News Flash

स्त्रियांचे प्रश्न अन् ‘चांदवडची शिदोरी’

शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याकरिता मी शेतकरी झालो, शेतीतील दु:खे अनुभवली. स्त्रियांचा प्रश्न समजून घेण्याकरिता स्त्री होणे कसे शक्य होणार? मग ग्रामीण भागातील स्त्रियांची शिबिरे भरवून

| February 6, 2013 01:01 am

शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याकरिता मी शेतकरी झालो, शेतीतील दु:खे अनुभवली. स्त्रियांचा प्रश्न समजून घेण्याकरिता स्त्री होणे कसे शक्य होणार? मग ग्रामीण भागातील स्त्रियांची शिबिरे भरवून त्यांच्या मनात शिरून त्यांची दु:खे व समस्या समजून घेण्याचे ठरविले..
शोषणाच्या अनेकविध लढायांत बायकांकडे आपल्या पुरु षांचे पौरु ष जागते ठेवण्याची भूमिका आली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सामाजिक भूमिकेत तडजोड म्हणून योग्य ते बदल करून घेतले..
माझ्या हातून एंगल्सच्या  The origin of family, the private property and the State या पुस्तकाचा प्रतिवाद करणारे एक पुस्तक लिहिले गेले आहे – The women’s Question. त्याबरोबर चांदवडच्या प्रचंड महिला अधिवेशनाच्या तयारीसाठी महिलांना पूर्वतयारी म्हणून ‘चांदवडची शिदोरी’ ही पुस्तिकाही माझ्या हातून लिहिली गेली आहे, पण तरीही मी स्वत:ला महिला विषयातला जाणकार किंवा तज्ज्ञ मानत नाही.
शेतकरी संघटना जशी माझ्या हातून होऊन गेलेला एक चमत्कार आहे त्याचप्रमाणे शेतकरी महिला आघाडी हा माझ्या हातून घडलेला त्याहूनही मोठा चमत्कार आहे. या चमत्काराची सुरु वात १९८२ साली जानेवारी महिन्यात शेतकरी संघटनेच्या सटाणा येथील पहिल्या अधिवेशनात झाली. त्या अधिवेशनात त्या वेळी हयात असलेल्या माझ्या पत्नीने-लीलाने पहिले भाषण केले आणि त्या भाषणात शेतकऱ्यांच्या संघटनेबरोबर शेतकरी महिलांचीही संघटना असायला पाहिजे, अशी बाजू मोठय़ा परिणामकारकरीत्या मांडली होती. सौ. लीला गेल्यानंतर माझ्या मनात एका अपराधी भावनेपोटी, महिलांचे काहीतरी काम घडावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली.
त्यानंतर एक प्रसंग घडून आला. विदर्भात मी गेलो म्हणजे वर्धा येथील रवी काशीकर यांच्या घरी माझा मुक्काम असे. मी मुक्कामाला असलो की सहजच पाच-पंचवीस कार्यकर्ते मुक्कामाला आणि त्यासंबंधीच्या प्रचारयात्रेमध्ये असत. त्या वेळी स्वयंपाकघर सांभाळण्याचे काम सरोज वहिनींवर पडे. सकाळच्या नाश्त्याला रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांना कांदा-मिरचीची फोडणी घालून बनविलेला शिपोतू नावाचा एक पदार्थ सर्वाना खूप आवडे, त्याचे काही वेगळे काम पडत नसे. तरीही एके दिवशी सरोज वहिनींनी तक्रार केली की, बाहेरच्या दिवाणखान्यात तुम्ही पाच-पंचवीस कार्यकर्ते घेऊन बसता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करता, त्यात आमचा सहभाग कोठेच नाही. ही तक्रार लक्षात घेऊन घरमालक रवी काशीकर यांनी एक कल्पना काढली. एक दिवस सुट्टीचा समजून त्या दिवशी चूल बंद. त्या दिवशी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सर्वानी सहकुटुंब वनभोजनासाठी जायचे. त्या दिवशी जी चर्चा होईल ती प्रामुख्याने महिलांना रुची वाटेल अशाच प्रश्नांवर व्हावी. तेही घडून गेले. पुढे सरोज वहिनी या प्रभा राव यांचा पराभव करून विधानसभेत निवडून आल्या. एवढेच नव्हे तर अध्यक्षांच्या तालिकेतही त्यांचे मानाचे स्थान होते. आजपर्यंत अनेक वेळा मी त्यांच्यावर संघटनेच्या महत्त्वाच्या बैठकांच्या समालोचनाचे काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे आणि ती त्यांनी नेहमीच उत्कृष्टरीत्या पार पाडली आहे.
चांदवडच्या अधिवेशनाच्या खूप आधी घडलेली आणखी एक घटना. सुरुवातीला अगदी तरु ण कार्यकर्ते संघटनेत आले, यथावकाश त्यांची लग्ने होऊ लागली. अशाच एका कार्यकर्त्यांच्या पत्नीने मला एक पत्रवजा विनंती केली, ‘माझे पती स्वच्छ चारित्र्याचे आहेत, ते संघटनेचे काम करतात. हे काम चांगले आहे. याचा मलाही अभिमान आहे. पण या कामात माझे नेमके स्थान कोणते हे मला अजून समजलेले नाही. दिवसांमागून दिवस हे घराबाहेर राहतात आणि घरी आल्यावर आपल्यासंबंधीच्या अनेक आठवणी सांगतात. आणि माझी स्थिती समोरून पंचपक्वान्नांचे ताट जाऊन स्वत: उपाशी राहणाऱ्या प्राण्यासारखी होते.’ या विनंतीचा शेवट तिने मोठय़ा धमकीने केला होता. ‘तुम्ही जर का या प्रश्नाला योग्य उत्तर शोधले नाही तर मी या जगात फार दिवस राहू शकणार नाही इतका माझ्या जिवाचा कोंडमारा होत आहे.’
शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याकरिता मी शेतकरी झालो, शेतीतील दु:खे अनुभवली. स्त्रियांचा प्रश्न समजून घेण्याकरिता स्त्री होणे कसे शक्य होणार? मग ग्रामीण भागातील स्त्रियांची शिबिरे भरवून त्यांच्या मनात शिरून त्यांची दु:खे व समस्या समजून घेण्याचे ठरविले. मराठवाडय़ातील हळीहंडरगुळी येथील पहिल्याच बैठकीत अनेक प्रयत्न करूनही स्त्रियांना बोलते करण्याची कल्पना काही प्रत्यक्षात येईना. याच बैठकीत एक मधली सुट्टी घेऊन मी महिलांना भजन किंवा अभंग म्हणण्याची सूचना केली. त्यांनी ती चढाओढीने अमलात आणली. त्यानंतर महिला अहमहमिकेने चर्चेमध्ये भाग घेऊ लागल्या. ही परंपरा पुढे अनेक वर्षे टिकली. त्या वेळी माझ्यासोबत ‘योद्धा शेतकरी’चे लेखक विजय परुळकर आणि त्यांच्या पत्नी सरोजा याही होत्या. विजय परुळकरांनी, सुरुवातीला बुजून गप्प बसलेल्या महिलांचा चर्चेत भाग घेण्याचा उत्साह पाहून मला एक चिठ्ठी लिहिली. मी स्वत:ला ूे४ल्ल्रूं३्रल्ली७स्र्ी१३ समजतो, पण माझेही तुम्हाला वंदन आहे. ही चिठ्ठी अगदी अलीकडे अलीकडेपर्यंत मी जपून ठेवली होती; आता ती कोठेतरी गहाळ झाली. त्यानंतर आणखी चार ठिकाणी शिबिरे झाली. स्त्रियांच्या प्रश्नांची मनात थोडी थोडी जुळणी होऊ लागली. स्त्री-प्रश्नावरील पुस्तकांचा आणि चळवळीचा अभ्यासही चालू होता.
योगायोगाने त्याच वेळी प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे माझ्याकडे आंबेठाणच्या शेतावर भेटण्यास आले. त्यांनी संगमनेरच्या त्यांच्या महाविद्यालयात मी भाषण देण्याकरिता यावे अशी विनंती केली. त्याबरोबरच त्यांनी, शेतकरी संघटनेने मांडलेल्या भांडवलनिर्मितीच्या सिद्धांताशी सुसंगत स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी मी करावी अशीही इच्छा व्यक्त केली. रावसाहेब कसबे हे स्वत: अनेक सामाजिक प्रश्नांवरचे जाणते समीक्षक आहेत. त्यांनी दिलेले हे निमंत्रण मी आव्हान म्हणूनच स्वीकारले. कारण, शेतकरी संघटनेने मांडलेल्या भांडवलनिर्मितीच्या सिद्धांताबद्दल मला इतका आत्मविश्वास होता की, त्याच्याशी सुसंगत अशी स्त्री-प्रश्नांची मांडणी करता येईल याची मला आतून खात्री वाटत होती. शिवाय, चार-पाच शिबिरांत स्त्रियांनी आपल्या मनातील खळबळ ऐकवून बांधून दिलेली शिदोरीही हाती होती.
१९८६च्या फेब्रुवारी महिन्यात एक केवळ शेतकरी महिलांचे अधिवेशन भरवावयाचे ठरले होते. माझ्या दुर्दैवाने त्याच सुमारास म्हणजे १९८५च्या डिसेंबरमध्ये मला हृदयविकाराचा पहिला झटका आल्यामुळे अधिवेशन पुढे ढकलावे लागले. ती इष्टापत्तीही ठरली. त्यामुळे सगळा मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र पुन्हा सावचितपणे फिरून अधिक अभ्यास व अधिवेशनाचा प्रचार करण्याचे काम जमले.
या सर्व अभ्यासातून आणि आजारानंतरच्या विश्रांतीच्या काळातील चिंतनातून ‘चांदवडची शिदोरी’ या पुस्तिकेची निर्मिती झाली. ‘चांदवडची शिदोरी’त दोन मुद्दे प्रामुख्याने मांडले होते. पहिला मुद्दा म्हणजे समाजवादी पद्धतीने मुलांसाठी पाळणाघर आणि सर्वासाठी सामायिक रसोडे घालून स्त्रियांचा प्रश्न सुटणार नाही. स्त्रियांचा प्रश्न हा शेतीतील वरकड उत्पन्नाच्या लुटीतून सुरू झालेल्या रक्तबंबाळ युगातील एक अवशेष आहे. दुसरा मुद्दा असा की, अमेरिकन स्त्रीवाद्यांचे म्हणणे असे आहे की, ‘पुरुष हा अधिक बलवान असल्यामुळे तो स्त्रियांवर सत्ता गाजवतो.’ तसे म्हटले तर, स्त्रियांवर अत्याचार किंवा बलात्कार करू शकणाऱ्या पुरु षांची संख्या अत्यल्पच असते, पण अशा शक्यतेच्या भीतीने पुरु ष स्त्रियांना घरात कोंडून ठेवत असावेत. पुढे माझा प्रतिवाद होता की, पुरु ष हे अधिक बलवान नसून अधिक कमजोर आहेत. कारण, त्यांच्या जैविक स्वातंत्र्याच्या कक्षा फारच मर्यादित आहेत. याउलट, स्त्रियांना भावी आयुष्यात त्यांनी बजावयाच्या अनेकविध भूमिकांकरिता निसर्गानेच त्यांना जैविक स्वातंत्र्याच्या कक्षा अधिक व्यापक दिलेल्या आहेत. बलात्काराचा पुरु षांचा व्यवहारातील अनुभव तसा विरळाच. याउलट, शोषणाच्या अनेकविध लढायांत बायकांकडे आपल्या पुरु षांचे पौरु ष जागते ठेवण्याची भूमिका आली आणि त्यामुळे त्यांनी आपल्या सामाजिक भूमिकेत तडजोड म्हणून योग्य ते बदल करून घेतले.
* लेखक हे अर्थतज्ज्ञ आणि ‘योद्धा शेतकरी’ म्हणून गौरवले गेलेले शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2013 1:01 am

Web Title: cinder under ash womens question and chandwadchi shidori
टॅग : Society
Next Stories
1 शेतकऱ्याला वाली नाहीच..
2 उलटी पट्टी ते रंगराजन अहवाल
Just Now!
X