दिल्लीत सध्या दंगलीची हवा आहे. एक दंगल ऐन दिवाळीत झाली.. दुसरीची तयारी मोहरमचे निमित्त साधून सध्या सुरू आहे. या दंगलीचे कारण तिसरीच दंगल आहे;  ती म्हणजे निवडणुकीची. येत्या काही दिवसांत तिचीही घोषणा होईल. त्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत दिल्लीच्या त्रिलोकपुरीसारख्या निमशहरी झोपडपट्टय़ांच्या भागात, बवानासारख्या औद्योगिक पट्टय़ात तणावाचेच वातावरण राहणार आहे. कारण साधे आहे. या दंगलींचा हेतूच मुळी निवडणुकीसाठी सामाजिक ध्रुवीकरण करणे हा आहे. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूरमध्ये लोकसभा निवडणुकांच्या आधी जे घडले तेच आता दिल्लीत सुरू आहे. मुजफ्फरपूरमध्ये कश्यप, वाल्मिकी आणि झिमर या (हिंदू) जमाती विरुद्ध मुस्लीम असा दंगा झाला. दिल्लीच्या पूर्व भागातील त्रिलोकपुरीमध्ये तो वाल्मिकी विरुद्ध मुस्लीम असा झाला. कोणत्याही दंगलीची सुरुवात कोणत्या तरी तात्कालिक कारणामुळे होते. त्रिलोकपुरीत मशिदीनजीक एका मोकळ्या जागेत काही तरुणांनी एका मंडपात सुरू केलेला देवीचा उत्सव हे कारण घडले. त्या उत्सवात डीजेच्या िभती उभारण्यात आल्या होत्या, त्या आवाजावर मुस्लिमांनी आक्षेप घेतला. बाचाबाची झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी दंगल पेटली. या काळात पोलिसांची भूमिका नेहमीप्रमाणेच संशयास्पद राहिली. एका प्रसंगी तर पोलिसांऐवजी काही तृतीयपंथीयांनी दंगेखोरांचा सामना केला. आता तेथे – बातम्यांमध्ये तणावपूर्ण म्हणतात तशी – शांतता आहे. पण आता बवानानामक विभागात दंगलीची पेरणी सुरू आहे. मोहरमच्या ताजियाची मिरवणूक आम्ही आमच्या भागातून काढू देणार नाही अशी भूमिका बवानातल्या महापंचायतीने घेतली आहे. ठिणगी केव्हाही पडेल अशी चिन्हे आहेत. पण दंगलींमध्ये कोणी पहिल्यांदा आगळीक केली हा मुद्दाच नसतो. ती आग आधीच मनांमध्ये पेटलेली असते. त्याला हवा देण्याचे काम करणारे कोण हे ओळखणे महत्त्वाचे असते. त्रिलोकपुरीतील वाल्मिकी समाज हा काँग्रेसचा पाठीराखा. गेल्या निवडणुकीत त्याने आम आदमी पक्षाला मतदान केले. आपबद्दल आता त्याचा भ्रमनिरास झाला आहे आणि आगामी निवडणूक भाजपला जिंकायची आहे. भाजपच्या एका माजी आमदाराने दंगलीच्या आदल्या रात्री बठक घेतली होती अशा बातम्या आहेत, त्यांचा इन्कार त्या आमदाराने केलेला नाही. बवानामध्ये मुस्लीम कसे गायी पळवून मारतात वगरे पत्रके वाटली जात आहेत. तेथील महापंचायतीला भाजपचे आमदार गुगनसिंग रंगा आणि काँग्रेस नगरसेवक देवेंदर कुमार हे हजर होते. हे सर्व राजकीय षड्यंत्राकडेच बोट दाखविणारे आहे. यात गोपनीय वा मुलखावेगळे काहीही नाही. विकासाच्या बाता प्रचारापुरत्याच असतात. धर्म आणि जातींवरच निवडणुका लढल्या जातात. तेथे दंगल हा धार्मिक ध्रुवीकरणातून मतांची बेगमी करण्याचा उत्तम मार्ग असतो. पण सर्वसामान्यांचे काय? ते का या राजकारणाच्या फशी पडतात? हे जर नि:पक्षपणे समजून घ्यायचे तर २०११च्या लंडन दंगलीकडे पाहावे लागेल. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि गाíडयन वृत्तपत्र यांनी संयुक्तपणे या दंगलीचा अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष फार वेगळे नाहीत. पण जनसमज आणि वस्तुस्थिती यांतील अंतर स्पष्ट करणारे आहेत. त्या अभ्यासानुसार दंगलीचे तात्कालिक कारण जे एका कृष्णवर्णीय तरुणाची हत्या, ते फार महत्त्वाचे नव्हतेच. त्या दंगलीची सर्वाधिक महत्त्वाची कारणे होती दारिद्रय़, पोलीस आणि सरकार यांच्याविषयीचा असंतोष, गुंडांच्या टोळ्या, पालकांचे अपयश. समाजमाध्यमे आणि वृत्तमाध्यमे यांचा दंगलीला हातभारच लागतो असे त्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. दंगली घडतात, त्यामागे ही खरी कारणे असतात. ती आहेत म्हणून आज दिल्ली, उद्या मुंबई अशी पेटवापेटवी करणारे हात यशस्वी ठरतात. निवडणुका ही त्या हातांची मनरेगा असते एवढेच.