भारतीय समाज घडवण्यात ज्या अँग्लो-इंडियन व्यक्तींचा सहभाग होता त्यांच्याविषयी व त्यांच्या कर्तृत्वाविषयी      डॉ. अरुण टिकेकर यांनी ‘कोलॅबरेटर्स ऑर कनफॉर्मिस्टस?’ या नव्या पुस्तकात लिहिले आहे. निमित्ता-निमित्ताने, ठिकठिकाणी केलेल्या भाषणांचे हे संकलन आहे. यात मुंबईतील वेगवेगळ्या इंग्रजी वृत्तपत्रांचे संपादक आहेत, कॉलेजचे प्राध्यापक आहेत, नोकरशाहीचा भाग असणारे परंतु आपली नोकरी निष्ठेने पार पाडताना भारतातल्या जीवनाविषयी अमूल्य माहिती संग्रहित करणाऱ्या व्यक्ती आहेत. या सर्वानी मिळून एशियाटिक सोसायटी स्थापन केली व भारताविषयी माहिती संग्रहित करून या माहितीचे जतन होईल यासाठी प्रयत्न केले. त्यामागे त्यांचा हेतू काहीही असेल, परंतु एकदा ज्ञान संपादन करण्याची गोडी लागली की हेतू दुय्यम ठरतात. त्याच वेळी ते शासक आहेत व म्हणून श्रेष्ठ आहेत ही भावनाही ते कधीच विसरू शकले नाहीत. तरीही ज्ञानात भर टाकण्याचे काम ते त्याच निष्ठेने करीत होते. उदा. बॉम्बे टाइम्सचे संपादक डॉ. जॉर्ज बुइस्ट यांनी वृत्तपत्र उत्तम चालवले व त्याबद्दल सर्व खूश होते. त्यांना मुंबईविषयी प्रेम व जिव्हाळाही होता. त्यांचे घर म्हणजे सुधारकांचा अड्डा असायचा. परंतु १८५७च्या स्वातंत्र्य युद्धानंतर त्यांनी अतिशय त्वेषाने व कटुतेने भारतीय समाजावर टीका केली व सरकारच्या दमनशाहीचे समर्थन केले. त्या वेळी वृत्तपत्र चालवणाऱ्यांत काही भारतीय होते. त्यांना हे आवडले नाही व त्यांना राजीनामा द्यावा लागला. म्हणूनच टिकेकरांनी या पुस्तकाचे शीर्षक ‘साथीदार की व्यावसायिक’ असे दिले असावे.
यातील सर्व व्याख्यानांचा समान धागा म्हणजे भारतात वेगवेगळ्या वेळी आलेले समानधर्मी ब्रिटिश! यांना लेखक अँग्लो-इंडियन म्हणतात, कारण १९१६ पर्यंत भारतात मोठय़ा काळासाठी राहणारे ब्रिटिश स्वत:ला असेच म्हणवून घ्यायचे. त्यानंतर मिश्र वैवाहिक संततीला अँग्लो-इंडियन म्हटले जाऊ लागले.
पहिलेच व्याख्यान मुंबईतून निघणाऱ्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांची सुरुवात, त्यांचे स्वरूप व त्यांना लाभलेल्या संपादकांचा आढावा याविषयी आहे. सुरुवातीचा बॉम्बे गॅझेट नंतर बॉम्बे टाइम्स, आणि त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया झाला. इंग्रज लोकांसाठीचे माहितीपर पत्रक हे त्याचे स्वरूप बदलत जाऊन सर्व इंग्रजी वाचणाऱ्या समाजासाठीचे वर्तमानपत्र असे झाले. तरीही बऱ्याचशा वर्तमानपत्रांची स्वातंत्र्यापर्यंत भूमिका ब्रिटिशधार्जिणी होती. या वाटचालीत कधी त्याचे मालकच संपादक होते तर कधी विश्वस्त संपादकांची नेमणूक करायचे. स्वातंत्र्यापर्यंत संपादक ब्रिटिश होते, अपवाद हार्निमन यांचा! ते आयरिश होते व स्वातंत्र्य चळवळीच्या बाजूने होते. प्रत्येक संपादकाच्या आवडीप्रमाणे वर्तमानपत्रातील मजकूरही बदलायचा. संपादक जरी ब्रिटिश असले तरी त्यांची स्वत:ची स्वतंत्र मते असायची. त्यांना चुकीच्या वाटलेल्या इंग्लिश पॉलिसीजची ते परखड चिकित्सा करायचे. त्याच वेळी, टिकेकर म्हणतात त्याप्रमाणे, वांशिक श्रेष्ठत्वाच्या भावनेपासून ते मुक्त नव्हते आणि तरीही त्यांचे योगदान दुर्लक्ष करण्याजोगे नव्हते. असे अनेक संपादक, काही वेगळ्याच पाश्र्वभूमीतून आलेले तर काही पत्रकारितेचे पद्धतशीर प्रशिक्षण घेऊन आलेले! त्यांच्या असंख्य छोटय़ामोठय़ा किश्शांमुळे हा लेख वाचायला मजा येते.
अँग्लो-इंडियन कथा-कादंबऱ्यांत दिसणारी मुंबई हा दुसरा लेख! यात टिकेकर १९३४ साली मुल्कराज आनंद यांनी लंडन येथे केलेल्या व्याख्यानाचा संदर्भ देऊन म्हणतात की, अँग्लो-इंडियन लेखकांचा लेखन विषय हा इंडियातील त्यांचे छोटेसे इंग्लंड हाच असतो. महाराष्ट्र ही पाश्र्वभूमी घेऊन लेखन करणारे लेखक कमीच. आपल्याला माहीत असलेल्या किपलिंगविषयी एक मजेदार गोष्ट नमूद केली आहे. त्यांना त्यांचे समकालीन, ‘मोठय़ांवर टीका करणारे उद्धट पत्रकबाज’ असे म्हणायचे व त्यांच्या लेखी त्यांचे लिखाण ‘ठीक’होते. ई. एम. फॉर्स्टर हे दुसरे लेखक- ज्यांनी भारताच्या पाश्र्वभूमीवर स्वत:च्या कादंबऱ्या बेतल्या. याचबरोबर अनेक महत्त्वाच्या वा सामान्य लेखक व लेखनाची  चिकित्सा केली आहे. परंतु फारशी माहीत नसलेली कादंबरी ‘पांडुरंग हरी’ याविषयी टिकेकर म्हणतात की, यात मराठय़ांच्या आयुष्याचे बरेच अचूक चित्रण आले आहे. काही लेखकांनी महाराष्ट्रावर लेखन केले असले तरी एकंदरीत ते फारच थोडे होते असे त्यांना वाटते.
भारताच्या परदेशी मित्रांची यादी साहजिकच बरीच लांब आहे. यात प्रिन्सिपल बेन्स यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग अतिशय हृद्य आहे. अहिताग्नी राजवाडे यांनी आपल्या आत्मचित्रात त्यांचे अनेक किस्से सांगितले आहेत. हा लेख वाचताना वाटले की गेल ऑम्वेट हे महत्त्वाचे नाव यायला हवे होते. तिचे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींवरील काम उल्लेखनीय आहे. तसेच रशियन मित्र अजिबातच आलेले नाहीत. भाषेची अडचण असूनही अफनासी निकितीनपासून अनेक रशियन भारतावर लिखाण करीत आले आहेत व त्यांनी भारताचे चित्रण चांगले केल्यामुळेच भारतीयांना तिथे नेहमीच प्रेमाची वागणूक मिळत आलेली आहे. असो. या पुस्तकातील एशियाटिक सोसायटीची कहाणी सर्वात मनोरंजक वाटली. जगात फक्त पाच प्रती असलेल्या दान्तेच्या ‘डिव्हाइन कॉमेडी’ची एक प्रत मुंबईच्या एशियाटिकच्या लायब्ररीत आहे व ती एल्फिन्स्टनची वैयक्तिक प्रत होती. हे वाचून हा पुस्तकसंग्रह करणाऱ्या अँग्लो-इंडियन सभासदांविषयी आदर वाटल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण पुस्तकात अनेक किस्से व कहाण्या ब्रिटिशकालीन इतिहास जिवंत करतात. इतिहास समजून घेण्यासाठी या आवश्यक बाबी आहेतही.रूक्ष सनावळ्या व आकडेवारीत माणूस कळत नाही. तो समजून घेण्यासाठी याच गोष्टींचा उपयोग होतो. त्यासाठी या पुस्तकाच्या जवळ जाणे गरजेचे आहे.
कोलॅबरेटर्स ऑर कनफॉर्मिस्टस? – द ब्रिटिश-इंडियन एडिटर्स ऑफ बॉम्बे अ‍ॅण्ड अदर अ‍ॅड्रेसेस – अरुण टिकेकर,
इनकिंग पब्लिशर्स,
पाने : १५८, किंमत : २०० रुपये.