गरिबीशी थेट दैनंदिन सामना करीत, या हलाखीतून निकोप अर्थकारण फुलविणे हे काम ज्यांनी आजवर व्यावसायिकतेने केले, त्या चंद्रशेखर घोष यांच्यावर आता अधिक महत्त्वाची जबाबदारी येऊन ठेपली आहे.
प्रचंड आर्थिक संसाधने हाती असलेल्या अंबानी, बिर्ला, बजाजसारख्या बडय़ा उद्योगघराण्यांच्या तुलनेत घोष यांनी स्थापलेला बंधन फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस हा उपक्रम खरे तर सूक्ष्मसे रोपटे ठरावा, तरी रिझव्‍‌र्ह बँकेने भविष्यातील खासगी बँक म्हणून त्यांना नाकारून बंधनच लायक असल्याची पसंती द्यावी, हे लक्षणीयच! ५२ वर्षीय घोष यांच्या प्रेरणा, साध्य आणि साधन हे सारे गावातील गरीब शेतकरी, शेतमजूर, कारागीर, तर शहरी झोपडपट्टय़ांतील श्रमिक, निराधार, परित्यक्ता महिला यांभोवती गुंफलेले आहे. आपापला गट बनवून प्रत्येकाने पै-पै वाचवत पुंजी उभारायची आणि त्याच पुंजीतून एकरकमी कर्जरूपी मदत गटातल्याच ज्याला कुणाला गरज पडेल त्याला मिळवून द्यायची, असे स्वयंसाहाय्याच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचा वस्तुपाठ घोष यांच्या बंधनने ‘बीमारू’ म्हणून गणल्या गेलेल्या बंगालसह आसाम, बिहार, त्रिपुरासह सर्व पूवरेत्तर राज्यांत इमानाने गिरविला, त्याचा एक प्रकारे गौरवच रिझव्‍‌र्ह बँकेने केला आहे.
आपल्यासारखा सहकार चळवळीचा पारंपरिक परिपाठ नाही, बचतगट वगैरे असलेच तरी त्यांचा पूर्वानुभव चांगला नसणे, तर त्या उलट अलीकडेच उलगडा झालेल्या ‘शारदा’ नावाने चिटफंड भामटय़ांचा धुमाकूळ सुरू असलेल्या पूर्व भारतातून तळागाळातील जनघटकांचे वित्तीय समावेशन आणि पर्यायाने बळकटीकरणात बंधनने जपलेले स्वारस्य पाहता, तिचे परिपूर्ण बँक म्हणून संक्रमण हा ‘मास बँकिंग’चा भारताने आजवर कधीही न पाहिलेला प्रयोग ठरावा. खरे तर अशा प्रयोगशीलतेचे धडे हे घोष यांनी त्यांची प्रारंभिक कर्मभूमी बांगलादेश आणि तेथील विख्यात ब्रॅक या संस्थेतील कामातून अनेकवार गिरविले आहेत.
तळागाळातून वित्तीय सहभागितेसाठी जगभरात नावाजली गेलेली बांगलादेशची ग्रामीण बँक हाच आपला आदर्श असल्याचे घोष सांगतात. बँक चालवायची तर शाश्वतता आणि समन्याय या बाबी केंद्रस्थानी असल्यास, याच गोष्टींकडून नफ्याची काळजी आपोआपच घेतली जाते, असा घोष यांचा बिनदिक्कत विश्वास आहे. या विश्वासामागे बंधनच्या सध्याच्या ५४ लाख कर्जदार ग्राहकवर्गातूनच त्यांचा सुमारे १३,००० कर्मचारी ताफा उभा राहिला असल्याचे समीकरण निश्चितच आहे. अर्थव्यवस्थेच्या भरधाव प्रगतिपथावरून दूर फेकल्या गेलेल्या घटकांची कड-कणव घेऊन उभा राहिलेला घोष यांचा अर्थध्यास म्हणूनच लक्षणीय ठरतो.