श्रीगोंदवलेकर महाराज दु:खाचे तीन प्रकार सांगतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो जन्मजात दु:ख. ते इतकं त्रासदायक नसतं, असंही ते सांगतात. याचा अर्थ ते त्या दु:खाचं समर्थन करीत नाहीत की गुणगान करीत नाहीत. फक्त एवढंच सांगतात की जे सवयीचं दु:ख असतं त्याच्या त्रासाची तीव्रता कमी असू शकते. त्रास कधी होतो? सवयीविरुद्ध काही घडतं तेव्हा. मला पाहण्याची सवय आहे आणि माझी दृष्टी गेली तर मला त्याचा जितका त्रास होईल तितका जो जन्मजात दृष्टीहीन आहे त्याला नसेल. पुन्हा लक्षात घ्या, याचा अर्थ जन्मजात दृष्टीहीन आहे त्याला अडचणच नसेल, असं इथे अभिप्रेत नाही. जन्मतच एखादं मूल आईला किंवा बापाला गमावतं. पालकापैकी कुणीही गमावण्याचं दु:ख मोठच असतं, पण जन्मापासून त्या दु:खाचीच सोबत असल्याने त्याची तीव्रता लवकर जाणवत नाही. आता दुसरं दु:ख आहे ते परिस्थितीजन्य. परिस्थितीची दु:खे परिस्थितीने दूर होतात, असं श्रीमहाराज सांगतात. समजा माझी आर्थिक स्थिती खालावली आणि गरिबीचे दु:ख वाटय़ाला आलं तर ते दु:ख कशानं दूर होईल? अर्थात गरिबीची परिस्थिती प्रयत्नपूर्वक पालटून मी आर्थिकदृष्टय़ा श्रीमंत झालो तर गरिबीचं दु:ख दूर होईल. परिस्थितीचे दु:ख परिस्थितीने दूर होईल, याचं आणखी एक उदाहरण पाहू. समजा अगदी जवळच्या आप्तांना गमावल्यानं एकाकीपणाची परिस्थिती उद्भवली. कालांतराने त्या परिस्थितीची सवय होते. जसजसे दिवस जातात तसतशी येणारी नवी परिस्थिती काळानुरूप त्या दु:खाची तीव्रता कमी करते. तेव्हा जन्मजात आणि परिस्थितीजन्य हे दु:खाचे दोन प्रकार आपण पाहिले. दु:खाचा तिसरा प्रकार आहे तो मात्र फार उग्र आहे. हे तिसरं दु:ख म्हणजे कल्पनेचं दु:ख! कल्पनेचं दु:ख म्हणजे काय? महाराजांच्या सांगण्यानुसार काळजीचं दु:ख म्हणजे कल्पनेचं दु:ख. आता परिस्थितीचं दु:ख परिस्थितीनं दूर होतं तसं कल्पनेचं दु:ख मात्र कल्पनेनं दूर होत नाही! उलट कल्पनेचं दु:ख जितकी कल्पना करावी तितकं वाढतच जातं! याचं कारण आपल्या सर्व कल्पना या आपल्या काळजी वाढवणाऱ्याच असतात. या दोन्ही एकमेकींना पूरक आहेत. एकमेकींचा प्राणवायूच आहेत. आपण कल्पनेनं काळजी वाढवत राहातो आणि काळजीनं कल्पना वाढवत राहातो. आता कल्पना ही एक शक्तीच आहे. कल्पनेच्या बीजाचं प्रतिभाशक्तीनं पोषण झाल्यामुळेच कित्येक सखोल आणि अर्थगर्भ साहित्यानं मानवी संस्कृतीच्या जडणघडणीत भर घातली आहे. कित्येक शोध, साहित्यिक व सांगीतिक प्रयोग, कित्येक उपक्रम यांचं मूळ कल्पनाशक्तीतच आहे. आता शक्ती ही मूलत: शुद्धच असते. किंबहुना शक्ती ही मूलत: वाईट किंवा चांगली नसते. तिचा सदुपयोग होतो तेव्हा ती शक्ती आपल्याला चांगली वाटते आणि तिचा दुरुपयोग होतो तेव्हा ती शक्ती आपल्याला वाईट भासते. आगीच्या शक्तीने उत्तम स्वयंपाक रांधता येतो तसाच त्याच शक्तीने शहरेच्या शहरे भस्मसातही करता येतात. तसाच कल्पनाशक्तीचा सदुपयोग आपण वर पाहिला आता तिचा दुरुपयोग म्हणजे काय?