मानवी जन्माचं एकमात्र ध्येय परमात्मप्राप्ती हे आहे, असं समस्त साधू-संत सांगतात. आता ‘परमात्मप्राप्ती’ हा शब्द जितका थेट आहे तितकाच तो धूसर आहे! परमात्मप्राप्ती म्हणजे नेमकं काय? रामकृष्ण परमहंस म्हणत, ‘त्याला कोण पाहू शकणार? जो त्याला पाहायला गेला तो तोच होऊन गेला. मिठाची बाहुली समुद्राचा तळ शोधायला गेली आणि त्यातच विरघळून गेली.’ थोडक्यात प्राचीन काळापासून सर्वच साधू-संत हेदेखील सांगतात की ज्याला परमात्मप्राप्ती होते तो वेगळा उरतच नाही. त्याच्यातच विलीन होतो. हे विलीन होणं ही या सृष्टीतली सर्वात व्यापक, सर्वात दीर्घ आणि सर्वात कठीण प्रक्रिया आहे. म्हणूनच ‘परमात्मप्राप्ती’ या प्रक्रियेचा अर्थ सोप्या शब्दांत सांगायचा तर परमात्म्याशी अभिन्न असलेल्या सद्गुरूंची प्राप्ती, त्यांच्यात विलीन होणं. मानवी जन्माचं हेच खरं परमध्येय आहे. आता त्यांच्यात विलीन होणं म्हणजे तरी नेमकं काय? म्हणजे त्यांच्या इच्छेत माझी इच्छा विलीन होणं, त्यांच्या विचारात आणि माझ्या विचारात एकरूपता येणं, त्यांचा आणि माझा हेतू एक होणं. हे होण्यासाठी माझा प्रपंच, माझा व्यवहार आणि माझ्या मनाच्या सवयी यांचा केंद्रबिंदू ‘मी’ न राहता श्रीमहाराज हेच झाले पाहिजेत. बदल हा इतकाच आहे, पण तोच सर्वात कठीण बदल आहे. पण आपलं ध्येय तेच असलं पाहिजे. सद्गुरुप्राप्ती, सद्गुरूंशी ऐक्यता, सद्गुरूंच्याच विचारानुरूप जीवन जगणं हेच आपलं ध्येय असेल तर मग त्या ध्येयपूर्तीच्या प्रयत्नांसाठी जी शक्ती लागते ती त्या ध्येयनिश्चयातूनच येईल! इच्छाशक्तीबद्दल श्रीनिसर्गदत्त महाराजांचा बोध इथे आठवतो. त्यांच्या सांगण्याचा आशय असा होता की, इच्छा हीच शक्ती आहे! तुमची इच्छा इतकी व्यापक करा, इतकी बळकट करा की तिच्या पूर्तीसाठी अंत:करणपूर्वक प्रयत्न सुरू झाले की तीच तुम्हाला व्यापक करील! अध्यात्माच्या मार्गात येण्याआधीचं आपलं जीवन आणि या मार्गात आल्यावर आणि स्पष्ट व शुद्ध वाटचाल करू लागल्यावरचं आपलं जीवन; यांच्यातील फरक जरी पाहिला तरी पूर्वीपेक्षा आपला संकुचितपणा कमी झाला, हे जाणवल्याशिवाय राहणार नाही. आता श्रीमहाराजांची इच्छा आणि माझी इच्छा, त्यांचा जीवनहेतू आणि माझा जीवनहेतू एक कधी होईल? जेव्हा त्यांच्या बोधानुरूप माझं जीवन घडविण्याचा मी सदोदित प्रयत्न करीन. या प्रयत्नांचा प्रवास मात्र दुहेरी आहे. एक प्रवास आहे तो बाहेरचा, दुसरा आहे तो आतला. बाहेरचा प्रवास म्हणजे प्रपंच-व्यवहारातली कर्तव्यकर्मे देहानं करणं. आतला प्रवास म्हणजे प्रपंच-व्यवहारात विखुरलेलं मन परमात्म्यापाशी गोळा करणं. या दोन्ही पातळीवर, म्हणजेच बाहेर व्यवहार करताना आणि आत मनाला वळण लावत असताना एकच साधना सहज चालू शकते ती म्हणजे नामस्मरण. श्रीमहाराजांच्याच सांगण्याप्रमाणे, उंबरठय़ावर दिवा ठेवला की आत आणि बाहेरही प्रकाश पडतो. त्याप्रमाणे अंत:करणाच्या उंबरठय़ावर नामाचा दिवा ठेवला की आतला आणि बाहेरचा अज्ञानाचा अंध:कार तो दूर करू लागतो.

Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….