सर्वाकडे एकवार नजर टाकत कुशाभाऊ म्हणाले..
कुशाभाऊ – केवळ कष्ट करणं आपल्या हातात आहे, त्या कष्टाला यश येणं न येणं हे परमेश्वराच्या हातात आहे, हे शेतकऱ्याला जितकं उमगतं तितकं कुणालाच उमगत नाही बघा. शेतकऱ्याचे कष्ट कधीच संपत नाहीत. पेरणीपासून पिक हाती आल्यानंतरही त्याचे कष्ट संपत नाहीत. बरं शेती झाली, पण पाऊस पडेल की नाही? त्याला सांगता येत नाही. पाऊस कमी पडला तरी आणि जास्त पडला तरी चिंता असते. सर्व काही ठीक झालं तर टोळधाडीची भीती असते. टोळधाडही नाही आली तरी कीड लागण्याची किंवा कसला ना कसला रोग पडण्याची भीती असते. सगळ्यातून पार पडलो तरी चांगली किंमत मिळण्याची शाश्वती नसते.. मागे शहरातच एकदा एकाकडे गेलो होतो. बाई स्वयंपाक करीत होती. हातून मोहरी सांडली. तिनं खुशाल टाकून दिली. मला काय हळहळ वाटली. अहो किती नाजूकपणं झोडपणी होऊन, जमिनीवरची मोहरी सांभाळून सांभाळून वेचावी लागते.. खरंच प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी शेतात काम केल्याबिगर शेतकऱ्याचं दु:खं, शेतकऱ्याचे कष्ट आणि शेतकऱ्याचा आनंद काहीच कळायचं नाही बगा.. तेव्हा कष्ट आपल्या हातात हायेत, यश नव्हं, हे शेतकऱ्यालाच समजतं.. म्हणून बघा भक्ती शेतकऱ्याच्या रक्तातच असते.. निसर्गाचं नवनवं जन्मणं पहिलं तोच अनुभवतो ना!
बुवा – शेतकरी जसा कष्ट करतो तसेच कष्ट संसारात गुंतलेला प्रत्येकजण उपसतच असतो. शेतकऱ्याला जशी प्रत्येक टप्प्य्यावर चिंता असते ना, तशीच चिंता सामान्य माणसालाही असतेच.. याचं कारण पुढे काय होणार, हे माहीत नाही आणि ते मनासारखंच व्हावं, हीच आस आहे तोवच चिंता आणि भीती कुणाला सुटली आहे? असा माणूस दिवसरात्र कष्टांतच बुडाला तरी त्याचे कष्ट कधीच संपत नाहीत.. म्हणूनच सावता माळी महाराज म्हणतात, कष्ट करता जन्म गेला तुझा विसर पडला! या कष्टांचं जे मूळ आहे ना ते आसक्तीतच आहे. ती आसक्तीच तू नष्ट कर, असं या धुरीणाला साकडं आहे.. मग अखेरीस काय म्हणतात? ‘‘माळी सावता मागे संतान। देवा करी गा नि:संतान!!’’
कर्मेद्र – याचा अर्थ तर सोपा आहे, की देवा मी मूल मागितलं तरी तू मला निपुत्रिक कर..
हृदयेंद्र – (मोबाइलमध्ये काहीतरी शोधत) पण एवढाच अर्थ नाही यात.. फार विलक्षण अर्थ आहे..
कर्मेद्र – मला अपेक्षा होतीच!
हृदयेंद्र – (हसत) या अपेक्षेतच या चरणाचा अर्थ दडला आहे!
योगेंद्र – म्हणजे?
हृदयेंद्र – अचलानंद दादांना मी दूरध्वनी केला होता, ते घरी नव्हते. माईंना म्हणालो, एका अभंगाचा अर्थ हवाय, तुम्हाला अभंग सांगून ठेवू का? तर म्हणाल्या, माझ्या डोक्याशी कमी का ताप आहे! मग मी त्यांना एसएमएसनं अभंग पाठवला.. त्यांनी गाथेतही वाचला.. मग मला थोडय़ा वेळापूर्वी दोन-चार वाक्यं पाठवल्येत.. त्यात या संतान आणि नि:संतान या शब्दांवर त्यांनी फार विलक्षण प्रकाश टाकलाय.. ते म्हणाले, संस्कृत-इंग्रजी शब्दकोषात संतानम् या शब्दाचा अर्थ आहे सातत्य! कंटिन्युटी, कंटिन्युअस फ्लो, कंटिन्युअन्स! तर म्हणाले एका गोष्टीचं सातत्य सावता माळी महाराज मागत आहेत आणि दुसऱ्या गोष्टीचं सातत्य तोडून टाकायला सांगत आहेत!
बुवा – वा वा!! अहो मी संतानचा बराच विचार करून पाहिला होता.. स्वर्गात इंद्राचे जे पाच वृक्ष आहेत ना त्या पाच वृक्षांमध्ये एकाचं नाव संतान आहे.. पण तरी अर्थ काही लागेना.. आता या एका शब्दार्थानं किती अर्थ लागतोय पहा..
कर्मेद्र – माझा एक चित्रकार मित्र होता.. लोक त्याच्या चित्रांचे जे काही अर्थ लावायचे ना, ते ऐकून हळूहळू त्याला वाटू लागलं की आपलं चित्र आपल्यापेक्षा लोकांनाच अधिक कळतंय! तसं चाललंय हृदू तुझं! किती साधा अर्थ आहे की देवा मी मूल मागेनही पण शेवटी मूल म्हणजे संसारात अडकणंच. जर संसाराचा नाश हवा असेल तर मला मूलबाळ काही देऊ नकोस.. आता यात कसलं सातत्य नि कसलं काय?
हृदयेंद्र – अगदी बरोबर.. मूल म्हणजेही अपूर्त इच्छांच्या पूर्तीच्या ओढीचं सातत्यच नाही का कर्मू?
चैतन्य प्रेम