विश्वातील तमाम हिंदूंना एकत्रित करण्याच्या हेतूने एक विश्वव्यापी हिंदू संघटना तयार करावी ही संघाचे ज्येष्ठ कार्यकत्रे दादासाहेब आपटे यांची कल्पना. तिला १९६४ च्या ऑगस्टमध्ये मूर्त स्वरूप प्राप्त झाले. त्या महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर विश्व हिंदू परिषद नावाची संघटना जन्माला घालण्यात आली. संघेतिहासातील ती एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना. तिला श्रीकृष्ण जन्माष्टमीला पन्नास वष्रे पूर्ण झाली. त्या सुवर्णजयंती महोत्सव शुभारंभ सोहळ्यात विहिंपचे महामंत्री चंपतराय यांनी प्रास्ताविक केले. त्यानुसार ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून करण्यात येत असलेले हिंदूंचे धर्मातर रोखणे, अस्पृश्यता संपविणे, विदेशातील हिंदूंची धार्मिक कर्मभ्रष्टता संपवून त्यांना हिंदूमार्गावर आणणे, गोरक्षा करणे आदी विहिंपच्या स्थापनेमागील हेतू होते. ते बऱ्यापकी सफल झाले असून, गेल्या ५० वर्षांत याबाबतीत विहिंपने मोठे काम केले आहे. या विश्वात हिंदू समाज आणि धर्म आज जो काही ‘गर्वा’ने उभा आहे तो आमच्यामुळेच असे विहिंपचे म्हणणे आहे. अर्थात येथे ही बाब लक्षात घ्यावी लागेल की, अ. भा. मराठी साहित्य संमेलन ज्या अर्थाने अखिल भारतीय असते, त्याच अर्थाने विहिंपची वैश्विकता असते. तेव्हा विश्वातील हिंदूंची संघटना म्हणून जरी विहिंप उभी असली, तरी हिंदूंतील बराच मोठा वर्ग या विचारसरणीच्या विरोधात आहे. तो किती याचा अंदाज २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतून येऊ शकतो. या निवडणुकीत संघपरिवार पूर्ण ताकदीनिशी उतरून आणि ‘मतदानाचा टक्का वाढवा’ असे सुस्पष्ट आवाहन देशवासीयांना सरसंघचालकांनी करूनदेखील भाजपला ३१ टक्के मते मिळाली आणि मित्रपक्षांना सात टक्के. याचा अर्थ सुमारे ६२ टक्के मते विरोधात गेली. विहिंपसमोरील आव्हान केवढे मोठे आहे हेच यातून दिसते. यापुढील काळात विहिंपला या विरोधाचा मुकाबला करायचा आहे. अर्थात त्याची तयारी कधीच सुरू झाली आहे. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी, जर्मनीत राहणारा जर्मन, तर हिंदुस्थानात राहणार हिंदू का नाही, असा सवाल करून हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही संघीय भूमिका पुन्हा मंचावर आणणे हा याच लढय़ाचा भाग. सुवर्णजयंती सोहळ्यानिमित्ताने झालेल्या भाषणांतून त्याचे दिशादिग्दर्शन झाले. तेव्हा भारतात राहणारे ते सारे भारतीय ही भूमिका यापुढील काळात अराष्ट्रीय ठरल्यास नवल नाही. यातून धार्मिक तेढ होईल, असे काही छद्म धर्मनिरपेक्षतावादी म्हणतात. पण हिंदुस्थानातील मुसलमानही हिंदूच म्हटल्यावर तेढ संभवतेच कोठे? धर्मातर हा विहिंपच्या कार्यक्रमपत्रिकेतील अग्रस्थानावरील विषय. यापुढे त्यावर भर देण्यात येईल असे संकेत विहिंप-स्नेह्य़ांचे प्रेरणास्तंभ प्रवीण तोगडिया यांनी दिलेच आहेत. धर्मातर आणि वाढता जननदर यांमुळे अहिंदूंची संख्या दिनदुगनी वाढत आहे, हे संघात कोणाला अमान्य आहे? शिरगणतीची आकडेवारीही असेच काहीसे सांगते. १९६१ मध्ये येथील हिंदूंची संख्या ८३.५ टक्के होती. ती घटली. २००१ मध्ये ती ८०.५ झाली. मुस्लिमांची मात्र वाढली. १९६१ मध्ये ती १०.७ होती. ती २००१ मध्ये अतिप्रचंड म्हणजे १३.४ झाली. ख्रिस्ती धर्मातरात पटाईत. त्यांची लोकसंख्या २.४ वरून २.३ टक्क्यांवर आली. याला आळा घालणे हे विहिंपचे लक्ष्य असणार आहे. त्याकरिता हिंदूंनी किमान दहा मुले जन्मास घालावीत असा कार्यक्रम तोगडिया यांनी दिला आहे. किमान संघानुयायी व संघस्नेही त्यावर विचार करतील असा त्यांचा विश्वास असावा. बाकी मग रामलल्लाचे मंदिर हे सवयीचे आव्हान आहेच. या सुवर्णजयंती वर्षांतही ते पेलले जाईल. यामुळे मोदींच्या सरकारपुढील आव्हाने वाढतील अशी भीती व्यक्त होते. पण ते सरकार म्हणजे विहिंपच्याच चळवळीची मोठी उपलब्धी मानली जाते, हे विसरून कसे चालेल?