20 March 2019

News Flash

२. चक्र

आपण माणूस म्हणून कसे जन्माला आलो, असा प्रश्न मनात डोकावला तर त्याचं उत्तर माणूस शोधू लागतो. त्यातून पुढे येतो तो ८४ लक्ष योनींचा सिद्धांत.

| January 2, 2013 04:18 am

आपण माणूस म्हणून कसे जन्माला आलो, असा प्रश्न मनात डोकावला तर त्याचं उत्तर माणूस शोधू लागतो. त्यातून पुढे येतो तो ८४ लक्ष योनींचा सिद्धांत.  ८४ लक्ष योनीतून जीव फिरत असतो आणि या जन्म-मृत्यूच्या अविरत चक्रातून सुटण्यासाठीची संधी म्हणून त्याला मनुष्यजन्म लाभतो, असं पुराणांतरी सांगितलं आहे. म्हणजेच आपण पशु-पक्षी, जीव-जंतू, कीट-पतंग, जलचर, झाडं-वेली अशा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात जन्म घेत होतो आणि मरत होतो. अशात आपल्याला, श्रीमहाराजांच्या सांगण्यानुसार भाग्यानं माणसाचा जन्म लाभला. हा जन्म प्रयत्नांनी लाभलेला नाही, तो ‘भाग्यानं’ लाभलेला आहे. ते ‘भाग्य’ नेमकं कोणतं, ते आपण पाहाणारच आहोत पण त्याआधी आपल्या मनातील शंकाही पाहू. काहीजणांना वाटेल की हे सारं थोतांड आहे. असं ८४ लक्ष योनीचं चक्र वगैरे काही नाही. मग आपणच विचार करून पाहा आणि आपल्याही अवतीभवती निरीक्षण करा. या जगात कितीतरी प्रकारचे पशुपक्षी, कितीतरी प्रकारची झाडं, वेली, पानं, फुलं आहेत. कितीतरी प्रकारची माणसं आहेत. हे सृष्टीतलं जे विराट वैविध्य आहे त्याचा अंतस्थ समान धागा म्हणजे ही सारी सृष्टी स+जीव आहे! अर्थात प्रत्येक वस्तुमात्रात जीव आहे. ज्या गोष्टींना आपण निर्जीव म्हणतो त्यातील कित्येक गोष्टींचं मूळ सजीवातच आहे. लाकडी खुर्ची घ्या. ते लाकूड जिवंत झाडाचंच तर होतं. तेव्हा सजीव आणि निर्जीव  वस्तुंनी हे जग भरलेलं आहे. या दोघांतही एक समान धागा आहे तो अस्तित्वाचा. श्रीमहाराज यांनी नाम श्रेष्ठ की रूप श्रेष्ठ या चर्चेतही या अस्तित्वाचाच, आहेपणाचाच अभिनव सिद्धांत सांगितला आहे. सजीवही आहे आणि निर्जीवही आहे! थोडक्यात जीवत्व, अस्तित्व हे चराचरातला समान धागा आहे. मग आपणच माणूस का बनलो आणि दुसरा एखादा जीव प्राणी म्हणून किंवा झाडं म्हणून का जन्मला? सारंच जर थोतांड असेल तर अमक्यालाच माणसाचा आणि तमक्याला मुक्या प्राण्याचाच जन्म लाभेल, हा निर्णय कसा झाला? कुणी केला? ही गुंतागुंत एवढीच नाही. माणसाचा जन्म लाभूनही एखादा कंगाल असतो तर कुत्र्याचा जन्म लाभूनही श्रीमंताघरचं लाडकं श्वान झाल्यानं एखादं कुत्रं ऐषारामात जगत असतं. अर्थात जन्म लाभूनही त्या जन्मातलं ‘सुख-दुख’ वेगवेगळं असतं. त्याचं कारण प्रारब्ध सांगितलं जातं. मग कुठेतरी जाणवतं की चराचराचं हे गूढ उकलण्यापलीकडचं आहे. अशा या चराचरात आपल्यालाही माणसाचाच जन्म का लाभला, हे सांगणं कठीण आहे. मग काहीजण सांगतात, पाप आणि पुण्य समान झालं की माणसाचा जन्म लाभतो. आता यातही काही तथ्य नाही. कारण माणसाचा जन्म लाभण्याआधीच्या जन्मापर्यंत मी जर पशुयोनीत असेन तर प्राण्याकडून होणाऱ्या कृतींचं ‘पाप’आणि ‘पुण्य’ असं वर्गीकरणही कठीण मग ते समसमान होणं तर दूरच!

First Published on January 2, 2013 4:18 am

Web Title: chakra
टॅग Chaitanya Chintan