खून, मारामाऱ्या, दरोडे, विनयभंग, बलात्कारासारख्या गुन्ह्य़ांनी सामान्य माणसाच्या जगण्यावर भयाची छाया कायमची दाटलेली असताना भीतीचे आणखी एक जुने सावट गडद होण्याची चिन्हे आता पुन्हा एकदा मुंबईत दिसू लागली आहेत. मुंबईच्या संघटित गुन्हेगारीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवाया थंड पडल्या अशा समजुतीत मुंबईने टाकलेला सुटकेचा नि:श्वास अल्पजीवी ठरणार की काय अशा शंकांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे तापू लागले आहेत. त्यामुळे उफाळणाऱ्या राजकीय स्पर्धेतून कायदा-सुव्यवस्था स्थितीला धक्का लागू नये यासाठी पोलीस यंत्रणांना डोळ्यात तेल घालून सावध राहावे लागणार असतानाच, पुन्हा एकदा जाग्या झालेल्या संघटित गुन्हेगारीला लगाम घालण्याचे नवे आव्हानही पोलिसांना पेलावे लागेल असे चित्र आहे. संघटित गुन्हेगारीच्या परिणामांचे चटके याआधी अनेकदा मुंबईने सोसले असल्याने, अशी गुन्हेगारी पुन्हा उफाळून आली तर नव्याने सुरू झालेल्या विश्वास आणि विकासाच्या प्रक्रियेला मोठा धक्का बसणार असल्याने मुख्यत्वे मुंबई पोलिसांपुढे आणि राज्याच्या गृह खात्यासमोर एक जबरदस्त आव्हान उभे राहणार आहे. गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून गुन्हेगारीचे सुस्तावलेले विश्व जागे होत असल्याची जाणीव पोलिसांनाही झाली असून, हा सुस्तावलेला अजगर पुन्हा वळवळू लागण्याआधीच जेरबंद करण्याकरिता पोलिसांनी हालचालीही सुरू केल्या आहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. या विश्वात ‘सुपाऱ्या’ वाजू लागल्या की सर्वत्र भयाचे सावट दाटून राहते आणि आश्वस्तपणे वावरणाऱ्या महानगरीच्या वेगालाच वेसण बसते, हा जुना अनुभव आहे. गुन्हेगारी विश्वाचे पहिले सावट बॉलीवूड म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या चित्रपटसृष्टीवर उमटल्याने आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. अभिनेत्री प्रीती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणानंतर गुन्हेगारी विश्वाने बाहेर काढलेली नखे आता बॉलीवूडवर उगारली गेली आहेत. एके काळी ८०-९० च्या दशकात बॉलीवूडला खंडणीखोरीसाठी वेठीला धरणाऱ्या टोळ्यांनीच पुन्हा अस्तित्व दाखविण्याची धडपड सुरू केली असून, खोका आणि पेटय़ांच्या भाषा पुन्हा या क्षेत्रावर भयाचे मळभ पसरविणार या शंकेने पोलीस यंत्रणेला ग्रासले आहे. जून २०११ मध्ये जे डे नावाच्या एका पत्रकाराची हत्या झाली आणि संघटित गुन्हेगारी थंडावलेली नाही, हे स्पष्ट झाले. आता चित्रपटसृष्टीतील निर्माता अली मोरानीच्या हत्येचा प्रयत्न, अभिनेता शाहरुख खान यास धमकावण्याचा प्रकार तसेच एका पत्रकाराच्या हत्येचा उघडकीस आलेला कट आखून आपल्या सक्रियतेचे संकेत या विश्वातील लहानमोठे डॉन देऊ लागले आहेत. अनेक टोळ्यांचे म्होरके परदेशांतून आपल्या आपल्या विश्वाची सूत्रे हलवत असल्याने त्यांचे मुंबईतील जाळे मोडून काढण्यासाठी आता पोलिसांनी आपला सारा अनुभव आणि कौशल्य पणाला लावण्याची गरज आहे. स्थावर मालमत्ता उद्योग सध्या चांगल्या भविष्याची स्वप्ने पाहू लागला आहे. मात्र खंडणीखोरीसाठी या क्षेत्राकडे गुन्हेगारी विश्वाचे लक्ष असते हाही जुना अनुभव आहे. पोलिसी ससेमिरा टाळण्यासाठी तात्पुरती नखे आत घेण्याचा पवित्रा गुन्हेगारी टोळ्यांनी घेतला असला, तरी संघटित गुन्हेगारी संपली अशा समजुतीत शांत बसण्याची वेळ अजूनही आलेली नाही. सण-उत्सवांच्या उत्साही वातावरणात मिठाचा खडा पडू नये यासाठी सावध राहिलेच पाहिजे. शिवाय, निवडणुकीच्या रणधुमाळीचा गैरफायदा घेण्याची संधी अशा सुपारीबाज प्रवृत्तींना मिळणार नाही याची खबरदारीही घेतली गेली पाहिजे. कारण सर्वसामान्य माणसाला शांतताच हवी आहे.