोंदवलेकर महाराजांनी सांगितलेला ‘नामयोग’ दृढ विश्वासानं आचरणात आणत हळूहळू नामातच झोकून दिलं पाहिजे. श्रीमहाराजांनी एका वाक्यात हा ‘नामयोग’ सांगितला आहे. ते म्हणतात, ‘‘आपण नाम घ्यावे, ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे; आणि ते घेता घेता शेवटी त्यात स्वत:ला विसरून जावे, हाच आनंदाचा मार्ग आहे’’ (चरित्रातील नामविषयक वचने, क्र. १४२). हे वाक्य वाचताना फार सोपं आहे, असं वाटतं, पण याच वाक्यात फार मोठी यौगिक क्रिया दडली आहे. ती कोणती हे आपण पाहणारच आहोत, पण जेव्हा महाराज सांगतात की, ‘योगानं जे साधतं तेच नामानंही साधतं’, तेव्हा नामामागचं योगरहस्य आपल्या लक्षात येत नाही. त्या योगरहस्याचाही वेध संक्षेपात आपण घेणार आहोत. या मागोव्याला आधार आहे पातंजल योगसूत्रे, स्वामी विवेकानंदांचे त्यावरील भाष्य, श्रीगुरुगोरक्षनाथ यांचा ‘सिद्ध सिद्धान्त पद्धती’ आणि ‘धेरण्ड संहिता’!