भारताच्या दार्शनिक इतिहासात अद्वितीय स्थान असलेल्या तर्कनिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्यवादी चार्वाक दर्शनाला इतर सर्व दर्शनांनी – अगदी जैन व बौद्ध या नास्तिक दर्शनांनीसुद्धा तुच्छ लेखले. त्यांच्या युक्तिवादांना पटण्याजोगी उत्तरे देता येईनात म्हणून सर्वानी त्यांची यथेच्छ निंदा केली.
शरद बेडेकर
चार्वाकांची निंदा करण्याकरिता, ते अविचारी व भोगवादी होते, या मताचा पुरावा म्हणून वारंवार सांगितला जाणारा, ‘कर्ज काढूनही तूप प्या’ असे सांगणारा, चार्वाकांचा म्हणून सर्वदर्शन संग्रहात आलेला मूळ श्लोक असा आहे :
यावत्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत्
भस्मीभूतस्य देहस्य, पुनरागमनं कुत:?
म्हणजे जोपर्यंत जगायचे, तोपर्यंत सुखाने जगावे. कर्ज काढून तूप प्यावे. कारण भस्म झालेले शरीर पुन्हा कसे बरे परत येणार?
काही अभ्यासकांचे म्हणणे असे आहे की, हा श्लोक चार्वाकांच्या नावाने घुसडण्यात आलेला आहे किंवा ‘ऋणं कृत्वा घृतं पिबेत्’ हा भाग तरी मूळ श्लोकात नसावा. याबाबत चार्वाक दर्शनाचे एक चिकित्सक अभ्यासक श्री. आ. ह. साळुंखे (ग्रंथ : आस्तिक शिरोमणी चार्वाक) यांची भूमिका अगदी वेगळी, पण मननीय आहे. त्यांच्या मते जरी हा संपूर्ण श्लोक चार्वाकांचाच असला आणि मुद्दाम जरी त्याचा वरवरचा अर्थ घेतला तरीसुद्धा:-
१) चार्वाकांनी कर्ज काढावे असे सांगितले. ते फेडू नये असे काही सांगितले नाही. (कारण पुढील जीवन सुखी होण्यासाठी कर्जफेड केली पाहिजे हे त्यांना नक्कीच कळत होते.)
२) चार्वाकांनी कर्ज काढावे, असे सांगितले; पण भारी व्याजाने काढावे, असे काही सांगितले नाही. मनुस्मृतीत चार वर्णाकडून अनुक्रमे दरमहा २, ३, ४ व ५ टक्के व्याज (म्हणजे शूद्राकडून सर्वात जास्त व्याज) घ्यावे असा अन्यायकारक नियम आहे.
३) चार्वाकांनी कर्ज काढून ‘तूप’ प्या, असे सांगितले. सोमरस, मदिरा किंवा दारू प्या, असे नाही.
४) चार्वाकांनी कर्ज काढून तूप ‘प्या’, असे सांगितले. ते ‘यज्ञात जाळून टाका’, असे काही सांगितले नाही.
५) चार्वाकांनी तूप पिण्यासाठी ‘कर्ज’ घ्या, असे सांगितले. त्यासाठी दुसऱ्याला ‘लुबाडा’, असे काही सांगितले नाही. (याविरुद्ध यज्ञ, दक्षिणा व प्रसंगोपात्त, ब्राह्मणाने इतरांना लुबाडण्याचे अनेक नियम, संदेश आमच्या तथाकथित धर्मग्रंथांमध्ये आहेत.)
सूत्र शैलींतील श्लोकांचा वाच्यार्थ न घेता त्यांचा आशय पाहिला पाहिजे. चार्वाकांच्या वरील श्लोकाचा आशय असा आहे की, ‘‘प्रसंग पडल्यास कर्जही घ्या. मात्र ते कर्ज शेती, पशुपालन, व्यापार, उद्योगधंद्यासाठी वापरा, कष्ट करा; उत्पादन करा आणि नेहमी तूप पिता येईल असे ‘समर्थ’ बना. कर्जफेड करून आयुष्य सुखाने जगा. पारलौकिक भ्रमांच्या पाठीस लागून, तूप उगाच यज्ञात जाळून टाकण्यापेक्षा, ते तुमच्या शरीराच्या आरोग्याच्या कामी येऊ द्या.
हा सल्ला कुठल्याही काळात सामान्य जनतेला उपयोगी होईल असा योग्य व उपयुक्त सल्ला नाही का? यात काय वाईट सांगितले चार्वाकांनी?
मागील प्रकरणात उल्लेख केलेले प्रा. सदाशिव आठवले यांच्या ‘चार्वाक – इतिहास आणि तत्त्वज्ञान’ (प्राज्ञ पाठशाला मंडळ – वाई) या लहानशा, पण सुंदर ग्रंथात इ.स.च्या चौदाव्या-पंधराव्या शतकात पूर्णावस्थेत पोहोचलेले ‘चार्वाक दर्शन’ काय सांगत असावे त्याचा त्यांनी अंदाज केला आहे व ते दर्शन खालीलप्रमाणे असावे असे स्पष्ट केले आहे.
१) आत्मा, ईश्वर, पुनर्जन्म, कर्मफलसिद्धांत इत्यादी : माणसाचा चैतन्ययुक्त देह हाच आत्मा असून, माणसाच्या जन्मापूर्वी अस्तित्वात असलेला किंवा मृत्यूनंतर टिकू शकणारा असा कसलाही आत्मा अस्तित्वात नाही. जग व जीव यांची निर्मिती निसर्गस्वभावाने घडून येते. ईश्वर नाही, त्यामुळे त्याच्या उपासनेची काही गरज नाही. भस्म झालेल्या शरीराचा पुनर्जन्म शक्य नाही. ‘पुनर्जन्म घेऊन, आत्म्याला कर्मफळ भोगावे लागते,’ असे सांगणारा कर्मफलसिद्धांतही खरा नव्हे. तुमची सुखदु:खे पूर्वजन्मांतील पाप-पुण्यामुळे नाहीत. तसे सांगणारा दैववाद सोडा. प्रयत्नवाद स्वीकारा. स्त्री-पुरुष समान आहेत. पातिव्रत्य हे मूल्य नसून, जुलमी पुरुषांनी स्त्री-स्वातंत्र्यावर उगारलेले ते हत्यार आहे.
२) महाभूतात्मक विश्व, यज्ञ, परलोक, धर्म, मोक्ष इत्यादी : हे विश्व आणि हा देह व त्या दोहोंतील चैतन्य ही पंचमहाभूतांच्या संयोगाने निसर्गत: निर्माण होतात. यज्ञामध्ये हिंसा, कामचेष्टा वगैरे दोष असून, यज्ञ हा अन्नधान्याचा अपव्यय आहे. म्हणून यज्ञ करू नका. स्वर्ग-नरक नाहीत. परलोक नाही. पारलौकिक फळे नाहीत. तशा कर्मफळांसाठी कर्मकांड करायला सांगणारे धूर्त, स्वत:च्या ऐहिक व आर्थिक लाभासाठी तसे सांगतात. यज्ञ व कर्मकांड करा सांगणारा धर्म, चार्वाकांनी अमान्य केला. त्यांनी मोक्षही नाकारला व ‘मोक्ष’ हा पुरुषार्थ हेही नाकारले. मृत्यू हाच मोक्ष. ‘स्वातंत्र्य’ हे जीवनाचे सर्वश्रेष्ठ ईप्सित.
३) प्रमाण, राजसत्ता, चातुर्वण्र्य इत्यादी : ‘प्रत्यक्ष हेच प्रमाण’. कुणाचे शब्द आणि ग्रंथ, अगदी वेदसुद्धा प्रमाण नाहीत. अनुमानेही प्रमाण नाहीत; परंतु व्यवहारापुरती ‘प्रत्यक्षमूल व सयुक्तिक अनुमाने प्रमाण मानायला हरकत नाही. ‘राजसत्ता’ जिची उपयुक्तता उघड दिसते ती चार्वाकांनी मानली. न्याय, नीती इत्यादी जीवनमूल्यांचाही त्यांनी स्पष्ट पुरस्कार केला. मात्र चातुर्वण्र्य, जातिभेद, त्यांतील वंशशुद्धी आणि उच्च-नीचतेच्या सर्व कल्पना अशास्त्रीय आहेत, असे त्यांनी सांगितले. सर्व वर्णाचे लोक समान आहेत.
४) सुखवाद : चार्वाकांनी सुखवाद सांगितला. शेती, व्यापार, नोकरी करून सुख मिळवावे, असे त्यांनी सांगितले. ‘सुखासाठी स्वैराचार करू नये’ व ‘संयम पाळावा’ असे आणि बहुजनांच्या कल्याणासाठी चार्वाक मताचाच आश्रय घ्यावा, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यांच्या या सुखवादाचा हेतुत: चुकीचा अर्थ लावून ते भोगवादी होते, असे खोटेच आरोप त्यांच्यावर केले गेले.
भारताच्या दार्शनिक इतिहासात अद्वितीय स्थान असलेल्या या तर्कनिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्यवादी, चार्वाक दर्शनाला इतर सर्व दर्शनांनी – अगदी जैन व बौद्ध या नास्तिक दर्शनांनीसुद्धा तुच्छ लेखले. त्यांच्या युक्तिवादांना पटण्याजोगी उत्तरे देता येईनात म्हणून सर्वानी त्यांची यथेच्छ निंदा केली. जैन व बौद्ध धर्माबाबत असे म्हणता येईल की, या दोन्ही धर्मानी वेद, यज्ञ व ईश्वरब्रह्म यांना नाकारले होते, तरी त्यांनी कोणत्या तरी स्वरूपात आत्मा व त्याचा पुनर्जन्म स्वीकारले होते. मोक्षाऐवजी अनुक्रमे कैवल्य आणि निर्वाण मानले होते. त्यांनी स्वत:चे कर्मकांड व पूजा-प्रार्थनाही निर्मिल्या होत्या. याउलट चार्वाक हे एवढे तत्त्वनिष्ठ होते की, त्यांनी यासारखी कुठलीही तडजोड केली नाही. कदाचित, चार्वाक थोडेसे होते म्हणून किंवा जनतेत प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते व कार्यक्रम ते तयार करू शकले नसावेत म्हणून किंवा आणखी काही कारणाने असेल, पण चार्वाकांचे ‘प्रत्यक्ष प्रमाणवादी मत’ फारसे लोकप्रिय होऊ शकले नाही हे खरे. लोकांनी ईश्वर, त्याचे कर्तृत्व आणि त्याची उपासना मान्य करण्यात ज्या पुरोहितशाहीचे हितसंबंध गुंतलेले होते त्यांनी, चार्वाक हे त्यांचे वैरी म्हणून, त्यांच्या मताचा द्वेष केला व ते मत नष्टप्राय करण्यात ते यशस्वी झाले असेही झाले असणे शक्य आहे.
आणि मग काय? निसर्गाचे व निसर्गशक्तींचे भौतिक नियम शोधून काढण्याऐवजी (म्हणजे विज्ञानाच्या मार्गाने जाण्याऐवजी) उलट दिशेला वळून हजारो वर्षे आपण भजन-कीर्तन, पुराणांच्या चमत्कार कथा, पूजा-प्रार्थना व पुण्यसंचय करीत पिढय़ान्पिढय़ा आयुष्य व्यतीत करीत राहिलो. शतकानुशतके आपण भारतीयांनी असलाच पुण्यसंचय केला. त्यासाठी आपण देशसंरक्षणसुद्धा दुर्लक्षिले, कारण ईश्वर आपल्या देवळांचे व देशाचे, मुसलमानी आक्रमकांपासून संरक्षण करील, ही आम्हा भक्तांची धर्मश्रद्धा. त्यामुळे उणीपुरी पाच शतके (१३वे ते १८वे शतक) बाहेरून आक्रमण करून आलेल्या मुसलमान राज्यकर्त्यांनी आमच्यावर सहजासहजी राज्य केले.
शिवाजी महाराजांच्या मराठी राज्यानंतर पुढे हे तरी बरे झाले की, (मुसलमान राज्यकर्त्यांऐवजी), इंग्रजांसारख्या प्रगत युरोपीय राजवटीने शे-दीडशे वर्षे भारतावर राज्य केले. त्यामुळे आपण आधुनिक जगाच्या मुख्य प्रवाहात तरी सामील झालो आणि त्यामुळे कालांतराने संगणक, माहिती व दूरसंचार क्रांतीत आपण सामील तरी होऊ शकलो आणि आज आपली इस्रो अभिमानाने मंगळयानसुद्धा सोडू शकली. नाही तर जग अनेक क्षेत्रांत वैज्ञानिक प्रगती करून संपन्न होत असताना आपण आजही यज्ञात आहुती टाकीत आणि तपश्चर्या, व्रते करीत अनेक  देवांना प्रसन्न करून घेत राहिलो असतो. आज अर्थातच आपण भारतीय स्वत:च्या पायांवर उभे आहोत आणि आपल्याला ज्या दिशेला वळायचे आहे तिकडे आपण वळू शकतो.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!