गेले बारा भाग आपण योगसाधना आणि कुंडलिनीचा काही विचार केला. आपली नामयोगाची चर्चा अद्याप संपलेली नाही आणि त्या ओघात पुन्हा पातंजल सूत्रांचा आधारही आपण घेऊ. काही जणांना ही चर्चा नीरस वाटली असेल, काहींना ती श्रीमहाराजांच्या चिंतनाच्या ओघात अप्रस्तुतही वाटली असेल. मग तरी ही चर्चा आपण का केली? तर योगानं जे साधतं ते नामानंही साधतंच, या श्रीमहाराजांच्या वचनाच्या संदर्भात योगाची आणि त्याद्वारे होणाऱ्या प्राप्तीची आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर साधनेची थोडी ओळख व्हावी, हा या चर्चेचा हेतू होता. ‘आपणच घेत असलेलं नाम आपल्या कानांनी ऐकावं’, या बोधाच्या आचरणानं आपलं आपोआप आज्ञाचक्रावर ध्यान लागतं, इथवर आपण पाहिलं. बरं ही प्रक्रिया सहज होते, ती मुद्दाम करावी लागत नाही. ती घडली असल्याची जाणीवदेखील आपल्याला होत नाही आणि तरीही तिचा जो काही लाभ आहे, तो होतोच. हा लाभ कोणता? तर हित व अहित, कल्याण व अकल्याण जाणण्यास जीव समर्थ होतो. आपल्या मूळ स्वरूपाची दिव्यस्मृती कायम ठेवता येते! त्यातही आणखी विशेष भाग असा की, योगशास्त्रानुसार या चक्राची देवता सद्गुरू आहे! तेव्हा यम-नियमापासूनचा आटापिटा न करता ‘श्रीमहाराज सांगतात म्हणून सतत नाम घेणं’ एवढाच एक योग आचरणात आणला तर आपली बुद्धी हळूहळू सुधारू लागते! आधी सुधारणा आणि नंतर उपासना, याऐवजी आधी उपासना आणि त्यायोगे नंतर सहज सुधारणा, ही प्रक्रिया यातून घडते. श्रीगुरुदेवांना एकदा म्हणालो, ‘‘मी इतका वाईट आहे. विकार-वासना नष्ट झाल्याशिवाय नुसतं नाम घेऊन काय लाभ?’’ श्रीगुरुदेव तात्काळ म्हणाले, ‘‘विकार-वासना नष्ट करण्याच्या पाठी लागाल तर आयुष्य संपेल, पण विकार -वासना कायम राहतील. त्यापेक्षा नाम घेत रहा. त्या विकार-वासनांकडे मी पाहीन!’’ श्रीमहाराजही सांगतातच ना की, काय सोडायचे यापेक्षा काय घ्यायचे ते सुरू करा! म्हणजे काहीही सोडणं हे आपल्या आवाक्यात नाही. आपण एक गोष्ट सोडू आणि दुसऱ्याच क्षणी दहा गोष्टी जोडू, अशी स्थिती आहे. तेव्हा सोडण्याच्या आटापिटय़ापेक्षा नाम घेण्याचा आटापिटा अधिक सोपा आहे. योगसाधना अगदी पायापासून सुरू होते तर आपली नामसाधना थेट बहिरंग आणि अंतरंग साधनांच्या मधोमध सुरू होते! नाम घेता घेताच साधक अंतरंगातही उतरतो आणि त्याचं बहिरंगही सुधारत जातं. त्यासाठी नाम समजून मात्र घेतलं पाहिजे. हे नाम ‘समजून’ घेणं म्हणजे ‘राम कर्ता आहे, मी निमित्तमात्र आहे, कर्तव्यापुरता आहे, हे जाणणं’! आपण स्वत:ला कर्ता मानतो, अहंबुद्धीनं जगू लागतो, त्यातून मग बाह्य़ जगाचा प्रभाव पडून त्यामागे फरपटू लागतो. त्यापेक्षा खरा कर्ता परमात्माच आहे. ज्या परिस्थितीत त्यानं मला ठेवलं आहे त्या परिस्थितीत माझी कर्तव्यं करीत जगत असतानाच मी नाम घेत राहीन, एवढा निश्चय करणं आपल्या हातात आहे. मग जो योग-बिग जाणत नाही आणि असं नुसतं नाम घेतो, तो अंतरंगात कसा उतरत जातो?