श्रीतुकाराम महाराज म्हणतात, नारायणें दिला वसतीस ठाव। ठेवूनियां भाव ठेलों पायीं।। श्रीसद्गुरुंनी वसतीस ठाव दिला, जवळ केलं पण त्यांच्या चरणी भावपूर्वक समर्पित झालो नाही तर काही उपयोग नाही, या मुद्दय़ापर्यंत आपण आलो आहोत. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘साधनांनी जे साधत नाही ते संतांच्या सहवासात राहिल्याने साधते’’ (प्रवचने, ११ एप्रिल). इथे आद्य शंकराचार्य यांच्या चरित्रातील एक लीलाप्रसंग आठवतो. शंकराचार्याचा एक शिष्य होता गिरी. त्याच्यात बुद्धीची चमक नव्हती पण शंकराचार्याविषयी अपरंपार प्रेम आणि श्रद्धा मात्र होती. शंकराचार्याच्या सेवेत तो तहानभूक विसरून दिवसरात्र मग्न असे. बाकीचे शिष्य शंकराचार्याकडून वेदान्तासह शास्त्रातील गहन सूत्रे शिकत असताना गिरि सेवेतच दंग असे. ज्ञानार्जनाने अन्य शिष्यांमध्ये अहंकारही शिरला होता. हे सर्व पाहून शंकराचार्यानी गिरीचे मोठेपण प्रकाशित करण्याचे ठरवले. नेहमीप्रमाणे बोध ऐकण्यासाठी सकाळी आचार्यासमोर सर्व शिष्य जमले पण आचार्य शांत होते. शिष्यांमध्ये चुळबूळ सुरू झाली. अखेर पद्मपादांनी धाडस केले आणि ते म्हणाले, ‘‘आचार्य सांगायला सुरुवात करता आहात ना?’’ आचार्य म्हणाले, ‘‘थांबा, जरा गिरीलाही येऊ दे.’’ हे ऐकताच सर्वच शिष्यांच्या मनात छद्मी हास्य उमटले. पद्मपाद समोरच्या शिलाखंडाकडे बोट दाखवत म्हणाले, या दगडाला जितका तुमचा बोध कळेल तेवढाच गिरीला कळेल! तोच लांबून नदीवर धुतलेली वस्त्रे घेऊन येत असलेला गिरी दिसला. शंकराचार्यानी त्याला विचारले, तू कोण आहेस आणि मी कोण आहे? गिरीने आपलं क्षुद्रत्व आणि आचार्याचं असीम व्यापकत्व मांडणारं अजरामर असं ‘तोटकाष्टकम्’ हे स्तोत्रच रचलं आणि गायलं. भावनेनं ओथंबलेल्या शब्दांत गिरीम्हणाला, समस्त शास्त्रांचा समुद्र आणि उपनिषदांचा अर्थनिधी हृदयात धारण करणारे तुम्ही आहात. तुमच्या विमल चरणांपाशी मला आश्रय द्या. हे भावनिधे, भवसागरात गटांगळ्या खात असलेल्या मला तुमच्या शरणागतीचं विशुद्ध ज्ञान द्या. समस्त लोकांना तुम्हीच परमानंद देऊ शकता, तुमच्याच कृपेनं बुद्धी शुद्ध होते आणि निजबोधात विचरण करू शकते, परमात्मा आणि आत्मा यांचं ज्ञान मला द्या. तुम्ही आणि केवळ तुम्हीच सर्व काही आहात हे जाणून माझं मन तुमच्याविषयीच्या प्रेमानं भरून जातं पण महामोहाच्या महासागरात बुडण्याचा धोका काही संपत नाही. तुम्हीच मला त्यातून बाहेर काढा. सर्वत्र तुम्हीच आहात, हे जाणलं तरच माझं जगातलं आचरण शुद्ध होईल पण या अतिदीनाला ते कसं साधावं? तुम्हीच माझं रक्षण करा. जगासाठी तुम्ही अनंत आकार घेतलेत पण या आकाराशी मला एकरूप करा. हे तत्त्वनिधे, तुमच्यासारखा ज्ञानी कुणीही नाही. तरीही शरणागत अज्ञानी जिवांनासुद्धा तुम्ही आपलंसं करता. मी तर ज्ञानाची एक शाखादेखील जाणत नाही आणि कणमात्र भौतिकदेखील माझ्या मालकीचं नाही, अशा मला हे शंकरा, वेगानं आपलंसं करा!