चीनबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? प्रेम तर नक्कीच नाही. ते वाटूच शकत नाही. बासष्टच्या पराभवाने केलेली जखम अजून भरून आलेली नाही. त्या पराभवानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. चीनच्या ‘अरे’ला ‘का रे’ म्हणण्याची धमक भारतात आली. १९८६-८७ मधल्या सोमडुरांग चू प्रकरणाने, झालंच तर परवाच्या दौलत बेग ओल्डी प्रकरणाने ते सिद्ध झालं. पण तरीही आपला चीनबद्दलचा भयगंड काही कमी झालेला नाही. आजच्या तरुण पिढीच्या मनात कदाचित ती भावना नसेल, पण साठच्या दशकात जन्मलेल्या पिढीचं तसं नाही. ‘चिन्या चिन्या खबरदार, टाकशील पाऊल होशील गार’ अशा घोषणा आणि ‘उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू’ अशी समरगीतं ऐकत-म्हणत मोठी झालेली ही पिढी. ती वेदना एवढी अश्वत्थामी आहे, की आजची पिढीही  भावनांच्या पलीकडे जाऊन बासष्टच्या युद्धाचा विचार करू शकत नाही. परिणामी चीनवर विश्वास ठेवू शकत नाही.  पं. नेहरूंचं व्यक्तिमत्त्व एवढं उंच, पण त्यांना या मुद्दय़ावर माफ करू इच्छित नाही.
पण यात गंमत अशी, पाकिस्तानप्रमाणे आपण चीनचा द्वेष करत नाही. उलट चीनने साधलेल्या विकासाबद्दल आपल्या मनात आदरच असतो. माओवादाला आपला कडवा विरोध आहे आणि लोकशाही आपण मानलेली आहे. असं असलं तरी चीनमधल्या साम्यवादी एकपक्षीय हुकूमशाहीवर आपण अनेकदा पुष्पवर्षांव करत असतो. बरं, पुन्हा यातली उपगंमत अशी, की या सगळ्या परस्परविरोधी, विसंगत भावनांना बहुतांशी अधिष्ठान आहे ते गरसमजांचंच. आता हे काही चांगलं लक्षण नाही. पण यात अडचण अशी, की चीनला भिंती बांधण्याची हौस मोठी. तशात तो देश साम्यवादी. अशा देशांत अगदी आर्थर कोस्लर वा बटरड्र रसेल गेले, तरी त्यांना तिथं देवच दिसेल अशी व्यवस्था करून बनवलं जातं, तिथं इतरेजनांची काय कथा? मुद्दा असा, की चीनसारख्या पडदानशीन देशांबद्दल एकंदरच सत्याधिष्ठित माहिती मिळण्याची मारामार. तशात पुन्हा ही वस्तुस्थितीवर आधारलेली माहिती आहे आणि हिचा वास्तवाशी संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग आहे, हे जाणण्याच्या कसोटय़ाही उपलब्ध नाहीत.
असं सगळं असलं, तरी प्रभाकर देवधर यांचं ‘सिनास्थान टुडे’ हे पुस्तक चीनबद्दलचे गरसमज दूर करण्यासाठी चांगलीच मदत करू शकतं. आता पहिला प्रश्न असा येतो, की ‘सिनास्थान टुडे’ ही काय भानगड आहे? आणि एकदा आपल्याला तिचा उलगडा झाला, की, या  पुस्तकाचाही सूर बरोबर सापडतो!
‘भारत-चीन भाई भाई’, ही नेहरूंची घोषणा आजही समाजवाद्यांच्या आणि अतिराष्ट्रवाद्यांच्या टिंगलीचा विषय आहे. त्याचं कारण बासष्टचं युद्ध. पण त्यामुळे चीनबद्दलचं नेहरूंचं आकलन आणि मापन काही खोटं ठरत नाही. नेहरू काय किंवा रवींद्रनाथ ठाकूर काय, ही मंडळी चीनबद्दल काय सांगत होती? तर या देशाचे आणि भारताचे संबंध प्राचीन काळापासूनचे आहेत. म्हणजे इसवीसन पूर्व १४० मध्ये इथं चीनचा राजदूत आला होता. पातंजलींचं ‘अर्थशास्त्र’ नुकतंच रचून झालेलं होतं आणि शून्याचा शोध अजून लागायचा होता, तो हा काळ. त्या कालखंडातच चीन पहिल्यांदा एकराष्ट्र बनलं. भारतीय त्याला ‘सिनास्थान’ म्हणू लागले. या संस्कृत नामाचा उल्लेख करण्यामागे देवधर यांची प्रेरणा चीनबद्दलचा सांस्कृतिक बंधुभावच अधोरेखित करण्याची असल्याचं दिसतं. या पुस्तकात त्यांनी चीनचे पंतप्रधान वेन जियाबावो यांचं विधान उद्धृत केलं आहे. ते म्हणाले होते की, भारत आणि चीन संबंध दोन हजार दोनशे र्वष जुने आहेत. त्यातला ९९.९९ टक्के एवढा वाटा मित्रत्वाचा आहे आणि गरसमजांचा भाग अवघा ०.०१ टक्के एवढा आहे. तर या ९९.९९ टक्के मत्रीच्या भागावर हे पुस्तक उभं आहे. त्याची पहिली साठेक पानं त्यालाच वाहिलेली आहेत. देवधर हे पंतप्रधान राजीव गांधी यांचे वैज्ञानिक सल्लागार होते आणि भारत-चीन आर्थिक व सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष आहेत, ही बाबही लक्षात घेण्यासारखी आहे.
चीनबद्दल शत्रुत्वाची भावना मुळीच नको हे एकदा सांगून झाल्यानंतर हे पुस्तक पुढच्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींकडे वळतं. चिनी लोक, त्यांची जीवनशैली, त्यांची भाषा, शिक्षणपद्धती, तेथील नागरी समाज येथपासून चीनमधील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, उद्योग-व्यवसाय, कामगार अशा नाना अंगांची माहिती यात मिळते. भारतानंतर दोन वर्षांनी स्वतंत्र झालेला हा कृषिप्रधान देश आज आशियातली महासत्ता आहे, जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे. आता हे सगळं काही जादूची कांडी फिरवली आणि झालं, असं नाही. चीनने याची सुरुवात लोकसंख्या नियंत्रण आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांतून केली. १९८६ला चीनने सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला. आणि तो राबवला! आयआयटी आणि आयआयएम ठीकच, पण चीनने प्राथमिक, माध्यमिक आणि व्यावसायिक शिक्षणावर भर देण्याचं धोरण स्वीकारलं. चार वर्षांत चार लाख शाळांमधून १९ कोटी २० लाख मुलांची नोंदणी केली. प्रत्येक २० मुलांमागे एक शिक्षक असेल याची व्यवस्था केली.  चीनच्या औद्योगिक-व्यावसायिक भरारीचा पाया या शैक्षणिक क्रांतीत आहे. देवधरांनी हे नेमकेपणाने सांगितलं आहे.
या औद्योगिक भरारीचा आवाका भोवतालच्या विविध चिनी वस्तू पाहिल्या तरी लक्षात येईल. या वस्तूंचा ‘यूएसपी’ म्हणजे किंमत. अगदी कवडीमोलाने या वस्तू देणं चीनला परवडतं तरी कसं? आपण म्हणतो, मुबलक आणि स्वस्त श्रमशक्ती. पण हा उत्तराचा अर्धाच भाग झाला. बाकीचा भाग या पुस्तकात भेटतो. चीनने जी पुरवठा साखळी संघाची उद्योगरचना विकसित केली आहे, त्यात याचं उत्तर आहे. चीनबरोबर व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांबरोबरच चिनी मालाशी स्पर्धा करू पाहणाऱ्या भारतीय उद्योजकांनी मांडी ठोकून अभ्यासावं असं हे प्रकरण आहे; किंबहुना या पुस्तकाचा एक हेतू तोही आहे.
गतवर्षी भारत-चीन द्विपक्षीय व्यापार ६६.४ अब्ज डॉलर एवढा होता. तो २०१५ मध्ये १०० अब्ज डॉलरवर जाईल अशी अपेक्षा आहे. आज या व्यापारातला भारताचा हिस्सा चीनच्या तुलनेत खूपच कमी आहे. तो वाढायचा असेल, तर भारत-चीन संबंध, जसे प्राचीन काळापासून होते, तसे मधुर असावेत आणि भारतीयांच्या सगळ्या अढय़ा आणि गंड बाजूला ठेवून चीनला समजून घ्यावं, ही या पुस्तकलेखनातील अधोधारा आहे. आणि ते ठीकच आहे. शेजारी राष्ट्राबरोबर गोडगोड अन् लाभाचे संबंध असणं हे केव्हाही चांगलंच.
पण इथं एक बाब ध्यानी घेतली पाहिजे, की आशियातील सत्तास्पध्रेत, कोणी कितीही नाकारलं, तरी भारत आणि चीन हे स्पर्धकच आहेत. चीनचे पाकिस्तानबरोबरचे मत्रीसंबंध, हिंदी महासागरात दबदबा वाढवण्यासाठी चीनचे नौसेनावृद्धीचे सुरू असलेले प्रयत्न, भारतीय भूमीवर करण्यात येत असलेली अतिक्रमणं अशा बाबी विसरता येणार नाहीत. भारतीय मानसाची ही एक सवय आहे. आपला लंबक कधी या टोकावर असतो, तर कधी त्या. आज भाई-भाईच्या घोषणा, तर उद्या द्वेषाचे फटाके असं आंतरराष्ट्रीय संबंधांत असता कामा नये. चीनशी मत्री हवीच, पण ती ठोस परराष्ट्र धोरणानुसार हवी, वास्तवाचं भान ठेवून केलेली हवी. ही जाणीव ठेवून चीनकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहणारं हे पुस्तक खूपच उपयोगी आहे. शत्रू असो वा मित्र, अखेर तो समजून-पारखून घेणं केव्हाही महत्त्वाचं.