आपल्या मनासारखं कोणी वागलं नाही किंवा आपल्या मनासारखं कोणी बोललं नाही तर आपलं मन किती पटकन दुखावतं. मग लोकांचं अंतकरणही दुखवायचं नाही पण त्यांच्या मनासारखंच बोललं पाहिजे किंवा वागलं पाहिजे, असं नाही, असं श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात तेव्हा त्या सांगण्यातली आंतरसंगती काय असावी? ती शोधताना ज्या दोन अटी श्रीमहाराजांनी घातल्या आहेत त्या आधी नीट जाणून घ्याव्या लागतील. त्यातली पहिली अट आहे निस्वार्थीपणा (जो निस्वार्थी असेल त्यालाच जनप्रियत्व येईल) आणि दुसरी अट म्हणजे अखंड अनुसंधान (प्रत्येकाला आपण हवेहवेसे वाटले पाहिजे. असे वाटण्यासाठी लोकांच्या मनासारखेच वागले पाहिजे किंवा त्यांना आवडेल तेच बोलले पाहिजे असे नाही. प्रेम करायला कशाचीही जरुरी लागत नाही; पैसा तर बिलकूल लागत नाही, हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. जगात कुणी भोगली नसेल एवढी गरिबी मी भोगली आहे. अशा गरिबीमध्ये राहूनही माझे अनुसंधान टिकले, मग तुम्हाला ते टिकवायला काय हरकत आहे?) या दोन गोष्टी साधतील तेव्हाच कुणाचेही अंतकरण दुखावले जाणार नाही! आपल्याकडून दुसऱ्याचं अंतकरण सहज दुखावतं कारण आपलं वागणं, बोलणं स्वार्थप्रेरित असतं. आपल्या कृतीला, वागण्या-बोलण्याला भगवंताच्या स्मरणाचं अधिष्ठान नसतं. अर्थात आपण जे वागत आहोत वा बोलत आहोत ते भगवंताला  अर्थात आपल्या सद्गुरूंना आवडेल का, याचा विचार नसतो. त्यामुळे स्वार्थप्रेरित आणि अविचारी अशा आपल्या वागण्या-बोलण्याने दुसरी माणसं सहज दुखावली जातात. बरं दुसऱ्याकडूनही आपलं अंतकरण सहज का दुखावलं जातं? आता पटकन वाटेल की ती लोकंही स्वार्थाने आणि अविचाराने वागत असतील म्हणून. पण नाही! इथेही याच दोन्ही अटी आपल्याकडूनच पूर्ण होत नाहीत हेच एकमेव कारण आहे! दुसरा आपल्याशी जे बोलत वा वागत आहे ते आपण स्वार्थाच्याच प्रभावाखाली राहून ऐकत व अनुभवत असतो त्यामुळेच आपलं मन दुखावतं. अगदी त्याचप्रमाणे दुसऱ्याची आपल्याशी जी वागणूक सुरू आहे ती अनुभवताना भगवंताचं अनुसंधान आपल्याकडूनच सुटलं असतं म्हणूनच आपलं अंतकरण दुखावतं. तेव्हा या अटींची पूर्तता दोन्ही बाजूंनी आपल्यालाच करायची आहे. जर माझ्या वागण्या-बोलण्यात स्वार्थ नसेल आणि भगवंताच्या अनुसंधानात राहूनच माझ्याकडून प्रत्येक कृती होत असेल तर मग ती कृती वा सांगणं हे भगवद्इच्छेनेच होणार. मग त्यासाठी दुसऱ्यांना ते आवडेल की नाही, याचा विचार करणारा ‘मी’ तरी कुठे असणार? मग जे सत्य आहे तेच कळकळीनं सांगितलं जाईल. जे सत्य आहे त्यासाठीच कळकळीनं कृती केली जाईल. थोडक्यात निस्वार्थ आणि अनुसंधानरत अशा साधकाचं वागणं आणि बोलणं यात सत्यच प्रकाशित होईल. त्या सत्याचा व्यापक प्रभाव असतो. मुलाच्या हितासाठी निस्वार्थ कळकळीने आई कठोर बोलते तेव्हा ती कळकळ कठोर शब्दांपेक्षा अधिक प्रभावी ठरतेच ना?