चिनी अध्यक्षांच्या पाक-भेटीत झालेले करार आणि पाकिस्तानातून जाणारा चीनचा महामार्ग, हे भारतीय हितसंबंधांना बाधा आणणारे आहेतच. रशिया आणि चीन हे दोन देश अमेरिकेच्या गटात नसूनही पाकिस्तान या दोन्ही देशांची मर्जी राखून आहे आणि त्याच वेळी तो अमेरिकेलाही हवाहवासा आहे. पाकिस्तानचे हे वाढते आंतरराष्ट्रीय संबंधही आपल्यासाठी धोक्याची घंटा वाजवणारेच आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय राजकारणात नवनवे ‘मित्र’ जोडण्यात मग्न असताना त्यांच्या शपथविधीचे साक्षीदार, शेजारील पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी एकाच वेळी चीन आणि अमेरिकेकडून मिळवलेली भरघोस मदत भारताची चिंता वाढवणारी आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. जिनिपग यांचे पाकिस्तानात येणे मोठय़ा भावाने घरी येण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी व्यक्त केली. पाकिस्तानात पोहोचण्याच्या मुहूर्तावर जिनिपग यांनी डेली टाइम्स या पाकिस्तानी दैनिकात स्वत:च्या नावाने एक लेख लिहून आपले पाकिस्तानात येणे हे कसे भावाच्या घरी येण्यासारखे आहे असे म्हणत पाक चीन भाईभाईची नांदी गायिली. त्या लेखाचे ‘पाक चीन दोस्ती िझदाबाद’ हे शीर्षकच या दोन देशांत काय सुरू आहे, त्याची साक्ष देण्यास पुरेसे ठरेल. त्यांचा हा दौरा पाकिस्तानला काय आणि किती मिळाले याच्या बरोबरीने या चिनी दानशूरतेचा भारतावर काय परिणाम होणार या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या या पाक दौऱ्याच्या निमित्ताने भारताच्या तुलनेत पाकिस्तानची एक उल्लेखनीय बाब अधोरेखित झाली. तिचीही दखल घ्यायला हवी. ही बाब म्हणजे परस्परविरोधी आंतरराष्ट्रीय ताकदींना आपल्या हितासाठी वापरून घेण्याची पाक क्षमता. इतिहासात ती अनेकदा दिसून आली. परंतु वर्तमानातही ती तितक्याच क्षमतेने टिकून आहे. तेव्हा आधी ती समजून घ्यायला हवी. पाक हा सौदी अरेबियाच्या आíथक मदतीवर मोठय़ा प्रमाणावर अवलंबून आहे. परंतु तरीही नवाझ शरीफ यांनी गेल्या आठवडय़ात सौदीच्या मदतीसाठी येमेनमध्ये पाक फौजा पाठवायला सपशेल नकार दिला. त्याआधी सौदीने पाकला सहज गंमत म्हणून, कोणत्याही परतफेडीच्या अटींशिवाय १०० कोटी डॉलर दिले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तितक्याच रकमेचे साह्य़ पाकिस्तानला मंजूर केले. हे साह्य़ साधेसुधे नाही. तर ते अत्याधुनिक शस्त्रास्त्र नियंत्रण प्रणालीच्या रूपात आहे. महत्त्वाचे म्हणजे शरीफ यांना त्यासाठी अमेरिकेचा अध्यक्ष बराक हा आपला कसा मित्र आहे हे दाखवावे लागले नाही की त्यांना चहा पाजावा लागला नाही. वास्तविक अमेरिका आणि चीन यांचे संबंध तसे तणावपूर्णच आहेत. तरीही पाकिस्तानने मात्र या दोन्ही देशांची मर्जी उत्तमपणे सांभाळलेली आहे. जिनिपग यांच्या ताज्या दौऱ्यात हे दिसून आले. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तान कशी प्रयत्नांची शर्थ करीत आहे, असा निर्वाळा जिनिपग यांनी दिलाच. पण त्याच वेळी आतापर्यंतची विक्रमी गुंतवणूक पाकिस्तानसाठी जाहीर केली. म्हणूनच या दौऱ्याचे फलित भारतीय हितसंबंधांच्या परिप्रेक्ष्यातून पाहायला हवे.
४६०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक ही चीनची आतापर्यंतची सर्वात मोठी परदेशी गुंतवणूक आहे. एवढी रक्कम म्हणून तर ती महत्त्वाची आहेच. परंतु त्याच बरोबरीने या पशातून पाकिस्तानात काय केले जाणार आहे, ते देखील महत्त्वाचे आहे. या पशातून उभा राहणार आहे तब्बल ३ हजार किलोमीटरचा महामार्ग. पश्चिम चीनपासून थेट ग्वादर या बंदराला जोडणारा. चीन-पाकिस्तान आíथक मार्ग असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे आणि चीनला तो केवळ तीन वर्षांत पूर्ण करायचा आहे. या असल्या प्रकल्प उभारणीतील चीनचा लौकिक लक्षात घेता इतके भव्य काम तीन वर्षांत कसे पूर्ण होईल असा भारतीय किंतु मनातदेखील येऊन चालणार नाही. हा रस्ता चीन तीन वर्षांत उभारेलच. तो पूर्ण झाल्यावर पश्चिम आशियातील तेल वा नसíगक वायू वाहून नेण्यासाठी चीनचे तब्बल १२ हजार किमी वाचणार आहेत, हेदेखील आपण लक्षात घ्यावयास हवे. यास अनेक परिमाणे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजाराची फेररचना. आणखी फार फार तर चार-पाच वर्षांत अमेरिका ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होईल. तूर्त तो देश पश्चिम आशियातील तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. अमेरिकेची या तेल वापराबाबत स्पर्धा आहे ती फक्त चीनशी. अमेरिका तेलाच्या उपलब्धतेबाबत स्वयंपूर्ण झाल्यावर त्यास या वाळवंटातील गुंतवणुकीची इतकी गरज लागणार नाही. तेव्हा अमेरिकेच्या अनुपस्थितीने निर्माण होणारी पोकळी भरून काढेल तो चीन. तेव्हा या पाक महामार्गास त्या अर्थाने महत्त्व आहे. त्याच वेळी हा महामार्ग तयार झाल्यावर चीनचा या परिसरातील एकूणच दबदबा वाढेल. अगदी आपल्यासाठी भळभळती जखम असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधेही चीनची सरळ उपस्थिती असेल. तूर्त िहदी महासागरात चीन सक्रिय नाही. पण या नव्या पाक महामार्गामुळे तसे करणे चीनसाठी सहजसाध्य होणार आहे. पाकिस्तानचे ग्वादर बंदर उभे आहे ते मुळात चिनी अर्थसाह्य़ावर. नव्या महामार्गाने ते अधिकच चिनी होईल. या आधीही चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ही आपल्यासाठी मोठीच डोकेदुखी आहे. आता ती अधिकच होईल. पाकिस्तानचा अणुबाँब तयार झाला केवळ चोरटय़ा चिनी साह्य़ामुळे. या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानातील ही थेट चिनी गुंतवणूक आपली झोप उडवणारी ठरेल हे निश्चित. जिनिपग यांच्या या एकाच दौऱ्यात आपल्यासाठी डोकेदुखी असणाऱ्या या दोन देशांत तब्बल ५१ विविध करार झालेत यावरून या उभयतांमधील मधुर संबंधांचा अंदाज बांधता येईल. चीनचे हे पाक औदार्य अमेरिकेच्या दानशूरतेपेक्षा अधिक आहे, ही बाबदेखील महत्त्वाची ठरते. यास आणखी एक कोन आहे. पाकिस्तान आणि रशिया या दोन देशांतील सुधारत चाललेल्या संबंधांचा. रशियाशी चांगले संबंध ही इतके दिवस आपली मक्तेदारी होती. पण आपले आणि अमेरिकेचे संबंध सुधारत असल्यामुळे रशियाने या प्रदेशात पाकिस्तानला चुचकारायला सुरुवात केली. आता हे संबंध भारत आणि रशिया या समीकरणाइतके नाही, तरी पूर्वीपेक्षा बरेच सुधारले आहेत. तेव्हा एकाच वेळी चीन आणि रशिया या दोन देशांशी पाक उत्तम समीकरण राखत आहे. या दोन्ही देशांतील समान धागा म्हणजे त्यांचा अमेरिका विरोध. रशिया आणि चीन हे दोघेही अमेरिकेच्या गटात नाहीत. पण तरी पाकिस्तान या दोन्ही देशांची मर्जी राखून आहे आणि त्याच वेळी तो अमेरिकेलाही हवाहवासा आहे. इतके दिवस चीनला विगुर मुस्लीम बंडखोरांनी सतावले होते. मूळचे तुर्की असलेले हे बंडखोर संपवण्यासाठी त्या देशाला आता पाकिस्तानची मदत अधिकृतपणे घेता येईल. ही सर्व लक्षणे आपल्यासाठी काही निश्चितच चांगली नाहीत. उलट धोक्याची घंटा वाजवणारीच आहेत.
तेव्हा यास तोंड देण्याचा एक सोपा मार्ग दिसतो. तो म्हणजे अधिक अमेरिकाधार्जणिे बनण्याचा. पण त्यातही पुन्हा धोका आहे. एका देशाच्या इतके कच्छपि लागणे आपणास परवडणारे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात चीन दौऱ्यावर जातील तेव्हा त्यास ही सर्व पाश्र्वभूमी असेल. त्या दौऱ्यात जिनिपग हे मोदी यांना आपल्या गावी नेऊन झोपाळ्यावर बसवून त्यांचे आदरातिथ्य करणार आहेत किंवा काय, हे अद्याप कळावयास मार्ग नाही. परंतु आंतरराष्ट्रीय संबंधांचा हा झुला त्यांनी आपल्यापासून दूर नेला आहे हे निश्चित. आंतरराष्ट्रीय व्यवहारांत कोणीच कोणाचा मित्र नसतो. मात्र मित्र भासणाऱ्याच्या शत्रूशी आपली मत्री हवी हेच यातून दिसून येते.