हारूकी मुराकामी यांची ही नवी कादंबरी अतिवास्तववादी पद्धतीची आहेच, पण तिचे रंगांशी असलेले नाते अधिक गहिरे आहे.. नायक रंगहीन असला तरी!

हारूकी मुराकामी हे अलीकडचे एक लोकप्रिय लेखक आहेत. ते जपानीत लिहीत असले तरी त्यांची पुस्तके इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये लोकप्रिय आहेत. इतकी की, अलीकडे त्यांचे नाव नोबेल पुरस्कारासाठी घेतले जात होते. आजवर त्यांनी जवळपास पंधरा पुस्तके लिहिली आहेत, त्यात दहा-अकरा कादंबऱ्या आहेत.
वीसेक वर्षांपूर्वी त्यांनी एक कादंबरी लिहिली आणि जपानमधील एका साहित्य स्पर्धेसाठी पाठवली. तिला पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी पूर्णवेळ लेखक व्हायचे ठरवले आणि आपले चालणारे रेस्टॉरंट बंद केले. याच सुमारास त्यांनी दूर अंतरावर धावायला आणि मॅरेथॉन स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. काहीसे अतिवास्तववादी स्वरूपाचे त्यांचे लेखन असते. मात्र वास्तवापेक्षा ते कल्पनाशक्तीवर आधारित असते. तरुणांमध्ये ते लोकप्रिय आहेत.
त्यांची नवी कादंबरी- ‘कलरलेस त्सुकुरू ताझाकी..’च्या लक्षावधी प्रती ताबडतोब खपल्या. या कादंबरीत मुराकामी त्सुकुरू ताझाकी या तरुणाची गोष्ट सांगतात. त्याला चार मित्र आहेत- आका, एओ हे मित्र आणि शिरो आणि कुरो या मैत्रिणी. नागोयामध्ये शिकत असताना त्याची चौघांशी मैत्री होते. चौघांचा जपानी भाषेत रंगांशी संबंध (आका- लाल, एओ- निळा, शिरो- पांढरा आणि कुरो- काळा) आहे म्हणून त्सुकुरूला ‘रंगहीन’ म्हटले आहे. हे चौघे अचानक त्याला सोडून जातात आणि त्याच्या मनात मृत्यूचा विचार घोळू लागतो. त्यातून बाहेर पडून तो हायडासारखा मित्र आणि प्रेयसी सारा यांच्या मदतीने परत आयुष्य जगू पाहतो. एका वळणावर त्याला आपल्या या जुन्या मित्रांचा शोध घ्यावासा वाटतो.
त्याची मन:स्थिती सांगताना मुराकामी लिहितात- ‘काही तरी घडले असणार. तो दूर असताना काही तरी चौघांत शिजले असणार- ज्याने त्यांच्यात दुरावा तयार व्हावा. काही तरी चुकीचे आणि खटकणारे. ते काय असावे याचा मात्र काही थांग लागत नव्हता.’
त्याला घशात काही तरी अडकल्यासारखे वाटत होते. गिळताही येत नव्हते आणि थुंकूनही टाकता येत नव्हते. पूर्ण दिवसभर तो फोनची वाट पाहत राही. त्याचे मन कशावरही स्थिर होत नव्हते. लक्ष कशावरही केंद्रित होत नव्हते. त्याने पुन:पुन्हा सर्वाना मेसेज पाठवला होता, की तो नागोयामध्ये आहे. सर्वसाधारणपणे मित्र त्याला उलट फोन करीत; पण या वेळी फोन शांत होता.
त्या चौघांतील एकीचा मृत्यू झाला आहे. कुरो फिनलंडमध्ये हेलसिंकित आहे आणि दोन मित्र जपानमध्येच आहेत. या दोघा मित्रांना तो भेटतो तेव्हा त्याला अचानक त्यांनी सोडून जाण्याचे कारण कळते. ते फारच अनपेक्षित असते. त्याच्या मृत मैत्रिणीने आपल्यावर त्सुकुरू याने बलात्कार केल्याचे इतरांना सांगितलेले असते.
मैत्रिणीला भेटायला जायला तो चक्क हेलसिंकी गाठतो, तेव्हा तिचे स्पष्टीकरण त्याला चक्रावून टाकते. कुरो सांगते, मला युझुला ‘प्रोटेक्ट’ करायचे होते. तो जपानला परत येतो तेव्हा त्याचे आयुष्यातले एक मिशन पूर्ण झालेले असते; पण सारा या प्रेयसीशी त्याचे संबंध ताणले गेलेले असतात. एक द्वंद्व संपतानाच दुसरे त्याच्यासमोर उभे राहते.
सरळ साधी अशी ही कथा सांगता येईल; पण अनेक उपकथानके आणि चमत्कृतीपूर्ण कथा यांनी लेखक ती पुरी करण्याचा प्रयत्न करतो. यातील एक महत्त्वाचे उपकथानक म्हणजे हायडा या मित्राने सांगितलेली वडिलांची आणि एका पियानोवादकाची गोष्ट.
हायडाचे वडील १९६० च्या सुमारास जपानमध्ये फिरत होते. त्या सुमारास त्यांना एक मिदोरीकावा नावाचा जाझ पियानिस्ट भेटला आणि त्याने संगीत, कला, जीवन, मृत्यू अशा अनेक विषयांवर संभाषण सुरू केले आणि ते करतानाच आपल्याला आता केवळ एकच महिना उरल्याचे सांगितले. ही माहिती म्हणजे ‘डेथ टोकन’. ते दुसऱ्याला देता येते. हे टोकन स्वीकारणाऱ्याला माणसाभोवतीचा रंग दिसतो. त्याला वेगळे अनुभव येतात. त्याच्या संवेदना तीव्र होतात. तो सांगतो- ‘एकदा का तुम्हाला खरी दृष्टी प्राप्त झाली, की जे आयुष्य तुम्ही अनुभवले ते सपाट वाटू लागते. सारे काही एक होऊन जाते आणि तुम्ही त्याचा भाग होता. तुम्ही शरीराने घातलेले बंधन ओलांडून आधिभौतिक अस्तित्वाचा भाग बनता. ही संवेदना सुंदर असते आणि दु:खदही. कारण शेवटच्या मिनिटाला तुम्हाला कळते की, आपण जे आयुष्य जगलो ते किती क्षुद्र आणि वरवरचे होते.’
हा या कादंबरीतील सर्वात काव्यात्मक भाग आहे. एकंदरीत संवेदना आणि जगणे यांचे तीव्र नाते या कादंबरीतून लेखकाला मांडायचे आहे, असे ढोबळमानाने सांगता येईल.
कादंबरीत एक स्टिकरवरच्या चित्रांचा समूह दिलेला आहे आणि मुखपृष्ठापासूनच कादंबरीचे रंगांशी असलेले नाते दृढपणे ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. कला आणि साहित्य यात अवकाश भरून काढणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. माहितीच्या आधारे किंवा सूक्ष्म मनोव्यापाराच्या दर्शनाने तो अवकाश आधुनिक कादंबरीकार भरून काढतात. मुराकामी या दोन्हीचा वापर करतानाच कथानक अत्यंत सफाईने पुढे नेतो. मग कधी त्यात त्याच्या रेल्वे स्टेशनबांधणीचे तपशील येतात, तर कधी मर्सिडीज बेंझचे. सर्व मित्रांच्या व्यक्तिरेखा तो, त्यांची पाश्र्वभूमी, शरीरयष्टी, कपडे, सवयी यासह जिवंत करतो. त्याची शैली नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. संगीतासारख्या कलेचे अत्यंत मार्मिक विश्लेषण मुराकामीनी केले आहे. रूपकांचा आणि तपशिलांचा वापरही अनेक ठिकाणी दाद देण्यासारखा आहे; पण तरी एकसंध न वाटता सुटय़ा कथा एकत्र केल्याचा फील कादंबरी संपताना येतो. ज्या एकत्वाचा तत्त्वज्ञान म्हणून कादंबरीत भरीवपणे उल्लेख होतो, तिलाच लेखक आचावलेला आहे.

कलरलेस त्सुकुरू ताझाकी अ‍ॅन्ड हिज इयर्स ऑफ पिल्ग्रिमेज : हारुकी मुराकामी,
इंग्रजी अनुवाद- फिलीप गॅब्रीयल,
हार्वील सेकर, लंडन,
पाने : २९८, किंमत : ६९९ रुपये.