मूल म्हणजेही अपूर्त इच्छांच्या पूर्तीच्या ओढीचं सातत्यच, या हृदयेंद्रच्या उद्गारांवर सर्वाच्याच मनात विचारतरंग उमटले..
बुवा – खरं आहे.. मला जे जमलं नाही, ते मुलाकडून व्हावं.. त्यानं अधिक चांगला पैसा कमवावा, मला सुखात ठेवावं.. असं प्रत्येक बापाला वाटतंच.. मला जे करायचं होतं, ते परिस्थितीनं म्हणा, नशिबाची साथ नसल्यानं म्हणा जमलं नाही, ते मुलांकडून व्हावं, असंही बापाला वाटतं. मग मुलाची आवड आहे की नाही, त्याचा कल, त्याची क्षमता आहे की नाही, हे न पाहाता आपली आवड, आपली अपूर्त इच्छा मुलांवर लादली जाते.. तेव्हा या अर्थानंही मूल म्हणजे अपूर्त इच्छांचं सातत्यच आहे.. अगदी खरं..
हृदयेंद्र – आणि दुसरा अर्थ अचलदादांच्या संदेशातून जाणवला तो असा की एक सातत्य निर्माण करायला आणि दुसरं सातत्य नष्ट करायला सावता माळी महाराज सांगत आहेत.. ते सातत्य कोणतं असावं? मग जाणवलं भक्तीचं सातत्य, उपासनेचं सातत्य आपल्यात नसतंच.. ते निर्माण करायला महाराज सांगत आहेत आणि भवविषयांमागे वाहावत जाण्याचं सातत्य आपल्यात असतं ते तोडायला महाराज सांगत आहेत.. कारण या भवविषयांचा गुलाम होण्यात नुसते कष्टच आहेत, हे त्यांनी आधीच्या चरणातच सांगितलं आहे..
कर्मेद्र – पण अखेर माणूस सारं काही आनंदासाठीच करत असेल तर मग तो आनंद उपासनेतून मिळाला काय आणि भौतिक संपन्नतेून मिळाला काय, काय हरकत आहे? हं आता तू म्हणशील, भौतिकाच्या भोगातून जन्म-मृत्यूच्या चक्रात माणूस अडकतोच.. पण पुढचा जन्म कुणी पाहिलाय? तो आला तरी त्या जन्मीही भौतिक आनंद मिळवूच की!
योगेंद्र – पण कर्मू दुसऱ्यावर किंवा दुसऱ्या गोष्टींवर जो आनंद अवलंबून असतो तो किती ठिसूळ असतो! साधी वीज गेली तर तुझा आनंद मावळतो.. हव्या त्या चित्रपटाचं तिकीट नाही मिळालं, तरी तुला दु:खं होतं.. ख्याती थोडी जरी रागावली तरी तू अस्वस्थ होतोस..
कर्मेद्र – जो नवरा अस्वस्थ झाल्याचं दाखवत नाही तो भविष्यातल्या धोक्यांचा विचारच करत नसला पाहिजे.. मी अस्वस्थ झाल्याचं दाखवतो तरी किंवा ‘रागावलीस की तू किती छान दिसतेस’, असं म्हणून तिला शांत करायचा प्रयत्न करतो.. खरंच ज्या कुणा पुरुषाला हे वाक्य सर्वप्रथम सुचलं ना त्याच्या बुद्धिमत्तेला लाख लाख सलाम.. पण हे बघं, भले अशा गोष्टींनी मी दु:खी होतही असेन. पण वीज काही कायमची जात नाही, बायको काही कायमची रागावत नाही..
योगेंद्र – (हसत) मुद्दा इतकाच आहे की बाहेरच्या म्हणून जितक्या गोष्टींवर आपला आनंद अवलंबून असतो तितका तो मावळण्याचा धोकाही अधिक असतो.. साधकानं आत्मतृप्त होण्याचा योग साधला पाहिजे.. बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी मनाचा तोल ढळू न देण्याचा अभ्यास केला पाहिजे..
कर्मेद्र – पण माझी खात्री आहे की खरी मन:शांती योगानं, ज्ञानानं किंवा भक्तीनं मिळूच शकत नाही.. जे असा दावा करतात ते आतून कितीतरी अस्वस्थ असतात!
ज्ञानेंद्र – याचं कारण असं की मन:शांती असा काही प्रकारच नसतो! निसर्गदत्त महाराज यांचा याबाबतचा बोध वाचताना या आशयाच्या वाक्यानं मला जोरदार धक्का बसला होता. मग जाणवलं की खरंच, अस्थिर असतानाच तर मन जाणवतं. ते केवळ अस्थिरतेचा, अस्वस्थतेचाच अनुभव देतं. मन म्हणजे पाण्यावरचा तरंग आहे. तरंगाला स्थिरतेचा अनुभव येऊच शकत नाही. स्थिरतेचा, स्वस्थतेचा अनुभव येतो तेव्हा मनाची जाणीवच हरपली असते. मनच मावळलं असतं. थांबा, मुळातच पाहू.. (कपाटातून पुस्तक काढतो. खूण घातलीच आहे!) हा साधक स्वीडनमध्ये जन्मलेला आणि अमेरिकेत स्थायिक आहे.. तो निसर्गदत्त महाराजांना भेटायला आलाय. तो अनेक वर्षे योगाभ्यास करीत आहे.. या योगानं मन:शांती मिळाली, असं तो सांगतो. महाराज विचारतात, खरंच शांती मिळाली का? तुमचा शोध संपला का? तो म्हणतो, ‘‘नाही.. शोध अजून संपलेला नाही!’’ महाराज हसून सांगतात, ‘‘तुमचा शोध कधीच संपणार नाही, कारण मन:शांती अशी गोष्टच नाही!’’
हृदयेंद्र – वा! या मनाला स्थैर्याचं सातत्य हवं असतं, प्रत्यक्षात ते मला अस्थिर अशा अशाश्वतातच सतत गुंतवत असतं!
चैतन्य प्रेम