आज सत्तेचे संदर्भ बदलेले. राजकीय पुढाऱ्यांची ओळख असलेली टोपीच एक तर कालबाह्य़ झाली आहे; पण केवळ टोपीने दडवले जाईल एवढे तोकडे साम्राज्यही आजकालचे पुढारी उभे करीत नाहीत आणि ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ या स्वरूपाचे प्रश्न उघड विचारलेच जाणार नाहीत याचाही बंदोबस्त केला जातो.
संपूर्ण हयात राजकारणात घालविलेल्या आणि आता उतारवयात राजकारणाकडे कमालीच्या अलिप्ततेने पाहणाऱ्या एका जुन्या राजकारण्याशी चर्चा करताना हार-जितीचा विषय निघाला. अमका माणूस निवडून कसा आला, त्याने निवडून यावे असे तर काहीच केले नाही आणि तमुक माणूस पराभूत का झाला, अशी चांगली माणसे निवडणुकीत कशी काय पडतात? असे त्यांना विचारले होते. निवडणुकीतली प्रत्यक्षातली गणिते आणि वेगवेगळ्या वाहिन्यांवर झडणाऱ्या चर्चा, पुस्तकातले विश्लेषण याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. आकडेवारी आणि विश्लेषणाचा पसारा हा प्रत्यक्ष वास्तवाच्या खडकावर अनेकदा आदळतो आणि त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतात असेही अनुभवायला येते. हार-जितीबद्दल बोलताना अनेक उन्हाळे-पावसाळे पचवलेले ते गृहस्थ म्हणाले, ‘‘तसा निवडणुकीच्या निकालाचा आणि तुमच्या कामांचा काहीच संबंध नसतो. मनात आले की माणसे पाडतात अन् मनात आले की निवडून देतात. निवडून यायला लायकी लागत नाही अन् पडायला कारण लागत नाही.’’
इतके साधे आणि सरळ सूत्र. ‘निवडून यायला लायकी लागत नाही अन् पडायला कारण लागत नाही.’ ..अर्थात असे असले तरीही सत्ता या गोष्टीचे अजब गारूड असते. म्हणूनच ती मिळविण्याची लालसा आणि त्यासाठी वाट्टेल ते मार्ग चोखाळण्याची तयारी ठेवतात सत्ताकांक्षी मंडळी. त्यातही ज्यांनी सत्तेची चव चाखली आहे अशा कोणत्याही माणसाला सत्ता सोडवत नाही. सत्तेचे वलय हाच अशा माणसांसाठी प्राणवायू असतो आणि हे वलय नाहीसे झाले की माणसे पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी तळमळतात. सत्तेचे एक वेगळे पर्यावरण असते. सत्तेच्या मखराचे अप्रूप असते सामान्य माणसाला. सत्तेचा अंगभूत डौल असतो आणि सत्ता आपल्याभोवतीच्या पर्यावरणाला मंतरल्यासारखी भारावून टाकते. कधी कधी अपवादाने राजकारणात आलेली माणसेही पुढे कोणाच्या तरी हातची प्यादी बनत जातात. गावपातळीवर असे अनेकदा दिसते. कालपर्यंत राजकारणाशी संबंध नसणारी माणसेही आज प्रत्यक्ष त्यात उडी घेतल्यानंतर भोवऱ्यासारखी गरागरा फिरायला लागतात. सुरुवातीला कोणाच्या तरी खेळीचा भाग होणारे मग हळूहळू आपल्या मनाप्रमाणे खेळायला लागतात. तहानभूक हरपून रममाण होतात याचे कारण सत्तेची तहानही वेगळी आणि भूकही वेगळी.
सत्तेच्या परिघात राहायला आवडते लोकांना. प्रत्यक्ष सत्तेत भागीदार नसणाऱ्यांनाही लळा लागतो कधी कधी सत्तेचा. सत्तावानांच्या सहवासात राहण्याची वेगळीच ऊब अनुभवतात माणसे. सत्तेविरुद्ध आग ओकणारे, सत्तेखाली सुरुंग पेरणारेही असतात समाजात; पण ही संख्या खूपच कमी. सत्ता झुलवते लोकांना. जो स्वार असतो सत्तेवर त्याला तर कैफ असतोच; पण त्याच्या अवतीभवतीची माणसेही एकमेकांशी घट्ट बांधलेली असतात. आपण म्हणू तीच पूर्व (आणि पश्चिमही) असे सत्तेतल्या कोणत्याही माणसाला वाटत असते. त्याला नकार ऐकून घ्यावासा वाटत नाही. एक तर पडलेला शब्द झेलून घ्यायला माणसे तत्पर आणि उत्सुक असतात. अशा एखाद्या वेळी शब्द खाली पडला तर ही सत्तेतली माणसे कासावीस होतात. सत्तेभोवती सरावैरा गोळा होतात. सत्ता एखाद्या चुंबकासारखी खेचून घेते लोकांना. खेडय़ात पोथी-पुराण संपल्यानंतर प्रसाद वाटला जातो. मंदिरात शिस्तीत ऐकायला बसणारी माणसे पोथी संपल्यानंतर उठतात; पण जिथे एखाद्या कोपऱ्यात गर्दी जमा झालेली दिसते, तिथे समजायचे की, प्रसादाचे टोपले घेऊन कुणी तरी उभा आहे. सत्तेचेही असेच असते. माणसे सगळ्या प्रकारच्या सत्तास्थानांभोवती गोळा होतात. अशा वेळी सत्तेच्या ताटाभोवती शितं खाऊन जगणे ही एक कृती राहात नाही, तर ती प्रकृती बनते.
सत्तेच्या खेळातली माणसे सजग असतात, आपल्या सत्तास्थानांबद्दल. कुठे खडा जरी पडला तरी कान टवकारलेले असतात. सत्ता टिकविणे ही बाब एखाद्या निग्रहासारखी शिस्तीत केली जात नाही. असंख्य तडजोडी करीतच सत्ता टिकवली जाते. एखाद्या अजस्र तरीही अदृश्य शक्तीसारखी सत्ता आपले सर्वशक्तिमान रूप प्रकट करीत असते. सत्ताच या खेळातल्या पात्रांचे, व्यक्तिरेखांचे व्यक्तिमत्त्व घडविते. सत्तेपुढे सगळ्या रेषा गळून पडतात आणि ढोबळमानाने केली जाणारी विभागणी खोटी ठरते. सत्ता धारण करणारे कुठल्याही समूहातून आले तरी शेवटी हे सगळे आपसातल्या हितसंबंधांनी एकमेकांशी जोडले जातात. एकदा स्थान बदलले की, मग हळूहळू सगळेच बदलायला लागते. सगळ्यांची प्रकृती सारखीच. सत्तेची ऊब मिळालेल्या आणि सत्तेपासून वंचित असलेले असे दोनच वर्ग मग उरतात. सत्तेचा जबडा इतका लवचीक, की काहीही गिळंकृत करताना त्रास होत नाही. अगदी आपले स्वत:चे चांगुलपणही. सत्तेची आकांक्षा इतकी प्रबळ असते की, बाकी सर्वच गोष्टी त्यापुढे व्यर्थ. सगळा खटाटोप असतो तो सत्ता टिकवून ठेवण्यासाठीच. कायमचीच तहान असते ही. आधी मिळवायची तहान, नंतर टिकवायची तहान आणि पुन्हा जे काही टिकले आहे ते कोणाच्या हाती सोपवायचे हा मावळतीच्या काळात येणारा विचार. सत्तेचा हा पाझर निरंतर वाहतच राहतो.
सत्तेचा दरारा, धाक जेवढा दिसतो, त्यापेक्षा किती तरी पटीने अधिक असतो. सर्वसामान्यांना जे दिसते ते फक्त हिमनगाचे वरचे टोक. शिवाय हा दरारा जराही दृश्य स्वरूपात दिसणार नाही याची खबरदारी घेतली जाते. त्यामुळे ‘या टोपीखाली दडलंय काय?’ किंवा ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ हे प्रश्न कायम निरुत्तरित राहतात. चाळीस वर्षांपूर्वी ‘सामना’ चित्रपट आला. आज सत्तेचे संदर्भ बदलेले. राजकीय पुढाऱ्यांची ओळख असलेली टोपीच एक तर कालबाह्य़ झाली आहे; पण केवळ टोपीने दडवले जाईल एवढे तोकडे साम्राज्यही आजकालचे पुढारी उभे करीत नाहीत आणि ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ या स्वरूपाचे प्रश्न उघड विचारलेच जाणार नाहीत याचाही बंदोबस्त केला जातो. परिणामी सत्तेच्या खेळात ‘सामना’ कायम अनिर्णीतच राहतो, आजही!