18 November 2017

News Flash

क्लिंटन ते केरी

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या देदीप्यमान कामगिरीनंतर हे पद भूषविणे हे जॉन केरी यांच्या

Updated: February 5, 2013 12:39 PM

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या देदीप्यमान कामगिरीनंतर हे पद भूषविणे हे जॉन केरी यांच्या समोरचे मोठे आव्हान असणार आहे.  हिलरी स्पष्टवक्त्या होत्या, ठाम होत्या आणि अत्यंत कार्यक्षम होत्या. केरी यांच्या कार्याचा मापदंड आता क्लिंटन यांच्याबरोबर मोजला जाणार आहे.
महासत्तेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट महिला असण्याने काही फरक पडतो का?  पडत असावा. अमेरिकेचे हे महत्त्वाचे मंत्रिपद भूषविणारी पहिली महिला म्हणजे मेंडेलिन ऑलब्राइट. बिल क्लिंटन यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीत ऑलब्राइट या परराष्ट्रमंत्री होत्या अणि केवळ त्यांच्या विरोधामुळे अमेरिकी सरकारला तालिबानशी संबंध तोडावे लागले. क्लिंटन यांच्या आधी सत्तेवर असलेल्या अमेरिकी राजकारण्यांनी एन्रॉन आणि स्टँडर्ड ऑइल या कंपन्यांच्या दबावाखाली तालिबान्यांबाबत मवाळ धोरण अवलंबिले होते. तालिबान्यांच्या काळात महिलांना जी अमानुष वागणूक मिळत होती त्याचा तपशील बाहेर आल्यावर परराष्ट्रमंत्रिपदी असलेल्या ऑलब्राइट यांनी तालिबानशी कोणत्याही प्रकारे समझोता करण्यास नकार दिला आणि त्यामुळे त्याची परिणती अमेरिका आणि इस्लामी जगातील तणावात होण्यास सुरुवात झाली. ऑलब्राइट यांच्यानंतर रिपब्लिकन पक्षाच्या काळात काँडोलिसा राइस यांनीही हे पद भूषविले. काँडी राइस या एक्झॉन या बलाढय़ तेल कंपनीत सेवेस होत्या. त्यांच्या काळात या आणि अशा तेल  कंपन्यांचे भले झाले आणि त्यांच्याच काळात याच कंपनीतील अधिकारी हमीद करझाई यांची अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदी निवड झाली, हा काही अर्थातच योगायोग नाही. इराक युद्ध आणि एकूणच वाढलेली युद्धखोरी ही त्यांच्याच काळातील. याच्या बरोबर उलटे काम हिलरी क्लिंटन यांच्या काळात झाले. अतोनात वाढलेला आणि अमेरिकेला आर्थिक खाईत घालणारा युद्धज्वर आटोक्यात आणण्यात हिलरी क्लिंटन यांचा वाटा मोठा होता. अफगाणिस्तान आणि इराक या दोन युद्धांनी अमेरिकी अर्थव्यवस्थेचे रक्त प्यायले. या दोन्ही युद्धांच्या शेवटाची सुरुवात क्लिंटन यांच्या कारकिर्दीत झाली. गेल्या आठवडय़ाच्या अखेरीस o्रीमती क्लिंटन या पदावरून दूर झाल्या आणि जागतिक राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या पदाची सूत्रे जॉन केरी यांच्याकडे गेली. अध्यक्षाची पत्नी, सिनेटर ते अध्यक्षपदाची उमेदवार ते अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री अशी देदीप्यमान वाटचाल क्लिंटन यांची झाली. बिल क्लिंटन यांची अध्यक्षपदी फेरनिवड होण्यात जे घटक महत्त्वाचे ठरले त्यातील एक घटक हा त्यांची पत्नी हिलरी हा होता, हे अमान्य करून चालणार नाही. बिल क्लिंटन यांच्याकडे ज्या गुणांचा अभाव त्यांचा समुच्चय हिलरी यांच्या ठायी आढळतो. त्याचमुळे त्या आपल्या पतीच्या छायेतून सहजपणे बाहेर आल्या आणि स्वत:ची ओळख निश्चित करीत अध्यक्षीय पदाच्या उमेदवारीपर्यंत पोहोचल्या. पुढे बराक ओबामा यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आणि नंतर त्यांच्याच मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्रिपदी काम करण्याची संधी त्यांना मिळाली. ओबामा यांची एक अत्यंत समर्थ साथीदार अशी त्यांची ओळख होती. या काळात जवळपास ११२ देशांना त्यांनी भेटी दिल्या. हे अंतर ९ लाख ५६ हजार ७३३ मैल इतके भरते. पुढील टप्प्यात आता त्या माजी परराष्ट्रमंत्री ते अध्यक्ष हे अंतरही पार करतील अशी खात्री व्यक्त केली जात असून २०१६ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत त्या डेमॉक्रॅट्स पक्षाच्या उमेदवार असतील असे आतापासूनच मानले जात आहे. त्यांच्या जागी आलेले जॉन केरी हेही अध्यक्षीय पदाचे उमेदवार होते. जॉर्ज बुश यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. हिलरी क्लिंटन यांच्या देदीप्यमान कामगिरीनंतर हे पद भूषविणे हे केरी यांच्या समोरचे मोठे आव्हान असणार आहे, यात शंका नाही. हिलरी स्पष्टवक्त्या होत्या, ठाम होत्या आणि अत्यंत कार्यक्षम होत्या. केरी यांच्या कार्याचा मापदंड आता क्लिंटन यांच्याबरोबर मोजला जाणार आहे.
जॉन केरी यांना व्हिएतनाम युद्धाचा अनुभव आहे. त्या युद्धातील कामगिरीबद्दल विशेष पदकांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. परंतु पुढच्या काळात केरी हे अमेरिकेच्या युद्धधोरणाचे कडवे विरोधक बनले. धनाढय़ अशा फोर्ब्स घराण्याशी आईकडून थेट संबंध असलेले केरी हे अमेरिकी जीवनात उमरावी जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करतात. युरोपात शिक्षण घेतलेल्या केरी यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हिलरी यांच्या तुलनेत कसा आहे, याबाबत आताच अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. एकेकाळी व्हिएतनाम युद्धास विरोध करणाऱ्या केरी यांना ९/११ घडल्यानंतर सद्दाम हुसेन याच्याविरोधात अमेरिकेने युद्ध छेडावे असेच वाटत होते. तत्कालीन अध्यक्ष बुश यांनी सद्दाम हुसेन याच्याकडे रासायनिक आणि जैविक शस्त्रे असल्याचे सांगितल्यानंतर सद्दामला नि:शस्त्र करायलाच हवे असे त्यांचे मत होते. परंतु पुढे ही जैविक, रासायनिक अस्त्रे काही सापडली नाहीत आणि अध्यक्ष बुश खोटे बोलल्याचे निष्पन्न झाले तेव्हा केरी यांनी बुश यांच्यावर सडकून टीका केली होती. केरी यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाची कामगिरी म्हणजे बँक ऑफ क्रेडिट अँड कॉमर्स इंटरनॅशनल, म्हणजेच बीसीसीआय, या बडय़ा पाकिस्तानी बँकेची चौकशी. निकाराग्वा येथील बंडखोरांना माजी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या काळात मोठा आर्थिक पाठिंबा अमेरिकेने दिला होता. इराक-इराण युद्धात शस्त्रविक्री करून आलेले गुप्तधन स्विस बँकेत ठेवण्यात आले होते आणि त्यातून निकाराग्वा येथील बंडखोरांना रसद पुरवली जात होती. या सगळय़ाच व्यवहारात बीसीसीआय या बँकेचाही हात आहे आणि या बँकेमार्फत अंमली पदार्थाचे व्यवहारही होत आहेत हे केरी यांनी निदर्शनास आणून दिले. पुढे या बँकेचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली तेव्हा या बँके चे लागेबांधे थेट ओसामा बिन लादेन याच्यापर्यंत पोहोचले असल्याचे आढळले. त्या वेळी अमेरिकी सरकारने केलेल्या कारवाईत ही बँक गुंडाळावी लागली. परंतु त्यामुळे त्या बँकेच्या अनैतिक कृत्यांना पाकिस्तान कसा छुपा पाठिंबा देत आहे, ते उघड झाले. आता क्लिंटन यांच्यानंतर पदाची सूत्रे हाती घेत असताना पाकिस्तान, भारत आणि प. आशियाचे तेलांगण यात केरी समतोल कसा साधणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  हिलरी क्लिंटन यांच्या काळात त्यांनी प. आशिया आणि चीन या दोन देशांबाबत निश्चित भूमिका घेतली होती. ती अर्थातच अध्यक्ष ओबामा यांच्या एकूण धोरणाचा भाग असली तरी मंत्री म्हणून क्लिंटन यांची भूमिकाही महत्त्वाचीच होती. जागतिक शांततेस आव्हान ठरणाऱ्या पॅलेस्टिन प्रश्नावरून श्रीमती क्लिंटन यांनी इस्रायलला चार खडे बोल सुनावण्यास मागेपुढे पाहिले नाही. आता त्याच प्रश्नावर केरी हे काय भूमिका घेतात याकडे साऱ्या जगाचेच लक्ष असेल. आतापर्यंत अध्यक्ष ओबामा यांनीदेखील वारंवार इस्रायलला शाब्दिक फटकारे लगावण्यास मागेपुढे पाहिलेले नाही. या पाश्र्वभूमीवर केरी यांनी व्यक्त केलेली मते महत्त्वाची ठरतात. ‘९/११ घडल्यानंतर अमेरिकेच्या शिरावर जगासाठी पोलीसगिरी करण्याची जबाबदारी टाकण्यात आली,’ ती कमी करणे हे त्यांचे प्राथमिक लक्ष्य असणार आहे.
 हे महत्त्वाचे आहे. पदग्रहणानंतरचा रिवाज म्हणून केरी हे इस्रायली मंत्र्यांशी बोलले असतील. परंतु हिलरी यांच्या पाठोपाठ उघड इस्रायलीविरोधी भूमिका घेणारा मंत्री देऊन अध्यक्ष ओबामा यांनी जगाला..आणि त्यातही इस्रायल आणि प. आशियाला.. अप्रत्यक्षपणे एक संदेश दिला आहे. त्यातून क्लिंटन ते केरी हा बदल किती सहजपणे होतो हे तर दिसेलच पण जागतिक राजकारणात अमेरिकेची भूमिका पुढील कालखंडात कशी असेल त्याचेही संकेत मिळतात.

First Published on February 5, 2013 12:39 pm

Web Title: clinton to kerry